असक्तिः अनभिष्वंगः पुत्रदारगृहादिषु …

0
345

– प्रा. रमेश सप्रे
भगवद्गीता या जीवनविषयक ग्रंथात केवळ अर्जुनाला केलेलं प्रासंगिक मार्गदर्शन नाहीये तर सार्‍या मानवजातीसाठी उपयुक्त असं समुपदेशन आहे. या दृष्टीनं आपण गीतेवर सहचिंतन करत आहोत. प्रापंचिक व्यक्तीला सतत अपेक्षित-अनपेक्षित, हवं-नको असलेल्या प्रसंगांना किंवा अनुभवांना सामोरं जावं लागतं. अशा सार्‍या अनुकूल-प्रतिकूल घटनांचा स्विकार आनंदानं कसा करायचा व अवघं जीवन ही आनंदयात्रा कशी बनवायची यासाठी उत्कृष्ट समुपदेशन गीतेच्या अनेक श्‍लोकात आहेत. आनंदी, समाधानी जीवनाची ही सूत्रंच आहेत म्हणा ना!भगवंत अशाच एका अत्यंत महत्त्वाच्या पैलूविषयी सांगताहेत-
असक्तिः अनभिष्वंगः पुत्रदारगृहादिषु|
नित्यंच समचित्तत्वं इष्टानिष्ट उपपत्तिषु॥

अर्थ स्पष्ट आहे – प्रपंचात सदैव अनुभव येतच असतात. किंबहुना अनुभवांची अखंड साखळी किंवा निरंतर प्रवाह म्हणजेच सांसारिक जीवन. यात सुखापेक्षा दुःखच अधिक असतं. म्हणून सदैव मुक्त, आनंदी राहण्यासाठी भगवंतांचा आग्रह आहे अनासक्तीवर, संगत्यागावर, सर्व प्रकारच्या भोगात किंवा अनुभवात स्थिर राहण्यावर. दुःखाबरोबर तसंच सुखाबरोबर वाहत जाणं भगवंतांना मान्य नाही. त्यामुळे टिकाऊ सुख किंवा मुक्त आनंद यांचा अनुभव येणार नाही. पण हे जमायचं कसं?
१) असक्तिः – याचा सरळ अर्थ आहे – मुलं-पत्नी (किंवा पती)-घर-जमीन-संपत्ती यात आसक्ती नको. यांच्यापासून सदैव सुखच मिळेल अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. कधी सुख तर कधी दुःख (कभी खुशी कभी गम) अशीच प्रपंचाची रचना असते. भोगातून सुख ही कल्पना फसवी आहे. खरं सुख त्यागातच असतं. इंद्रियांच्या माध्यमातून लाभणारं सुख हे स्पर्शजन्य असतं. खरं सुख त्यागातच असतं. इंद्रियांच्या माध्यमातून लाभणारं सुख हे स्पर्शजन्य असतं. डोळे-कान-नाक-जीभ-त्वचा ही इंद्रियं आहेत. त्यांना ज्ञानेंद्रियं म्हणतात. पण हा शब्दप्रयोग साफ चुकीचा आहे. हे भोगेंद्रियं आहेत. ज्ञान तर सारं मेंदूतील विविध केंद्रांद्वारेच होते. तसं पाहिलं तर कान-डोळे या खिडक्याच आहेत. तर जीभ-नाक-त्वचा ही दारं आहेत. खिडकीतून-दारांतून व्यक्ती आत येतात. पण त्यांचा परिचय हा मन-बुद्धी; विचार-स्मृती यावरच अवलंबून असतो. अनेक वर्षांनी शिक्षकाला भेटतो तेव्हा त्याचा पहिला प्रश्‍न असतो, ‘सर, ओळखलंत का मला?’ बर्‍याच वेळा अंधुक ओळख पटते. पण त्याचं रूप-आवाज-चालण्याबोलण्याची शैली सारं खूप बदललेलं असतं. स्मृतीला ताण देऊनही लक्षात येत नाही त्यावेळी तो विद्यार्थीच स्वतःचा परिचय करून देतो. इतकंच नव्हे तर एखादा विशिष्ट प्रसंगही सांगतो. मग सारं लक्षात येतं. सामान्य जीवनात टिकाऊ असं काहीच नसतं. म्हणून सारं टाकाऊ असतं असं नाही. भगवंत सुचवताहेत त्या त्या वेळी ते ते महत्त्वाचं असतं. पण काळाच्या प्रभावामुळे अन् निर्माण झालेल्या प्रत्येक वस्तूच्या अनित्यतेमुळे सारं सतत बदलत असतं. नवीन काही निर्माण होत नाही. आहे ते संपूर्णपणे नष्ट होत नाही. पण सदैव सगळ्याचं परिवर्तन (ट्रान्सफॉर्मेशन) होत असतं. यामुळेच तर प्रपंचाचं स्वरूप क्षणाक्षणानं – प्राणाप्राणानं – कणाकणानं संपणारं असं क्षणभंगूर असतं.
