>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ः लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करणार
आज सोमवारपासून सार्वजनिक प्रवासी वाहतूक ५० टक्के क्षमतेसह सुरू केली जाणार आहे. तसेच, राज्यात येत्या १७ मेपर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे. सकाळी ७ ते संध्याकाळी ७ या वेळेत नागरिक विविध कामे करू शकतात. संध्याकाळी ७ ते सकाळी ७ या वेळेत नागरिकांना फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवा देणार्या कर्मचार्यांना मोकळीक दिली जाणार आहे. केशकर्तनालयही सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.
राज्याचा हरित विभागात समावेश असता तरी १७ मेपर्यंतच्या लॉकडाऊनची कडकपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून येऊ नये म्हणून प्रशासनाकडून पूर्ण खबरदारी घेतली जात आहे. संध्याकाळी ७ ते सकाळी ७ यावेळेत नागरिकांना घराबाहेर फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. यावेळेत केवळ अत्यावश्यक सेवा देणारी औषधालये, दूध विक्री दुकाने सुरू ठेवण्यास मान्यता दिली जाणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
गर्दीची ठिकाणे बंदच
राज्यातील केशकर्तनालये सुरू केली जाणार आहेत. घाऊक व किरकोळ मद्य विक्रीची दुकाने सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. रेस्टॉरंट, रस्त्यावरील हातगाडे, स्विमिंग पूल, व्यायामशाळा, क्रीडा संकुले, मसाज पार्लर, स्पा, कॅसिनो, नाइट क्लब बंद ठेवले जाणार आहेत. देवालय, चर्च, मशीद ही धार्मिक स्थळे बंद ठेवली जाणार आहे. राज्यातील ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि १० वर्षाखालील मुलांना घराबाहेर फिरायला मान्यता देऊ नये. सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू, गुटखा खाण्यास बंदी घालण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
परप्रांतीय मजुरांना पाठवण्यासाठी रेल्वे
सुमारे ७१ हजार मजुरांनी आपल्या मूळ गावी परत जाण्यासाठी नोंदणी केली आहे. यात कर्नाटकातील १८ हजार, उत्तर प्रदेशातील १७ हजार, बिहारातील ११ हजार, ओरिसातील ५ हजार, महाराष्ट्रातील ४ हजार मजुरांचा समावेश आहे. या कामगारांना परत पाठविण्यासाठी रेल्वेंची सोय करण्यात येत आहेत. परराज्यातून सुमारे ३ हजार गोमंतकीयांनी गोव्यात येण्यासाठी अर्ज केले आहेत. दोन जहाजांतील सुमारे ८०० खलाशांनी संपर्क साधला आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
राज्यात परतणार्या गोवेकरांची कोविड तपासणी केली जाणार आहे. परराज्यातून परतणार्या गोमंतकीयांनी १४ दिवस घरातील इतर लोकांपासून वेगळे राहण्याची गरज आहे. त्यांनी सूचनांचे पालन न केल्यास त्यांना सरकारी क्वारंटाईन केंद्रात ठेवून शुल्काची आकारणी केली जाणार आहे, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
परीक्षेबाबत आज बैठक
दहावी आणि बारावीच्या परीक्षेवर विचार विनिमय करण्यासाठी सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे. वाळपई येथील नवोदय विद्यालयाच्या मुलांना परत आणण्याची व्यवस्था केली जात आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
दुचाकीवर २ तर कारमध्ये चौघे
राज्यात दुचाकी वाहनांवर २ व्यक्ती, कारगाडीत ४ व्यक्तींना प्रवास करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच रिक्षा, टॅक्सीला मान्यता देण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.
चीनमधून बाहेर जाणार्या कंपन्यांना गोव्यात आणण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. प्रदूषण विरहीत कंपन्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. आत्तापर्यंत एकाही कंपनीने संपर्क साधलेला नाही, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
परराज्यात असलेल्या गोमंतकीयांनी गोव्यातील रहिवासी असलेले ओळखपत्र सादर करण्याची गरज आहे. त्यांच्याकडून क्वारंटाईन शुल्क आकारले जाणार नाही. त्यांनी काही दिवस सरकारी क्वारंटाईन सुविधेमध्ये राहण्याची गरज आहे. जे लोक आपली वाहने घेऊन येणार आहेत. त्यांनी सकाळी ८, दुपारी १२ आणि रात्री ८ यावेळेत राज्याच्या सीमा नाक्यांवर यावे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
मद्यविक्री दुकानांस मान्यता
अबकारी खात्याने राज्यातील घाऊक आणि किरकोळ मद्यविक्रीची दुकाने आजपासून सुरू करण्यास मान्यता दिली आहे. मद्यविक्रीची दुकाने संध्याकाळी ६ वाजता बंद करण्याची सूचना करण्यात आली आहे. या दुकान मालकांनी सॅनिटायझर्स, मास्क आणि सामाजिक अंतर या नियमांचे पालन केले पाहिजे. यासंबंधीचा आदेश अबकारी आयुक्तांनी केला आहे.