आत्महत्या ः एक सामाजिक समस्या

0
74
  • – कात्यायनी घाटवळ

आत्महत्या करणारी व्यक्ती आत्महत्येस का प्रवृत्त होते? त्याच्यासंबंधी घडणार्‍या गोष्टींना विटून की समाजापासून मुक्ती मिळवायला? याचे उत्तर काहीही असले तरी आत्महत्या ही एक सामाजिक समस्या बनून राहिली आहे, हे मात्र खरे!

जीवन एक प्रवास आहे. या प्रवासात कितीतरी माणसे भेटतात, काहीतरी सांगून जातात. काही बोलून आपली कहाणी सांगतात, तर काही मूकपणे व्यवहार करतात. या अबोल्यामागचं नेमकं रहस्य काय असेल?
सगळ्या भावंडांची थाटामाटात लग्ने करून दिली. किती आनंद झाला असेल त्याला! पण घरात मात्र तो एकटाच उरला. आईवडील लहानपणीच जग सोडून गेली. एकटं राहण्याची त्याला हळूहळू सवय होऊन गेली. परंतु हे एकटेपण त्याला खायला येई. बहिणींच्या लग्नासाठी त्याने कर्ज घेतले होते. त्याचा कालावधी संपत आलेला. आर्थिक परिस्थितीमुळे शेवटचा उपाय म्हणून त्याने घर विकायचं ठरवलं. मनात पक्कं केलं. एकदा भर उन्हात जेव्हा तो अंगणात गहू सुकवायला घालत होता, तेव्हा त्याला एक हाक ऐकू आली. त्याच्या चारही बहिणी माहेरी आल्या होत्या. ‘‘दादा, तू हे चांगलं नाही करत,’’ मोठी बहीण बोलली. छोटीही खोचकपणे बोलली, ‘‘दादा, तू हे घर विकण्याचा निर्णय एकट्याने कसा काय घेतलास? आम्हालाही यात वाटा हवाय!’’
खूप महिने कोर्टबाजी चालू होती. कोणाचाच त्याला आधार नव्हता. आपलीच माणसं आपल्या विरोधात गेली याची सल त्याला बोचत होती. कोणाकडे बोलावं? या धक्काबुक्कीच्या जीवनात कोणाला वेळ आहे माझी व्यथा ऐकून घ्यायला? दुःखाचं ओझं मनात वादळ उठवत होतं. शेवटी नको तेच घडलं. घरासमोरच्या आंब्याच्या झाडाला गळफास लावून त्याने आत्महत्या केली.
ही कहाणी निराशाजनक असली तरी हेच वास्तव आहे! समाजरचनेत अशी व्यवस्था आहे का की अशा माणसाला कोणी समजावून सांगेल. अशी मोफत सेवा सरकारने सुरू केली तर ‘आत्महत्ये’च्या विचारचक्रात अडकलेल्यांना निश्‍चितच बाहेर काढता येईल.
फेरीबोट धक्क्याजवळ हल्लीच एका माणसाचे प्रेत तरंगत आले. बर्‍याच जणांची प्रेते अशी नदी, तलाव, समुद्रात सापडतात. गळफास किंवा वीषप्राशनाच्याही बातम्या अधूनमधून ऐकू येतात. वर्तमानपत्रातल्या अशा बातम्या वाचून आपण अस्वस्थ होतो. हल्ली तर आत्महत्येची प्रकरणे खूपच वाढली आहेत.
आत्महत्या करण्याचं मूळ कारण काय? ही समस्या वैयक्तिक की सामाजिक असाही प्रश्‍न पडतो. आत्महत्या करणार्‍या माणसाच्या वेदना इतरांच्या कशा लक्षात येत नाहीत? की लक्षात येतात पण लोक नजरआड करतात? आत्महत्या करायला प्रवृत्त झालेली व्यक्ती जरी वैयक्तिक कारणामुळे आत्महत्या करायला निघाली असली तरी तिला असे करायला लावायला जबाबदार कोण? आम्ही हा प्रश्‍न कधी