भगवंताला अशा प्रकारचं चिंतन अपेक्षित आहे. ‘चिंतनातून जीवनपरिवर्तन’ हा गीतेचा लाडका सिद्धांत आहे. ‘पार्थ अनुचिंतयन्’ असं भगवंत सूचवतात. अभ्यास व वैराग्य यांच्या माध्यमातून मनःशांती – स्थिरबुद्धी – चित्तशुद्धी या तीन गोष्टींचा लाभ होतो.
आणखी एक प्रापंचिक भोगांबद्दल किंवा सांसारिक सुखांबद्दल लक्षात ठेवायची महत्त्वाची गोष्ट अशी आहे. इंद्रियजन्य सारे भोग हे स्पर्श किंवा संयोगावर अवलंबून असतात असा सर्वसाधारण समज आहे. पण प्रत्यक्षात वियोगातूनच इंद्रियभोग किंवा देहमनाचं सुख लाभतं ही वस्तुस्थिती आहे. सारे अनुभवही मीलनावर नव्हे तर वियोगावर अवलंबून असतात हे जितक्या लवकर स्वानुभवानं – चिंतनानं कळेल तो भाग्याचा दिवस किंवा सोन्याचा क्षण समजला पाहिजे.
काही उदाहरणं पाहू या. शब्द-स्पर्श-रूप-रस-गंध हे जीवनाचे मुलभूत अनुभव आहेत. शब्द-ध्वनी-सूर किंवा गोंगाट यांचा स्पर्श-ध्वनिलहरींचा संयोग – कानाला झाल्याखेरीज शब्दाचं ज्ञान – त्याच्या अर्थाचा अनुभव येत नाही. दूरच्या घरात चालू असलेल्या दूरदर्शनमुळे माझं मन आकर्षिलं जात नाही. ध्वनी ऐकू येत नाही. चित्र दिसत नाही. दृश्याचा प्रत्यक्ष संयोग इंद्रियांशी झाल्याशिवाय अनुभव येत नाही.
एक गंमतीदार दृश्य डोळ्यासमोर आणू या. दुचाकीवरून काही मैत्रिणी (मुली) निघाल्या आहेत. डोळ्यांना गॉगल, हाताला मोजे, देह संपूर्ण झाकलेला, डोक्याला हेल्मेट किंवा आवळून बांधलेली ओढणी (किंवा रूमाल), वरच्या मजल्यावरून आपल्या परदेशातून आलेल्या मुलाला कौतुकानं आई सांगते – ‘ती मधली दिसतेय ना तांबड्या स्कूटरवरची ती आम्ही तुझ्यासाठी पाहिलीय. तुला कशी वाटते?’ यावर मुलाच्या चेहर्‍यावर प्रश्‍नचिन्ह – तो उद्गारतो, ‘आई, स्कूटर बरी वाटते!’ कारण मुलीचं काही म्हणजे काहीच दिसत नसतं. ना रूप-ना रंग-ना आवाज-ना बोलण्याचालण्याची शैली कारण एकच की त्यांचा संयोग मनाशी झालेला नाही.
