अयोध्या रेल्वे स्थानकाचा चेहरा पालटणार!

0
138

>> राममंदिराची प्रतिकृती : १०४ कोटींची तरतूद

राममंदिराचा भूमिपूजन सोहळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानंतर प्रत्यक्ष मंदिर उभारणीला सुरुवात होईल. दरम्यान, भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरु आहे. सर्व सार्वजनिक ठिकाणे नव्या ढंगात सजली आहेत. यात आता आणखी एका ठिकाणाची भर पडणार आहे, ती म्हणजे रेल्वे स्टेशनची. आता अयोध्येच्या रेल्वे स्टेशनचा चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे. राम मंदिराच्या प्रतिकृतीच्या रुपात या रेल्वे स्टेशनची पुन:र्बांधणी केली जाणार आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाने निधीमध्येही भरघोस वाढ केली आहे.

प्रत्यक्ष राममंदिर तयार होण्यापूर्वीच पुढील दोन वर्षात अयोध्यावासियांना मंदिराच्या प्रतिकृती स्वरुपात रेल्वे स्टेशन मिळणार आहे. या स्टेशनच्या पुन:र्विकासासाठी रेल्वेने बजेटमध्ये वाढ केली असून ८० कोटींवरुन ती १०४ कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

५ ऑगस्टला गोव्यातील मंदिरांवर रोषणाई करा

>> भाजप प्रदेशाध्यक्षांचे आवाहन

राममंदिर हे राष्ट्रमंदिर असून हे मंदिर म्हणजे देशाच्या अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे भारतभरातील लोकांप्रमाणेच गोव्यातील जनतेनेही ५ ऑगस्ट रोजी राममंदिरस्थळी जे भूमीपूजन होणार आहे त्यानिमित्त राज्यातील सर्व मंदिरांवर रोषणाई करावी.
तसेच शक्य असल्यास आपल्या घरांवरही रोषणाई करावी, असे आवाहन काल प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे व भाजप प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून बोलताना केले.

५ ऑगस्ट रोजी दुपारी १२.१५ वा. रामजन्मभूमी येथे भूमीपूजन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. राम मंदिर हे देशाच्या अस्मिततेचे प्रतीक असल्याचे सांगून ते उभे होत आहे ही देशासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे आर्लेकर म्हणाले. ५ ऑगस्ट रोजी दुपारी १२.१५ वा. लोकांनी घंटानाद करावा. मंदिरात आरती व पूजनाचा कार्यक्रम करावा, तसेच मंदिरांवर रोषणाई करावी, असे आर्लेकर म्हणाले.