आता रामभरोसे!

0
167

गोव्याने आपली दारे जराशी किलकिली करताच पहिल्याच दिवशी कोरोनाचे सात रुग्ण सापडले. त्यात एका खलाशाचीही भर पडली. गोव्यावर येऊ घातलेल्या महासंकटाची ही जणू नांदी आहे. गोव्यात बाहेरून शेकडो वाहने रोज येऊ लागली आहेत. रेल्वे सुरू झाली आहे. विमानेही सुरू होतील. गोव्यात येऊ पाहणार्‍यांमध्ये केवळ मूळ गोमंतकीयच आहेत असे नाही. गोव्यात नातेवाईक असलेले, सेकंड होम असलेले, लाल विभागांतल्या महानगरांतले धनदांडगे देखील येथे येऊन मौजमजा करायला उत्सुक आहेत. बहुतेकांना ‘वर्क फ्रॉम होम’ ची सोय असल्याने ते कुठूनही आपले काम करू शकतात. या सार्‍यांसाठी पायघड्या अंथरू पाहणारे आणि पर्यटन सुरू करायची भाषा करणारे राज्यकर्ते गोव्याला संकटात टाकल्याखेरीज राहणार नाहीत.
गेले काही दिवस सातत्याने संशयास्पद परिस्थितीत अनेक मृत्यू गोमेकॉत घडले. कोणी श्वासोच्छ्वासाच्या त्रासामुळे, कोणी न्यूमोनियाने मृत्युमुखी पडल्याचे सरकार आजवर सांगत आले. लोक असे न्यूमोनिया आणि श्वसनाच्या आजारांनी एकाएकी कसे मृत्युमुखी पडू लागले, असे कोडे साहजिकच जनतेला पडले आणि सरकार लपवाछपवी करीत असल्याच्या भावनेने जोर धरला. सरकार मात्र अजूनही हे कोरोनाचे बळी आहेत हे मान्य करायला तयार नाही. जर हे कोरोनाचे बळी नसतील तर सरकार तशा अफवा पसरवण्यांविरुद्ध कारवाई करायला का धजावत नाही? खरे म्हणजे सरकारने गेल्या काही आठवड्यांतील अशा संशयास्पद मृत्यूंबाबत सविस्तर श्वेतपत्रिका जारी करणे अपेक्षित होते. विरोधी पक्षांनी तसा आग्रह सरकारकडे धरायला हवा.
काल एकाच दिवसात तब्बल आठ जण कोरोनाबाधित आढळले. यापैकी मुंबईत चौदा दिवस विलगीकरणात राहून आता गोव्यात आल्यावर पॉजिटिव्ह झालेल्या खलाशाचे उदाहरण बोलके आहे. कोरोना हा गनिमी काव्यासारखा आहे हे देशात सर्वत्र दिसून आले आहे. अनेकदा रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नसतात. एकाहून अधिक रॅपिड चाचण्याही नकारात्मक आलेल्या रुग्णांची पीसीआर चाचणी मात्र सकारात्मक आल्याची कित्येक उदाहरणे आहेत. अनेक रुग्णांच्या आधीच्या चाचण्या नकारात्मक आलेल्या असूनही नंतर अचानक एखादी चाचणी सकारात्मक आल्याचेही दाखले आहेत. हे सगळे ठाऊक असताना गोव्याबाहेरून गोव्यात येणार्‍यांची केवळ एकच चाचणी घेऊन आणि जेमतेम पाच सहा तास त्यांना एखाद्या हॉटेलमध्ये ठेवून नंतर घरी पाठवण्याचा धोका सरकार कसा काय पत्करू शकते?
सरकारचे तथाकथित ‘होम क्वारंटाईन’ हा खरे तर एक मोठा खुनशी विनोद आहे. कालच ताळगावातील एका सदनिकेत होम क्वारंटाईनखाली असलेले एक जोडपे बाहेर फिरायला गेल्याचे आढळले. स्थानिकांनी जाब विचारताच त्यांनी आपला मुक्काम हलवला. एखाद्या इमारतीत होम क्वारंटाईन करीत असताना इतर रहिवाशांना त्याची कल्पना देखील दिली जात नाही. आरोग्य खात्याचे कर्मचारी मग कधी तरी येऊन दारावर टीचभर स्टिकर चिकटवतात, तोही इंग्रजीमध्ये. तथाकथित होम क्वारंटाईनखालील या व्यक्ती मुक्तपणे बाहेर फिरतात, त्यांच्या संपर्कात अनेक माणसे रोज येत असतात, परंतु सरकारला त्याचे सोयरसुतक दिसत नाही. ते असते तर होम क्वारंटाईनचे नियम मोडणार्‍यांवर कायदेशीर कारवाई झाली असती.
