काँग्रेस पक्षाने देशात आणीबाणी लागू करून जनतेला त्रास देण्याचे काम केले. काँग्रेसने त्या काळात स्वतःला वाचविण्यासाठी संविधानात दुरुस्ती केली होती. तर, देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या हितासाठी संविधानात काही दुरुस्त्या केल्या आहेत, असा दावा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस, खासदार अरुण सिंह यांनी भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत काल केला.
आणीबाणी हा आपल्या देशाच्या इतिहासातील एक काळा अध्याय होता. त्यावेळी लोकशाहीचे चार स्तंभ चिरडले गेले. काँग्रेस पक्षाने आणीबाणीबद्दल माफी मागितली पाहिजे, असे प्रतिपादन सिंह यांनी केले. आणीबाणी मध्यरात्री जाहीर करून सेन्सॉरशिप लागू केली. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. देशातील युवा पिढीला आणीबाणीबाबत माहिती देण्याची गरज आहे, असेही अरुण सिंह यांनी सांगितले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे यांची उपस्थिती होती.

