असा झाला बगदादीचा खात्मा

0
175
  • कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)

अमेरिकेच्या या कारवाईमुळे सध्या तरी आयसीसचे कंबरडे मोडले आहे यात शंकाच नाही. जिहादी दहशतवादाविरुद्ध लढणार्‍या अमेरिकेसाठी हा डावपेचात्मक आणि सामरिक विजय आहे. लादेन आणि बगदादीविरुद्धच्या मोहिमांमध्ये खूपच समानता आहे, पण यामुळे जिहादी दहशतवाद संपुष्टात आलेला नाही. आजही इस्लामिक स्टेट १८ देशांमध्ये कार्यरत आहे.

२६/२७ ऑक्टोबर २०१९च्या रात्री सीरियाच्या इडलीब प्रांतातील बारिश गावामधल्या लोकांना हेलिकॉप्टर्सच्या रोटरी विंग्जच्या घिरट्यांचा आवाज आणि गोळीबाराचे आवाज ऐकू आले. त्या क्षेत्रात रात्रीच्या वेळी येणारे असले आवाज केवळ मृत्यूची सूचना देत असतात, मात्र या वेळी इराकमधून उड्डाण करत ५०० किलोमीटरचे अंतर पार करणार्‍या त्या चिनुक आणि ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्समधून उतरणार्‍या असंख्य अमेरिकी कमांडोंचे लक्ष्य फक्त आयसीसचा सर्वेसर्वा खलिफा अबू बक्र अल बगदादी होता.

त्या हेलिकॉप्टर गनशिप्सपैकी काही रायफल्स व मशीनगन्सचा मारा झेलत त्या क्षेत्रावर घिरट्या घालत उर्वरित हेलिकॉप्टर्समधून उतरणार्‍या रेंजर्स आणि डेल्टा फोर्सच्या कमांडोंना बगदादीच्या हवेलीजवळ उतरण्यासाठी फायर कव्हर देत होते. या सैनिकांना बगदादीच्या अतिशय कट्टर, विश्वासू अशा ७० सहकार्‍यांशी लढा द्यायचा होता. त्यांचे ध्येय एकच होते. बगदादीला जिवंत पकडणे किंवा ठार मारणे.
अमेरिकेनं बगदादीवर अनेक दिवस पाळत ठेवली होती. बगदादी सतत आपल राहण्याचं ठिकाण बदलत असल्यामुळे तो असलेल्या ठिकाणांवरचे दोन-तीन हल्ले अमेरिकेला शेवटच्या क्षणी पुढे ढकलावे लागले. सप्टेंबरमध्ये अमेरिकेने बगदादीच्या असंख्य बायकांपैकी एकीला, त्याचा एक सहकारी व दोन भाच्यांसह अटक करून त्यांच्याकडून बगदादीच्या पश्चिम इराकमधील लपण्याच्या ठिकाणाची माहिती मिळवली होती. त्या ठिकाणी छापा टाकला असता बगदादीच्या अल कायदाच्या प्रभुत्वाखाली असलेल्या उत्तर पश्चिम सीरियातील घराचा पत्ता अमेरिकेला सीआयएच्या माध्यमातून मिळाला. उत्तर सीरियात आयसीसचं वर्चस्व नसतानाही बगदादी इडलीबमध्ये वास्तव्यास होता, कारण आयसीसच्या या अवकर्षाच्या काळात बहुदा त्याला सीरिया व इराकमधील इतर मोठ्या जिहादी गटांचं एकत्रीकरण करायचं होतं. या माहितीच्या आधारे डोनाल्ड ट्रम्पनी २३ ऑक्टोबरला पेंटागॉनला बगदादीच्या खात्म्याचे आदेश दिले आणि पेंटागॉन, सीआयए आणि रेंजर्स कामाला लागले. या अमेरिकी सैनिकांना घेऊन जाणार्‍या हेलिकॉप्टर्सना त्यांच्या लक्ष्यापर्यंत पोचण्यासाठी रशियन, सीरियन आणि तुर्कीस्तानच्या हवाई हद्दींमधून प्रवास करावा लागला. हे अतिशय नाजूक मिशन होतं, कारण कोणालाही कुठलीही पूर्वसूचना न देता या हवाई हद्दींमधून जाणं म्हणजे त्यांच्यावर आक्रमण करण्यासारखं होतं. त्यामुळं अमेरिकेनं मॉस्को, दमास्कस आणि अंकाराला आपल्या प्रवासाची पूर्वसूचना दिली. तसंच आपल्या अंतिम लक्ष्याबद्दल काहीही वाच्यता केली नाही.