स्वतःला विचारला आहे का? आमच्या सभोवती ओळखी-अनोळखीचे असे कितीतरी लोक असतात जे नैराश्याने ग्रस्त असतात. योग्य वेळी जर आम्ही त्यांच्याशी संवाद साधला, मार्गदर्शन केले तर कदाचित त्यांचे मतपरिवर्तन होऊ शकते. आत्महत्येसारखी टोकाची भूमिका जेव्हा ते घेतात तेव्हा त्यांचे ऐकून घेणारे जवळचे असे कुणीच नसतात. आपण या जगात एकटे पडलो हीच भावना त्यांना सतत सतावत असते अन् त्यातूनच आत्महत्या घडते.
प्रत्येक माणूस हा समाजाचा घटक आहे. त्याच्या संगोपनप्रक्रियेत घरच्यांनी मोठा वाटा उचललेला असतो. आपण जेव्हा आत्महत्या एक समस्या म्हणून पाहतो तेव्हा त्यामागची सामाजिक भूमिकाही लक्षात घ्यायला हवी. समाजातील वाढते ताणतणाव, आर्थिक ओढाताण, कर्जबाजारी होणे, घरातील वातावरण, अत्याचार यांचा परिणाम अशा व्यक्तींच्या मनावर होत असतो. घरातील वातावरण आणि मुलाचे झालेले संगोपन यावरून त्या मुलाची मानसिकता समजून घेता येते. त्या मुलाला बाल्यावस्थेत ज्या प्रकारची वागणूक मिळाली असेल त्यानुसार त्याची मानसिकता सामाजिक वर्तनातही दिसून येते. उदाहरणार्थ, अति बंधनं, सक्ती-भीतीमध्ये वाढलेली व्यक्ती पुढे निराश, दुःखी, नकारात्मक दृष्टिकोन असलेली, भयभीत स्वभावाची बनते व ती एकलकोंडी होते. घरातील खेळीमेळीच्या वातावरणात वाढलेली मुलं पुढे मनमोकळेपणाने जगताना दिसतात. अर्थात, यांतही काही अपवाद असतीलच.
ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ इमायल दुरखेम यांनी ‘आत्महत्ये’संबंधी एक सिद्धांत मांडलेला आहे. आत्महत्या यासारख्या ज्वलंत समस्येवर त्यांनी समग्र रूपाने समाजाचा अभ्यास केला आहे. ते आत्महत्येसंबंधी विचार मांडणार्‍या मनोवैज्ञानिक, अनुवांशिक म्हणणार्‍या विद्वानांच्या विचारांना विरोध करतात. ते म्हणतात की, सामाजिक दबावामुळे लोक आत्महत्येसारखे पाऊल उचलतात. म्हणून आचार-विचार, सामाजिक परिस्थिती या दृष्टिकोनातून याकडं पाहिलं पाहिजे.
आजसुद्धा आपला समाज आत्महत्या हा चिंतेचा विषय मानत नाही. आत्महत्या करण्याचे कारण, आंतरिक विचारांचे वादळ निर्माण करणारा समाज हे आहे. आत्महत्येची आधुनिक कारणे आहेत ताणतणाव, घटस्फोट, परीक्षा, कामाचे दडपण वगैरे. आत्महत्या घटनांची प्रवृत्ती आणि प्रकृती समान नाही, असमान आहे.
आत्महत्या म्हणजे काय? आत्महत्येची व्याख्या कोणती? ‘आत्महत्या ही सकारात्मक हिंसक कृती.’ ही स्वखुशीने केलेली कृती. स्वखुशीने म्हणजे स्वतः ठरवून जीव देणे. पण ही आत्महत्या करणारी व्यक्ती आत्महत्येस का प्रवृत्त होते? त्याच्यासंबंधी घडणार्‍या गोष्टींना विटून की समाजापासून मुक्ती मिळवायला? याचे उत्तर काहीही असले तरी आत्महत्या ही एक सामाजिक समस्या बनून राहिली आहे, हे मात्र खरे!