मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत राज्याचा वर्ष 2023-24 चा अर्थसंकल्प बुधवार दि. 29 मार्च 2023 रोजी संध्याकाळी राज्य विधानसभेत सादर करणार आहेत. दरम्यान, या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ असणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच स्पष्ट केलेले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे 2023-24 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प चालू अधिवेशनात मांडणार असले, तरी त्यावरील चर्चा ही पावसाळी अधिवेशनात होणार आहे.
गत अर्थसंकल्पातील 34 टक्के घोषणांची पूर्तता
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वर्ष 2022-23 च्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांपैकी 34 टक्के घोषणा पूर्ण करण्यात यश मिळविल्याचे मागील अर्थसंकल्पाच्या कृती अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी राज्य विधानसभेत वर्ष 2022-23 चा अर्थसंकल्प कृती अहवाल काल सादर केला. तसेच, आर्थिक विकास अहवाल सादर केला. मुख्यमंत्र्यांनी मागील 2022-23 च्या अर्थसंकल्पात वेगवेगळ्या 170 घोषणा केल्या होत्या. त्यातील 164 घोषणांच्या कार्यवाहीसाठी प्रयत्न सुरू करण्यात आला, तर 6 घोषणा विविध कारणास्तव स्थगित करण्यात आल्या. त्यातील 34 टक्के घोषणांची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. तसेच, 62 टक्के घोषणांची कार्यवाही आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये पूर्ण होणार आहे, असे अहवालात म्हटले आहे.