घराच्या दरवाजात गुप्त स्फोटकं बसवलेली असतील अशी शंका असल्यामुळं अमेरिकन कमांडोंनी बगदादी राहत असलेल्या घराच्या भिंतींना उद्ध्वस्त करत आत प्रवेश केला. बगदादीच्या दोन बायकांनी स्फोटकांनी भरलेली आत्मघातकी बनियन्स घातल्या होत्या. पण सुदैवानं या धुमधामीत त्यांनी त्याचा स्फोट केला नाही; अन्यथा अनेक अमेरिकी कमांडोंचा खात्मा झाला असता. बगदादीचं वास्तव्य असलेल्या इमारतीच्या खोल्या एकामागोमाग एक करून धुंडाळताना अमेरिकी कमांडोंनी ११ लहान मुलांना एका खोलीतून जिवंत बाहेर काढलं आणि १७ इस्लामिक दहशतवाद्यांना अटक केली. इमारतीचं आवार आणि खोल्यांची झडती घेताना अमेरिकी कमांडो आणि त्यांच्याबरोबर असलेल्या शोधक श्वानांनी (स्निफर डॉग्ज) बगदादीचा शोध चालूच ठेवला. या गडबडीत त्यापैकी एका कमांडोला बगदादी तीन लहान मुलांबरोबर एका भुयारामध्ये शिरताना दिसला. कमांडोंच्या माहितीनुसार त्या भुयाराचं दुसरं प्रवेशद्वार बंद होतं. त्यामुळे बगदादीमागे स्वतः न जात कमांडोंनी आपले शिकारी कुत्रे त्यात घुसवले. बहुदा बगदादीला मागावर येणार्‍या कुत्र्यांचा आवाज ऐकू आला असल्यानं त्यानं आपल्या अंगात घातलेल्या आत्मघातकी चिलखताचा स्फोट केला असावा आणि त्यामुळे त्या तीन अतिशय घाबरलेल्या मुलां बरोबर बगदादीचा अंत झाला.

उर्वरित आयसीस समर्थक सैनिकांची माहिती मिळवण्यासाठी अमेरिकी कमांडोंनी जाता जाता हाती लागेल तो संगणक, भ्रमणध्वनी, कागदपत्रे आपल्या बरोबर नेली. बगदादीच्या घरावर पोचल्यापासून दोन तासांच्या आतच अमेरिकन डेल्टा फोर्स आपल्या हेलिकॉप्टर्समधून, आलेल्या मार्गे सीरियाबाहेर पडला. जाता जाता, बगदादीच्या लपण्याच्या ठिकाणाचं भूतलावरील नामोनिशाण मिटवण्यासाठी आणि स्वतःच्या खुणा पुसून टाकण्यासाठी कमांडोंनी अमेरिकन ड्रोन्सद्वारे बगदादीच्या लपण्याच्या ठिकाणावर क्षेपणास्त्र हल्ले केले. ज्यावेळी एकही कमांडो न गमावता, सर्व टीम सुखरूप परत आल्याची खात्री झाली, त्यावेळी ट्रम्पनी बगदादीच्या खात्म्याची माहिती संपूर्ण जगाला दिली.

इकडे अमेरिकी कमांडोंनी मलब्यानं भरलेलं ते भुयार खोदणं सुरु केलं. भुयाराच्या शेवटाला त्यांना बगदादीचे छिन्नविच्छिन्न अवशेष मिळाले, पण कमांडोंबरोबर असलेल्या तंत्रज्ञांपाशी डीएनए टेस्टिंग किट असल्यामुळे त्यांनी त्या अवशेषांची डीएनए चाचणी करून केवळ पंधरा मिनिटांमध्ये ‘हंड्रेड पर्सेंट कॉन्फिडन्ट, जॅकपॉट ओव्हर’ हा विजय संदेश व्हाईट हाऊसला दिला.

