अमित नाईक याचा आत्महत्येचा प्रयत्न

0
4

>> कोठडीत केले फिनेलचे प्राशन

>> बांबोळी गोमेकॉत उपचार सुरू

जमीन घोटाळ्यातील आरोपी सिद्दिकी ऊर्फ सुलेमान खान याला गुन्हा अन्वेषण पोलिसांच्या कोठडीतून पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप असलेला आरोपी अमित नाईक याने घरातील फरशी धुण्यासाठी वापरण्यात येत असलेले फिनेल प्राशन करुन काल आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याला उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. आरोपी अमित नाईक याने फिनेल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने पोलिसांचे धाबे दणाणले आहेत.

पोलीस सेवेतून हकालपट्टी करण्यात आलेल्या आयआरबी पोलीस कॉन्सटेबल संशयित अमित नाईक याने फिनेल प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सदर घटना काल रविवारी सकाळी 8 च्या सुमारास जुने गोवे पोलिसांच्या रायबंदर पोलीस चौकीमध्ये घडल्याचे समोर आले. संशयितावर सध्या गोमेकॉत उपचार सुरू आहेत.

अमित नाईक याला आरोपी सिद्दिकी याची पोलीस कोठडीतून सुटका करण्यासाठी तीन कोटींची ऑफर देण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे यात किती तथ्य आहे आणि जर त्याला खरोखरच तशी ऑफर देण्यात आली होती तर ती कुणी दिली होती याचा तपास आता पोलिसांना करावा लागणार आहे. कुणाच्या दडपणाखाली येऊन त्याने ते कृत्य केले होते की काय हे सगळे जाणून घेण्यासाठी पोलिसांना या घटनेच्या मुळाशी जाऊन कोणत्याही दडपणाशिवाय काम करावे लागणार आहे असे विरोधकांचे म्हणणे आहे.

अमितची शरणागती
संशयित अमित नाईक हा शुक्रवारी दि. 13 रोजी रात्री हुबळी पोलिसांना शरण आल्यानतंर दुसऱ्या दिवशी शनिवारी 14 रोजी जुने गोवे पोलिसांनी अमित याला अटक केली होती. अटक केल्यानंतर संशयिताला पोलिसांनी रायबंदर पोलीस चौकीतील कोठडीत ठेवले होते. काल रविवारी सकाळी अमितने स्वच्छतागृहात जाण्याचे नाटक करत तिथे साफसफाई करणाऱ्या महिलेच्या हातातून फिनेलची बाटली घेत फिनेल प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना ही घटना कळताच त्याला त्वरित पोलिसांनी गोमेकॉत दाखल केले असून तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांची बैठक
सिद्दिकीचे पलायन व अमित नाईक याचा आत्महत्येचा प्रयत्न या दोन्ही विषयांवर काल रविवारी दुपारी पोलीस अधिकाऱ्याची उच्चस्तरीय बैठक झाली.

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : विजय सरदेसाई

जमीन घोटाळ्यातील आरोपी सुलेमान खान सिद्दिकी पलायनप्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर टीका करताना गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या आरोपीला मुख्यमंत्री पाठीशी घालत असल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला. सरकारने जमीन घोटाळा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ज्या एक सदस्यीय समितीची स्थापना केली होती त्या आयोगाला सरकारने योग्य काम करू दिले नसल्याचा आरोपही सरदेसाई यानी काल केला.

कोणाचीही गय नाही ः मुख्यमंत्री
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे काम चालू असून या आरोपीला पळून जाण्यास मदत केलेला पोलीस शिपाई अमित नाईक याला सेवेतून बडतर्फ केले आहे. या प्रकरणात ज्या ज्या कुणाचा हात आहे त्यांची गय केली जाणार नसल्याचे काल मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.