आंदोलक शेतकरी विरोधकांच्या अफवांचे बळी

0
211

>> राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत मोदींचा आरोप

दिल्ली सीमेवर आंदोलन करत असलेले शेतकरी चुकीची माहिती आणि अफवांचे बळी ठरले आहेत. आपल्या अफवा उघड होऊ नयेत म्हणून विरोधी पक्षाचे प्रयत्न असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत केला. पंतप्रधान मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करत होते. यावेळी मोदींनी आपल भाषणात कोरोना संकट, अर्थव्यवस्था यासोबतच कृषी कायद्यांवरही भाष्य केले. मोदींनी केलेल्या आरोपानंतर कॉंग्रेसच्या खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. त्यावेळी मोदींनी, दिल्लीबाहेर जे आंदोलन सुरू आहे तेथील शेतकरी चुकीच्या माहितीचे शिकार झाले आहेत. आंदोलन करणार्‍या सर्व शेतकर्‍यांच्या भावनांचा सरकार आणि हे सभागृह आदर करते. यासाठीच सरकारचे मंत्री त्यांच्याशी सतत चर्चा करत असल्याचे सांगितले.

कृषी कायद्यांमध्ये काही कमतरता असेल तर बदल करण्यात काही समस्या नाही. कायदे लागू केल्यानंतर देशात कोणतीही मंडई, एमएसपी बंद झालेले नाही. कायदा झाल्यानंतर खरेदीतही वाढ झाली असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

मोदींनी शेतकर्‍यांना आवाहन करताना, आधी जे हक्क, व्यवस्था होत्या त्या नवीन कायद्यांनी काढून घेतल्या आहेत का ते शेतकर्‍यांनी सांगावे असे सांगून पर्याय असताना विरोध का सुरू आहे असा सवाल केला. जिथे जास्त फायदा तिथे शेतकरी आपला माल विकू शकतात. या कायद्यात पर्याय आहेत. जे झालेच नाही त्याबद्दल भीती निर्माण केली जात आहे. हा सरकारच्या नाही तर लोकशाहीवर विश्वास असणार्‍या संपूर्ण देशासाठी चिंतेचा विषय असल्याचे मत मोदींनी व्यक्त केले.