आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आपने काल देश पातळीवर एका दिवसाच्या सामूहिक उपोषणाचा जो कार्यक्रम आयोजित केला होता त्याचाच एक भाग म्हणून काल रविवारी आपने पणजीतील आझाद मैदानावर सामूहिक उपोषण केले. यात इंडिया आघाडीचे घटक या नात्याने काँग्रेस पक्षाचे नेतेही सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना ज्येष्ठ काँग्रेस नेते व काँग्रेस व इंडिया आघाडीचे उत्तर गोव्यातील उमेदवार ॲड. रमाकांत खलप यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध कथित मद्य घोटाळाप्रकरणी कोणतेही पुरावे नसताना केंद्र सरकारने त्यांना आरोपी ठरवून तुरुंगात डांबले असल्याचा आरोप केला.
केंद्र सरकारने या प्रकरणी गेल्या 2 वर्षांपासून केजरीवाल यांच्याविरुद्ध चौकशी सुरू केली होती. मात्र, त्या प्रकरणी त्यांना कोणतेही पुरावे सापडले नसतानाही लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांना अटक करून तुरुंगात डांबल्याचे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांविरुद्ध सुरू केलेले हे सुडाचे राजकारण असल्याचा आरोप खलप यांनी यावेळी
केला.
आपचे आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी, अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे मोदी सरकारच्या इलेक्टोरॉल बाँड घोटाळा उघड झाला असून ह्या कथित मद्य घोटाळाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका आरोपीकडून भाजप सरकारने 55 कोटी रु. इलेक्टोरॉल बाँडच्या रुपात मिळवले असून त्यानंतर त्याची सुटका करण्यात आल्याचे सांगितले.
आपचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर, पक्षाचे आमदार क्रुझ सिल्वा, काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्टा व काँग्रेस नेते व दक्षिण गोवा उमेदवार विरियातो फर्नांडिस यांचीही यावेळी भाषणे झाली.
यावेळी करण्यात आलेल्या सामूहिक उपोषणात गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, राजन घाटे, वाल्मिकी नाईक, रामराव वाघ, सिद्धेश भगत व काँग्रेस व आम आदमी पक्षाच्या अन्य नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाग घेतला.