असंतोषाचा उद्रेक

0
5

‘पेराल ते उगवते’ म्हणतात. पाकिस्तानच्या नशिबात सध्या हे असावे. पाकिस्तानने जन्मापासून भारताविरुद्ध दहशतवाद पेरला. आता त्याची फळे तो भोगतो आहे. बलुचिस्तानच्या जनतेचा पाकिस्तान सरकार, आयएसआय आणि लष्कराने सदोदित छळ केला. असंख्य लोकांना बेपत्ता केले, कित्येकांना कैदेत टाकून हाल हाल केले. बलुची लोकांचा लढा दडपून टाकण्याचा वर्षानुवर्षे परोपरीने प्रयत्न केला. नोकऱ्या, रोजगाराच्या संधी त्यांच्यापासून हिरावून घेतल्या गेल्या. त्यांच्या नैसर्गिक संसाधनांची, खनिजांची चीनच्या मदतीने लूट केली गेली. त्या सगळ्याचा राग दहशतवादाच्या मार्गातून बलुची व्यक्त करू लागले आहेत. दहशतवाद हा वाईटच, परंतु क्वेटाहून पेशावरकडे जाणारी अख्खीच्या अख्खी नऊ डब्यांची रेलगाडी अपह्रत करून बलोच लिबरेशन आर्मीने सध्या पाकिस्तानला जो दणका दिला आहे, त्याची ही सारी पार्श्वभूमी दुर्लक्षिता येणार नाही. ह्या अपहरणनाट्यासंदर्भात परस्परविरोधी दावे दोन्ही बाजूंकडून केले जात आहेत, त्यामुळे सत्य काय हे कळणे अवघड बनले आहे, मात्र, स्वतंत्र बलुचिस्तानच्या पुरस्कर्त्यांनी पाकिस्तानला दिलेला आजवरचा हा सर्वांत मोठा दणका आहे हे मात्र निश्चित. बलुचिस्तानमधील क्वेटाहून खैबर पख्तुनख्वामधील पेशावरकडे जाणाऱ्या जफर एक्सप्रेसचे बलोच लिबरेशन आर्मीने आपली मजीद ब्रिगेड आणि स्पेशल टॅक्टिकल ऑपरेशन स्क्वॉड म्हणजे एसटीओएस आणि फतेह स्क्वॉडच्या मदतीने अपहरण केले. तेही अशा दुर्गम ठिकाणी की पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनाही हे अपहरणनाट्य संपुष्टात आणणे कठीण व्हावे. बलोच दहशतवाद्यांनी रेल्वेचा रूळ स्फोटाने उडवला आणि ही रेलगाडी पनीर व पेशी स्थानकांदरम्यान मुश्फाक येथे बोगदा क्र. 8 मध्ये रोखली. ह्या रेलगाडीतून मुख्यत्वे सुट्टीवरचे पाकिस्तानी सैनिक प्रवास करीत आहेत हे हेरून हा दहशतवादी हल्ला झालेला आहे हे लक्षात घेणे जरूरी आहे. दहशतवाद्यांनी महिला व मुलांना आधी सोडून दिले आणि पोलीस, सैनिक आणि आयएसआयशी संंबंधित असलेल्यांना ओलीस धरले आहे. त्यांना ते जवळच्या डोंगराळ प्रदेशात घेऊन गेले असल्याचे वृत्त आहे. पाकिस्तान सरकारने हॅलिकॉप्टर आणि द्रोन हल्ले चालवताच ते थांबवले नाहीत तर ओलिसांना टप्प्याटप्प्याने ठार मारण्याची धमकी बीएलएने दिली. बलोच राजकीय कैद्यांची सुटका करा, आपले जे नेते तुरुंगात डांबले गेले आहेत, त्या सर्वांना मुक्त करा अन्यथा सर्वच्या सर्व ओलिसांना ठार मारू असा निर्वाणीचा इशारा बीएलएने दिला आहे. त्यामुळे पेचप्रसंग वाढला आहे. बलोच दहशतवादी गेली अनेक वर्षे सातत्याने पाकिस्तानी सुरक्षायंत्रणा आणि चीनच्या नागरिकांना लक्ष्य करीत आहेत. पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांविरुद्ध युद्ध पुकारतानाच, चिनी अभियंत्यांच्या बसवरील हल्ला, कराचीच्या चिनी दूतावासावरील हल्ला, ग्वादारमधील पंचतारांकित हॉटेलवरील हल्ला ह्या सगळ्यातून बलुचिस्तानमधील आपल्या सोने, तांबे आदी खनिजांची लूट करणाऱ्या चीनविरुद्ध देखील बलोच दहशतवाद्यांनी आघाडी उघडली आहे. अलीकडेच क्वेटा रेल्वे स्थानकामध्ये झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात 26 जणांचा बळी गेला होता. मात्र, एका संपूर्ण रेलगाडीचेच अपहरण करण्याएवढा मोठा दहशतवादी हल्ला पहिल्यांदाच झाला आहे. सगळ्या जगाचे लक्ष आपल्या प्रश्नाकडे वेधून घेण्यात बीएलए ह्या हल्ल्यामुळे यशस्वी झाली आहे. ह्या अपहरणनाट्याची इतिश्री कशी होईल हे सांगणे कठीण आहे, परंतु बलुचिस्तानची जनता आपली गळचेपी यापुढे निमूट सहन करणार नाहीत असा संदेश ह्या दहशतवादी हल्ल्याने पाकिस्तानला दिलेला आहे. बलोच आंदोलन दहशतवादाच्या मार्गाने जाऊ नये असे वाटत असेल तर पाकिस्तानने त्या प्रांतावरील अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करावा लागेल. पंजाब्यांच्या पदरात सगळे लाभ टाकण्याची वृत्ती सोडावी लागेल. भारताची फाळणी झाली आणि पाकिस्तान बनले तेव्हा आजच्या बलुचिस्तानचा सगळा भाग असलेल्या तत्कालीन संस्थानाने स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पाकिस्तानने जोरजबरदस्तीने ते आपल्या घशात घातले. त्यामुळे बलोच लोक पाकिस्तानात मनाने कधीच सामील झालेले नाहीत आणि होणार नाहीत. त्यामुळे दडपशाहीच्या जोरावर बलोच आंदोलन चिरडून टाकण्याची स्वप्ने यापुढे तरी पाकिस्तान पाहणार नाही अशी अपेक्षा आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न झाले नाहीत, तर जो फुटिरतावाद काश्मीरमध्ये धुमसत ठेवला, तोच अधिक तीव्र स्वरूपात ह्या पाकच्या प्रांतांमध्ये पेट घेईल. काश्मीर प्रश्न पाकिस्तान ह्यापुढे जेव्हा जेव्हा उपस्थित करील, तेव्हा बलुचिस्तानचा विषय, पाकव्याप्त काश्मीरचा विषय पुढे आल्याशिवाय राहणार नाही हे एव्हाना त्यांना कळले असेलच.