अहो, माझेही केस पिकतात…!

0
3
  • डॉ. मनाली महेश पवार

आजीकडून घेण्यासारखे वाटले ते म्हणजे घरच्या ताज्या अन्नाला प्राधान्य व सातत्य. ज्यांचे केस पिकलेत त्यांचे केस नक्की काळे होणार नाहीत; पण आपल्या पुढच्या पिढीचे केस लहान वयातच पिकू नयेत म्हणून काही सवयी आतापासूनच लावायला सुरुवात केली तर…?

काल क्लिनिकमध्ये सत्तर वर्षीय आजी किरकोळ तक्रारी घेऊन आल्या. प्रथमदर्शनीच माझं लक्ष त्यांच्या लांब केसांवर गेलं. वयोमानानुसार केस थोडे विरळ झालेले, पण लांबी तशीच होती व महत्त्वाचे म्हणजे केस काळे होते. अधूनमधून एखाद-दुसरा पांढरा केस दिसत होता. डाय-एक्स्टेन्शन असं काही कृत्रिम वाटत नव्हतं म्हणून न राहून केसांबद्दल विचारल्यावर समजलं, त्या आजीचे केस ‘रिअल’ म्हणजे स्वतःचे होते. मग उत्सुकता आणखीन वाढली. केसांच्या तक्रारीसाठी ‘हे खा, ते करा’ असे सांगत बसण्यापेक्षा आजीने काय खाल्ले? काय केले? हे जाणून घेणे प्रात्यक्षिक वाटले. आजी म्हणाल्या, ‘आजपर्यंत मी घरच्या ताज्या अन्नाला प्राधान्य दिले आणि सातत्याने आठवड्यातून तीन वेळा खोबरेल तेलाने केसांना मालीश करते. अर्धा ते एका लिंबाचा रस आंघोळीपूर्वी केसांच्या मुळांना लावते व केसांचे तेल घालवण्यासाठी शिकाकाई- रिठ्याच्या पाण्याने केस धुते.’ मात्र हा उपाय केसांच्या नैसर्गिक पोताप्रमाणे बदलू शकतो, त्याचप्रमाणे प्रत्येक माणसामध्ये प्रकृतीनुरूप चालेलच असा नाही. पण एकमात्र त्या आजीकडून घेण्यासारखे वाटले ते म्हणजे घरच्या ताज्या अन्नाला प्राधान्य व सातत्य. ज्यांचे केस पिकलेत त्यांचे केस नक्की काळे होणार नाहीत; पण आपल्या पुढच्या पिढीचे केस लहान वयातच पिकू नयेत म्हणून काही सवयी आतापासूनच लावायला सुरुवात केली तर…?
केस हा सर्वांचा संवेदनशील व भावनिक विषय आहे. आपलं बाह्यसौंदर्य पूर्णतया केससंबारावर अवलंबून असते असे बऱ्याच जणांचे मत असते. पण जसजसे वय वाढते तसतसे केस पिकणारच. म्हातारपणाचे ते एक मुळी लक्षणच आहे व ते तेवढ्याच सहजतेने प्रत्येकाने स्वीकारावे. उगाचच केस काळे करून सौंदर्य खुलवायचा, पुढे जिवावर बेतणारा प्रयत्न करू नये. खूप लवकर केस पिकत असल्याने त्यांची अगदी लहानपणापासूनच काळजी घ्यावी आणि हे समजण्यासाठी प्रथम केस पिकण्याची कारणे जाणून घ्यावीत.

  • आंबट, खारट व तिखट या रसांचे अधिक प्रमाणात सेवन करणे. आजकाल सगळ्यांनाच चटपटीत, मसालेदार आवडते. त्यांत पहिला क्रमांक येतो तो सगळ्या प्रकारच्या चिप्स, वेफर्स यांचा. अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच हा आवडता स्नॅक.
  • सर्व प्रकारचे चाट, फरसाण, सगळे बेकरी प्रदार्थ, पॅक्ड किंवा हवाबंद वा शीतगृहात ठेवलेले पदार्थ, बटर, चीज, स्ट्रीट फूड, जंक फूड, फास्ट फूड, हॉटेलमधील ग्रेव्ही घालून बनवलेले पदार्थ, वडापाव, पावभाजी, मोमोज, शेजवान पदार्थ, दोन मिनिटांची मॅगी नूडल्स, सगळ्या प्रकारचे सॉस, केचअप, चायनीज पदार्थ इत्यादी.
  • दही, लोणचे, पापड, पाणीपुरी, भेलपुरी, गोलगप्पे, रगडा पॅटिस इत्यादी.
  • नूडल्स, पास्ता, पिझ्झा, बर्गर इत्यादी.
  • जमिनीखाली येणारे सगळे अन्नपदार्थ. उदा. बटाटे, रताळी, साबुदाणा, बीट, गाजर, अधिक स्टार्चवाले पदार्थ इत्यादी.
  • तसेच फर्मेंटेड पदार्थ, जसे की पाव, इडली, डोसा, आप्पे इत्यादी. हे सगळे पदार्थ शरीरात गेल्यावर अम्लता उत्पन्न करतात.
  • केसांच्या समस्यांचे बाह्य कारण म्हणजे वेगवेगळे केमिकलयुक्त शॅम्पू, क्रिम, जेल यांचा अतिवापर, तेलाचा अजिबात वापर न करणे, केस सतत मोकळे सोडणे.
  • पूर्वी बायका केस व्यवस्थित तेल लावून छान वेणी-अंबाडा घालायच्या, डोक्यावर पदर- ओढणी घ्यायच्या.
  • पुरुषांच्या डोक्यावरही टोपी, फेटा, पगडी, मुंडासे, कानटोपी इत्यादी काही ना काहीतरी परिधान करायचे. थोडक्यात, डोकं उघडं कोणीच ठेवत नसत. आज हवेचे प्रदूषण एवढे वाढले आहे आणि तरीही आपण केस मोकळे सोडतो. मग केसांवर दुष्परिणाम होणार नाही तर काय? खूप रात्री उशिरापर्यंत जागणे हे या काळातले महत्त्वाचे कारण आहे.
  • ओव्हर रिॲक्ट होणे, सतत चिंता, शोक, भय, भीती, स्पर्धा, अनेक जटिल समस्यांमध्ये असणे.
    या सर्व आहारीय, विघटिय कारणांनी केस खूप कमी वयात पिकायला लागले आहेत.

