अमेरिका फर्स्ट!

0
112

अमेरिकेसारख्या जागतिक महासत्तेची सत्तासूत्रे हाती घेताना केलेल्या आपल्या पहिल्यावहिल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भावी वाटचालीचे सुस्पष्ट सूतोवाच केले आहे. ते राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरल्याच्या दिवसापासून जे बोलत आले, त्याचाच ठाम पुनरुच्चार त्यांच्या या पहिल्या भाषणात दिसून आला. ट्रम्प यांनी अमेरिकेत करू घातलेल्या परिवर्तनाची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी मुळात ट्रम्प यांच्या या देदीप्यमान यशामागील कारणे समजून घेणे आवश्यक आहे. त्यांच्यासारखा राजकारणापासून दूर असलेला उपरा माणूस अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदापर्यंतची पायरी चढू शकला त्याचे कारण त्यांनी सर्वसामान्य अमेरिकी माणसाची नस ओळखली. सामान्य अमेरिकी व्यक्तीपुढील रोजगाराची समस्या, तेथील मध्यमवर्गीयांचा संघर्ष, जागतिक आर्थिक मंदीनंतरच्या काळात अमेरिकी उद्योगांमध्ये निर्माण झालेली संकटे, त्याचे कुटुंबांवर झालेले परिणाम या सगळ्या सुप्त असंतोषावर ट्रम्प स्वार झाले आणि बघता बघता सगळ्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून येथवर येऊन पोहोचले. साहजिकच या प्रवासात या सामान्य अमेरिकी माणसावर आपण तुझेच खरेखुरे प्रतिनिधी आहोत हे ठसवणे आवश्यक होते. स्वतः एक अब्जाधीश उद्योगपती असूनही आपण सामान्यांच्या व्यथावेदनांशी एकरूप आहोत असा विश्वास ट्रम्प यांनी निर्माण केला. ते करीत असताना प्रस्थापितांना शिंगावर घेतले. त्यांच्याविरुद्ध अर्वाच्च विधाने केली, प्रतिष्ठित माध्यमांना लक्ष्य केले, त्यांची खिल्ली उडवली. अमेरिकी जनतेच्या देशभक्तीला साद घालत परिवर्तनाची हाक दिली. रूढ, प्रचलित धोरणे कशी चुकीची आणि राष्ट्राला रसातळाला नेणारी आहेत त्यावर झोड उठवत ट्रम्प नावाचे हे वादळ सुसाट निघाले आणि वॉशिंग्टनपर्यंत येऊन थडकले. त्यांच्या पहिल्यावहिल्या भाषणात आपल्या आजवर सांगत आलेल्या कृतिकार्यक्रमाचे प्रतिबिंब पडले आहे. आपण सत्तासूत्रे हाती घेत नसून ती तुम्हाला – जनतेला परत करीत आहोत असा भाव ट्रम्प यांनी त्यात व्यक्त केला आहे. बंद पडलेले कारखाने, कमी झालेले रोजगार, उघड्यावर पडलेले कामगार, त्यांची संघर्ष करणारी कुटुंबे, फैलावलेली व्यसने आणि गुन्हेगारी यांचा आवर्जून उल्लेख करीत ट्रम्प यांनी मागील राजवटीने जे केले ते सगळे धोरणात्मक निर्णय आपण बदलणार आहोत असे स्पष्ट संकेत दिले आहेत. आजवर आम्ही आमच्या उद्योगांचा बळी देत विदेशी उद्योगांना समृद्ध केले, इतर देशांच्या सैन्यदलांना सक्षम बनवताना स्वतःच्या सैन्याची उपेक्षा केली, इतर देशांच्या सीमा राखताना स्वतःच्या रक्षणाकडे दुर्लक्ष केले. विदेशांत अब्जावधी डॉलर खर्च करताना देशांतर्गत साधनसुविधांकडे लक्ष दिले नाही, अशा तोफा ट्रम्प यांनी या पहिल्याच भाषणात डागल्याचे दिसेल. ‘अमेरिका फर्स्ट’, म्हणजे यापुढे केवळ अमेरिकेच्या हिताला प्राधान्य हा ट्रम्प यांचा देशाला दिलेला कानमंत्र आहे. वेगवेगळ्या व्यापार करारांना उलथवून टाकण्याची, परावलंबी उद्योगांवर कर लादण्याची, केवळ अमेरिकेच्या हिताला प्राधान्य देण्याची जी कडवी भाषा ट्रम्प करीत आले, ती प्रत्यक्षात उतरवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी ‘ओबामाकेअर’ म्हणूनच ओळखल्या जाणार्‍या आरोग्य विमा योजनेवरील खर्च कमी करण्याचे आदेश त्यांनी जारी केले आहेत. ट्रम्प यांच्या हाती आलेली सत्ता हे केवळ ओबामा ते ट्रम्प एवढे नेतृत्वबदलापुरते मर्यादित सत्तांतर नाही. डेमोक्रॅट ते रिपब्लिकन असे हे आमूलाग्र सत्तांतर आहे. साहजिकच ओबामांच्या कारकिर्दीतील धोरणांना समूळ उलथवून लावत ट्रम्प आपली वाटचाल करणार आहेत, हे समजून घेणे आवश्यक आहे. या उलथापालथीचे जगभरात परिणाम होणे अटळ आहे, कारण आजचे जग एकमेकांशी जोडलेले जग आहे हे विसरून चालणार नाही.