आता रेल्वे स्थानकांवरही मिळणार कदंबची सेवा

0
7

>> कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांची माहिती; सरकारी खात्यांना वाहनेही पुरवणार

गोवा कदंब प्रवासी वाहतूक महामंडळाकडून ‘माझी बस’ योजनेनंतर आता, कदंब महामंडळाकडून रेल्वे स्थानकांवरही बससेवा सुरू केली जाणार आहे. प्रवासी बसगाड्यांच्या माहितीसाठी मोबाईल ॲप तयार करण्यात येणार आहे. तसेच राज्य सरकारने माझी बस योजनेसाठी अंदाजे 4.2 कोटी रुपयांचा निधी हस्तांतरित केला आहे. याशिवाय राज्य सरकारच्या विविध खात्यांना कारगाड्या पुरविण्यासाठी चारचाकी वाहने भाडेपट्टीवर देण्याची योजना राबविण्यात येणार आहे, अशी माहिती कदंब महामंडळाचे अध्यक्ष तथा नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांनी कदंब महामंडळाच्या मुख्यालयात काल घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली.

राज्य सरकारच्या अनेक खात्याकडून कारगाड्या भाडेपट्टीवर घेतल्या जात आहेत. आता, सरकारने अधिकारी व सरकारी कार्यालयांसाठी वापरण्यात येणाऱ्या कारगाड्या भाडेपट्टीवर घेण्याचा अधिकार कदंब महामंडळाला दिला आहे. सरकारी खात्याच्या गरजेनुसार त्यांना कारगाड्या भाडेपट्टीवर घेऊन दिल्या जाणार आहेत. कारगाड्या भाडेपट्टीवर घेण्यासाठी खास योजना तयार करण्यात आली आहे. कदंब महामंडळाला होणारा तोटा कमी करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कारगाड्या भाडेपट्टीवर घेण्याची योजना आहे, असेही तुयेकर यांनी सांगितले.

राज्यातील प्रवासी वाहतुकीमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी खासगी बसगाड्या भाडेपट्टीवर घेऊन चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कदंबच्या माझी बस योजनेखाली पहिल्या टप्प्यात पणजी-फोंडा-सावर्डे, मडगाव-काणकोण आणि मडगाव-सांगे-केपे या तीन मार्गावर खासगी बसगाड्या भाडेपट्टीवर घेऊन चालविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही योजना मार्गी लागल्यानंतर राज्यातील रेल्वे स्थानकावरून बससेवा सुरू करणे शक्य होणार आहे. माझी बस योजनेखाली नियम व अटी तयार करण्यात आल्या आहेत. भाडेपट्टीवर घेण्यात येणाऱ्या खासगी बसगाड्यांची देखभाल बसमालकाला करावी लागणार आहे. बसगाडीवर चालकाची नियुक्ती करावी लागणार आहे. बसमालकाला बसगाडीच्या आसन क्षमतेनुसार प्रति किलोमीटरनुसार मोबदला दिला जाणार आहे. बसमालकाने कदंब प्रशासनाकडे बिल सादर केल्यानंतर तात्काळ 50 टक्के रक्कम दिली जाईल आणि 7 दिवसांत बिलाची शिल्लक रक्कम दिली जाणार आहे, असेही तुयेकर यांनी सांगितले. यावेळी कदंब महामंडळाचे सरव्यवस्थापक संजय घाटे यांची उपस्थिती होती.

कदंबचे उत्पन्न केवळ इंधनावर खर्च
कदंब महामंडळाला बस वाहतुकीतून मिळणारे उत्पन्न केवळ इंधनावर खर्च होत आहे. राज्य सरकारकडून दरमहा 9 कोटी रुपये महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी उपलब्ध केले जात आहेत. कदंबचे प्रवासी खासगी बसेस घेऊन जात असल्याने कदंब महामंडळाला आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे, असेही त्यांनी सांगितले.

कदंब बसेससाठी खास ॲप;
15 जुलैपर्यंत होणार कार्यान्वित

कदंब महामंडळाकडून बसवाहतुकीच्या माहितीसाठी ॲप तयार केला जात आहे. मोबाईल ॲपसाठी जिओ ट्रॅक तयार केला आहे. या ॲपच्या माध्यमातून बसगाड्यांची माहिती प्रवाशांना मिळणार आहे. येत्या 15 जुलैपर्यंत हा ॲप कार्यान्वित केली जाणार आहे. तसेच, भाडेपट्टीवर घेण्यात येणाऱ्या खासगी बसगाड्यांमध्ये पास पध्दत राबविण्यात येणार आहे. प्रवाशांना मोबाईलच्या माध्यमातून तिकीट उपलब्ध करून दिले जाणार आहे, असेही उल्हास तुयेकर यांनी सांगितले.