केस पिकण्याचे कसे थांबवावे?
आयुर्वेदशास्त्रानुसार खारट या रसाचा उतारा तुरट रसाने होतो व आंबट रसाच्या विरुद्ध कडू रस उष्ण, तीक्ष्ण गुण थंड अशा गुणांनी शांत होतात. म्हणजेच आपल्या आहारात पडवळ, दोडका, घोसाळे, दुधी भोपळा, गवार, भेंडी, कारले, मेथी, वांगी अशा भाज्यांचा वापर करावा.

  • भात कुकरमध्ये न शिजवता उघड्या भांड्यात पेज वेगळी करून मोकळा भात करावा. शक्यतो प्रथम तुपावर भाजून केलेला भात उत्तम.
  • डाळींमध्ये मुगाच्या डाळीला प्राधान्य द्यावे.
  • कडधान्यांमध्ये मूग, मसूर, मटकी, चवळी यांसारखी कडधान्ये आहारात उपयोगात आणावी.
  • दूध, लोणी, तूप यांचा आहारात समावेश करावा. ताक हे आंबट असू नये.
  • जेवण हे नेहमी जमेल तेवढे ताजे व गरम असताना जेवावे.
  • पाणीही योग्य प्रमाणात प्यावे. पाण्याला पर्याय कोल्ड्रिंकस्‌‍ किंवा तत्सम इतर पेय नव्हे.
  • बाहेर जाताना छत्री किंवा ओढणी-स्कार्फचा वापर करावा.
  • केस मोकळे सोडून बाहेर उन्हात जाऊ नये. पूर्वीच्या काळी प्रदूषण कमी होते, केसांना तेल लावायची सवय होती. त्यामुळे हवेतील घाण केसांना चिकटत नसे. आज वाढत्या प्रदूषणांमुळे केसांची हानी होत आहे.
  • रोज रात्री झोपताना दोन्ही नाकपुडीत तुपाचे दोन-दोन थेंब टाकावे.
  • दुधामध्ये एक चमचा तूप घालून रात्री प्यावे.
  • किमान आठवड्यातून तीन वेळा खोबरेल तेलाने मालीश करावी. हे तेल केसांच्या मुळांशी लावावे. ते आत जिरले पाहिजे. केसांच्या मुळातून केस बाहेर आल्यावर केस निर्जीव असतो, त्यामुळे टाळूवर मालीश करावे.
  • केस धुताना शक्यतो कोमट पाण्याचा वापर करावा. शॉवरने आंघोळ करणे टाळावे.
  • केस झटकून सुकवू नये. तसेच केस धुण्यासाठी कोणतेही महागडे केमिकल्सयुक्त शॅम्पू वापरू नये. बेसनचे पीठ, रिठा, शिकाकाई याने केस धुतल्यास लवकर पिकत नाहीत.
  • आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वर दिलेल्या सगळ्या कारणांचा त्याग करणे.
  • कुठल्याही जाहिरातींना भुलून महागडे शॅम्पू, तेलं, क्रिम इत्यादी उत्पादने खरेदी करू नका. आजी सांगतात त्याप्रमाणे दोन गोष्टी लक्षात ठेवा व सातत्य व आहार.
  • घरचा साधा ताजा सात्त्विक आहार, छोडासा व्यायाम, रात्री तुपाचे नस्य, सातत्याने केसांच्या मुळांशी मालीश- तीही खोबरे तेलाची, तेल काहीसे कोमट असावे व रिठा, शिकाकाई इत्यादीने केस धुवावे. केमिकल्सयुक्त शॅम्पू वापरू नये.
    जपा, शृंगराज, यष्टीमधू, गुंजा, बाकुची, अल्लानक, तीळ ही काही केशद्रव्ये आहेत.