मुळात आपल्याकडे ‘होम क्वारंटाइन’ चे गांभीर्यपूर्वक पालन करण्याची संस्कृतीच नाही. ही विदेशी संकल्पना आहे. तेथे स्वयंशिस्त असते. आपल्याकडे मात्र किमान चौदा दिवसांचे संस्थात्मक क्वारंटाईनच कोरोनाला रोखण्याचा योग्य उपाय आहे. सरकारने गोव्याबाहेरून येणार्‍या प्रत्येक प्रवाशाला – मग तो गोमंतकीय असो वा नसो, त्याच्याच पैशांनी किमान कोरोना विषाणूचा ‘इनक्युबेशन पिरिअड’ असलेले चौदा दिवस हॉटेलांमधून ‘पेड क्वारंटाईन’खाली ठेवावे आणि अशा संस्थात्मक क्वारंटाईनवर पोलिसांचा कडक पहारा ठेवावा. यातून सध्या संकटग्रस्त झालेल्या हॉटेल उद्योगाला उत्पन्नही मिळेल आणि आम जनतेला बाहेरून आलेल्यांकडून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोकाही संभवणार नाही. सध्याच्या संस्थात्मक क्वारंटाईनखालील लोक असुविधांची जी तक्रार करीत आहेत, तिलाही मग जागा उरणार नाही. चौदा दिवसांनंतर चाचणी करून मग त्यांना घरी जाऊ द्यायचे की कोविड इस्पितळात त्यांची रवानगी करायची हे ठरवावे. हे जर करणार नसाल आणि गोव्याच्या सीमा पाहुण्यांसाठी सर्रास खुल्या करणार असाल, तर मात्र गोव्याला आपण संकटात टाकाल आणि याला पूर्णपणे तुम्ही जबाबदार ठराल हे राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे.
गोव्यात जे आठ रुग्ण आढळले ते योगायोगाने सापडले आहेत. त्यात सरकारची काही मर्दुमकी नाही. यातील एक वाहन तर गोव्यात कुठून कसे आत आले याची नोंदच परवा सरकारी अधिकार्‍यांना सापडत नव्हती. रात्री त्याची शोधाशोध चालली होती! आजच्या कोरोनाच्या संकटकाळात तरी सरकारने गोव्याला धर्मशाळेची अवकळा येऊ देऊ नये. पर्यटकांसाठी गोव्यातील हॉटेल्स सुरू करण्याची काही मंत्र्यांची कितीही जबर इच्छा असतील तरी त्याचा सध्या विचार सुद्धा करू नये. रेल्वेचे पन्नास टक्के आरक्षण बिगरगोमंतकीयांचे आहे याची नोंद मुख्यमंत्र्यांनी घेतली व तसे केंद्रीय गृहमंत्रालयाला कळविले हे स्वागतार्ह आहे.
गोव्याच्या जनतेला सुरक्षित ठेवायचे असेल तर सर्वांत आधी राज्यकर्त्यांनी कडक प्रशासनाचे दर्शन घडवले पाहिजे. ज्या अर्थी आता गोव्यात कोरोनाचे रुग्ण एवढ्या मोठ्या संख्येने राहिले आहेत, त्या अर्थी गोवा आता हरित विभागात राहिलेला नाही. हे असेच होत राहिले तर सध्या आपण अनुभवत असलेली मोकळीक आणि सवलत यांना आपण लवकरच मुकू. गोव्यात येणार्‍यांना सर्रास प्रवेश देऊन आपल्याला गोव्याची मुंबई करायची नाही. कोरोनाचे सामाजिक संक्रमण जरी अद्याप गोव्यात झालेले नसले, तरी रोज गोव्यात उतरणार्‍या हजारो प्रवाशांच्या संपर्कात आलेल्यांकडून जेमतेम ३७०२ चौरस किलोमीटरच्या गोव्यात कोरोनाचे सामाजिक संक्रमण होण्यास उशीर तो कितीसा लागणार?