याहीपुढं जाऊन एका महत्त्वाच्या पैलूकडे लक्ष दिलं पाहिजे. खरं सुख किंवा खरा अनुभव हा संयोगापेक्षा वियोगामुळेच होतो. उदा. खेळून घरी आलेल्या मुलाला आई सांगते, ‘आता हातपाय धुवून थोडा अभ्यास कर. मी तुझे आवडीचे लाडू तुला देईन.’ मुलगा उत्साहानं अभ्यास करतो. नंतर आईला लाडू मागितल्यावर ‘त्या काचेच्या बरणीत ठेवलेले लाडू पहा हं!’ मुलगा म्हणतो, ‘आई नुसते पाहून काय उपयोग? ते गोल व पिवळे आहेत एवढंच दिसलं.’ ‘ठीक आहे’ असं म्हणत आई स्वतःच्या हातात लाडू घेऊन त्याच्या नाकाजवळ नेते. ‘वॉव! काय सुंदर वास आहे वेलचीचा!’ तो मुलगा उद्गारतो. ‘पण आई लाडू कसा झालाय ते मला कुठं कळलं? हात लावून पाहिल्यावर तो मऊ असल्याचं कळलं. पण सर्व इंद्रियातून लाडूचं ज्ञान होऊनही ‘लाडू कसा झालाय?’ या प्रश्‍नाचं उत्तर मिळालंच नाही. ज्यावेळी लाडवाचा तुकडा लाडक्या मुलाच्या जिभेवर ठेवला जातो तेव्हा मुलाला खर्‍या अर्थानं समजतं व तो म्हणतो, ‘लाडू खरंच छान झालेत आई. खरंच रुचकर झालेत ते’. गंमत म्हणजे जिभेला सुख केवळ स्पर्श, संयोग होऊन सारं कळत नाही. ते जेव्हा कळतं तेव्हा लाडू संपायला लागलेला असतो. म्हणजेच त्याचा वियोग होत असतो. याचा अर्थ खरं ज्ञान किंवा अनुभव संयोगातून नव्हे तर वियोगातून होते.
गीतरामायणात त्या अमर गीतातील ती ओळ आठवा – ‘वियोगार्थ मीलन होते नियम या जगाचा |
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ॥
ही पराधीनता, प्रारब्धाचे भोग फक्त देहाच्या, इंद्रियांच्या पातळीवरचे आहेत. मन-बुद्धीच्या पातळीवरचे नव्हेत.
यालाच भगवंत विचारातून लाभलेली ‘असक्ति’ म्हणजेच अनासक्ती असे म्हणतात.
२) अनभिष्वंग पुत्रदारगृहादिषु – मुलं-पत्नी-घरासारखी स्थावरजंगम संपत्ती यात किती रमायचं, किती रस प्रपंचात घ्यायचा याचं ताळतंत्र हवं. (सेन्स ऑफ प्रपोर्शन)! पांडुरंग कमरेवर हात ठेवून अठ्ठावीस युगं नुसता विटेवर उभा नाहीये तर इतकं करूनही संसाराचा वीट (खर्‍या अर्थानं) कसा येत नाही याचं आश्‍चर्य त्याच्या चेहर्‍यावर आहे. पोट-मलमूत्र विसर्जन-पुनरुत्पादन (रिप्रॉडक्शन)-हालचाली व विविध प्रकारची कामं ही सारी इंद्रियं कंबरेच्या खालीच आहेत. संसार व्यवस्थित करायला ती पुरेशी आहेत. पण आपण प्रपंचात इतका रस घेतो की केवळ रसिक न उरता नाकातोंडात तोच रस जाऊन आपण संसारसागरात गटांगळ्या खात राहतो. हा पसारा एवढा पसरलाय की जीवनाचा पसराच (दुकान) झालाय. सतत आपला व्यवहार-व्यापार (जीवनव्यापार). पैसा आहे – घरात साधनं आहेत, सुविधा आहेत… नात्याची मंडळी आहेत (खरं म्हणजे मी व माझी पत्नी (किंवा पती) नि माझं मूल (असलं तर, कारण मुलं असण्याचा काळ केव्हाच मागे पडला) हीच केवळ मंडळी .. भोगांची – उपभोगांची सारी व्यवस्था आहे. पण समाधान – शांती – आनंद यांचा पत्ता नाही. देहाच्या पातळीवर मिळणार्‍या तात्कालिक सुखांनाच आनंद मानण्याची चूक आपण करत असतो. याचा दृश्य परिणाम म्हणजे एवढ्यातेवढ्या कारणावरून मनाचा जाणारा तोल…
हे बराच काळ सुरू राहिल्यावर होणारे मनोविकार नि इतर डॉक्टरांसारखेच गरजेचे झालेले मानसोपचार तज्ज्ञ व त्यांचे विविध उपचार नि औषधं!