२०११ मध्ये ओसामा बिन लादेनला दिलेलं जॅकपॉट हे छद्म नाव (कोड नेम) यावेळी बगदादीला देण्यात आलं होतं. सील टीम ३६ च्या सन्मान चिन्हातील त्रिशूळावरून बिन लादेनच्या कारवाईला ‘ऑपरेशन नेपच्यून स्पियर’ नाव देण्यात आलं होतं. या वेळी मात्र बगदादीनं अपहरण करून स्वतःची रखेल म्हणून वापरलेल्या आणि नंतर अतिशय क्रूरपणे मारून टाकलेल्या अमेरिकी मानवाधिकार कार्यकर्ती मिस कायला म्यूलरसाठी बगदादीच्या खात्म्याला ‘ऑपरेशन ऑब्लिटरेशन’ हे नाव देण्यात आलं होतं.
आपल्या कमांडरांशी संवाद साधताना तो नेहमी एक मुखवटा धारण करत असल्यामुळे बगदादीला ‘इनव्हिजिबल शेख’ हे सांकेतिक नाव बहाल करण्यात आलं होतं. लादेन आणि बगदादीविरुद्धच्या मोहिमांमध्ये खूपच समानता आहे, पण यामुळे जिहादी दहशतवाद संपुष्टात आलेला नाही. अल कायदाचे हजारो सैनिक आणि शेकडो स्लीपर सेल्स दक्षिण आशिया, आफ्रिका आणि पाश्चिमात्य देशांमध्ये भूमिगतरित्या वावरत आहेत. इस्लामिक स्टेट १८ देशांमध्ये कार्यरत आहे. दोघांनी मिळून २०१९ मध्ये जगभरात १८०० हून अधिक जिहादी हल्ले केले आहेत.

आयसीसचे सैनिक मुख्यतः इराक व सीरियातले असले तरी मध्यपूर्व देश, उत्तर आफ्रिका, युरेशियन राष्ट्रे, रशिया, चीन, युरोप आणि अमेरिकेतील इस्लामी मूलतत्ववादाकडे आकृष्ट झालेले अनेक विदेशी जिहादी देखील आयसीसमध्ये कार्यरत होते. आयसीसच्या अमानुष क्रौर्याला अबू बक्र अल बगदादी जबाबदार होता. किंबहुना हिंसक क्रौर्याच्या माध्यमातून जागतिक प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यानेच आयसीसला प्रवृत्त केलं असं म्हटल्यास ते वावगं होणार नाही. बहुसंख्येत सुळावर चढवणे, गुलामी आणि शरीराचे तुकडे करणं, दगडांनी ठेचून मारणं, गळा कापणं व जिवंत जाळणं या अमानुष प्रकारांनी बगदादीने जगभरातील सामान्य जनतेला हादरवून टाकलं आणि त्याच बरोबर असंख्य हिंसक हस्तकांना आपल्याकडे आकृष्ट केलं होतं. २०१४ मध्ये अमेरिकेने त्याच्यावर १० दशलक्ष डॉलर्सचं बक्षीस ठेवलं आणि २०१७ मध्ये ते वाढवून २५ दशलक्ष डॉलर्स केलं होतं.

अमेरिकेच्या कारवाईमुळे सध्या तरी आयसीसचं कंबरडं मोडलं आहे. जिहादी दहशतवादाविरुद्ध लढणार्‍या अमेरिकेसाठी हा डावपेचात्मक आणि सामरिक विजय आहे. तरी यामुळे इस्लामी खलिफतचा जागतिक उद्घोष, इंटरनेटमुळे निर्माण झालेलं हत्यारीकरण, क्रूर हिंसा व नृशंस हत्याकांडाची शृंखला आणि त्यांचा सामान्य माणसाच्या जीवनातील टेलिव्हिजन व स्मार्टफोनमुळे झालेला अंतर्भाव हे दुष्टचक्र कसं व कधी थांबेल याचा अंदाज करणं मात्र कठीण आहे.