सत्ता-संपत्ती-सुखसोयी जेवढ्या वाढतील त्याच्या व्यस्त प्रमाणात (इन्व्हर्स प्रपोर्शन) समाधान-शांती कमी होतेय. हा सार्वत्रिक अनुभव झालाय. कितीही सत्ता मिळाली – धनप्राप्ती झाली – मुलांना कितीही टक्केवारीनं गुण मिळाले – कितीही चांगल्या संस्थेत प्रवेश मिळाला – कितीही चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली… तरी संतोष नाही. काही अपवाद सोडले तर सारे हरणं झालो आहोत. मृगजळामध्ये तहान शमवण्यासाठी धावून धावून ऊर फुटून मरणारे हरीण किंवा आपल्याच नाभीतून सर्वत्र पसरणार्‍या कस्तुरीच्या गंधामागे इकडेतिकडे धावाधाव करून गरगर फिरून मरणारे कस्तुरीमृग झालो आहोत. याहिपेक्षा शिकारी वाजवत असलेल्या तंतुवाद्याच्या ध्वनीला (संगीताला) भुलून भुरळून त्याच्याजवळ येत येत त्यानं लावलेल्या फासात आपणहून अडकणारे वनमृग! इतकंच काय पण –
‘मृग सोन्याचा जगी असंभव |
तरीही तयाला भुलले राघव |
श्रीरामाला चकवुनी गेल्या |
शक्ती मायाविनी|’
अशी कांचनमृगामागे धावणार्‍या रामासारखी आपली अवस्था झालीय. ज्या सीतेनं कांचनमृगाच्या सोनेरी कातड्याचा (कांतीचा) आग्रह धरला तिचं तर रावणाकडून हरण झालंच पण पुढे सारं रामायणही घडलं. असो.
प्रपंचात किती गुंतायचं – संसाराच्या व्यापात किती अडकायचं – विविध उपभोगात किती रंगून जायचं याचं गणित ज्याचं त्यानं सोडवायचं असतं. ते कसंही सोडवलं तरी चालतं पण उत्तर मात्र समाधान – शांती – आनंद हेच असलं पाहिजे.
३) नित्यं च समचित्तत्वं इष्टानिष्ट उपपत्तिषु – ‘समचित्त’ हा भगवंताचा आनंदी जीवनासाठीचा आवडता सिद्धांत आहे. निरनिराळे शब्दप्रयोग करून गीतेत ही चित्ताची स्थिरता – समता सुचवली आहे. हे जीवनाचं – आनंदाचं – साधनही आहे नि साध्यही! प्रपंचात इष्ट-अनिष्ट, अनुकूल-प्रतिकूल घटना-प्रसंग घडणारच – नको असलेले अनुभव समोर उभे राहतात व हवी असलेली सुखं दूर पळतात. वाईट म्हणजे
‘सुख सुख म्हणता हे दुःखं ठाकून आहे’ किंवा
‘सुखाची घडी लोटतां सूख आहे|
पुढे सर्व जाईल काही न राहे ॥
हे जीवनाचं म्हणजेच प्रपंचाचं स्वरूप आहे. रूप नेहमी नष्ट होतंच असतं. सतत बदलत असतं. पण स्वरूप सदैव स्थिर असतं. यावर लक्ष केंद्रित करून प्रपंच कर्तव्य भावनेनं केला पाहिजे. तो कसा करायचा याचंच तर ज्ञान भगवंत देताहेत.
आसक्तीचा त्याग – अनासक्तीचा अभ्यास, प्रपंचाला योग्य तेवढंच महत्त्व देणं अन् हवी-नको असलेली कोणतीही घटना घडली तरी मनाचा तोल जाऊ न देणं ही आनंदमय जीवनाची त्रिसुत्री भगवंत सांगून राहिले. हे कुरुक्षेत्रावरील अर्जुनाला म्हणजेच कर्मक्षेत्रातील आपल्या सर्वांना समुपदेशन आहे. सर्वांसाठी – सर्व काळासाठी – सर्व घटना, प्रसंगांसाठी! नाही तरी तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे –
‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग|
अंतर्बाह्य जग आणि मन॥
आहे ना असं आपलं जीवन!