अफरातफरप्रकरणी अष्टगंधा अर्बनच्या 4 माजी संचालकांना अटक

0
4

पीर्ण-बार्देश येथील अष्टगंधा अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये अंदाजे 11.28 कोटींच्या फसवणूक प्रकरणामध्ये सोसायटीच्या 4 माजी संचालकांना गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने काल अटक केली. प्रकाश एल. नाईक, प्रकाश व्ही. नाईक, प्रकाश ए. नाईक आणि कृष्णा हळर्णकर अशी अटक केलेल्या माजी संचालकांची नावे आहेत.
या प्रकरणी गुंतवणूकदार आणि सोसायटीच्या प्रशासक यांनी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाकडे (ईओसी) तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी योग्य कारवाई होत नसल्याचे दिसून आल्यानंतर गुंतवणूकदारांनी गोवा खंडपीठात याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार, सोसायटीवर प्रशासक समिती नियुक्त केला होता. त्यानंतर प्रशासक समितीचे अध्यक्ष मंगेश फडते यांनी ईओसीकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार, 14 जुलै 2023 पूर्वी माजी संचालक मंडळाने एकमेकांच्या संगनमताने, अप्रामाणिक हेतूने विविध बेकायदेशीर कृत्ये करून अष्टगंधा अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या निधीचा गैरवापर केल्याचे समोर आले. तसेच माजी संचालकांनी काल्पनिक आणि बनावट कागदपत्रांद्वारे कर्ज दिल्याचे उघड झाले. याशिवाय वैयक्तिक खात्यात निधीचे बेकायदेशीर हस्तांतरण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. परिणामी माजी संचालक मंडळ हे सोसायटीचे ठेवीदार तसेच सदस्यांच्या ठेवी परत करण्यात अयशस्वी ठरले. माजी संचालक मंडळाने 11 कोटी 28 लाख 93 हजार 213 रुपयांची फसवणूक केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात या प्रकरणातील संशयित दिगंबर परब, मोहनदास देसाई, प्रकाश एल. नाईक, प्रकाश व्ही. नाईक, कृष्णा हळर्णकर, प्रकाश ए. नाईक आणि प्रकाश एन. कांदोळकर या माजी संचालकांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केले होते. संशयितांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला गुंतवणूकदारांनी विरोध करणारा अर्ज न्यायालयात दाखल केला होता. न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर संशयितांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावले. त्यानंतर पोलिसांनी चार माजी संचालकांना अटक केली.

एकूण 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
आर्थिक गुन्हा विभागाने या प्रकरणी अकरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. या प्रकरणी माजी संचालक रवींद्र नाईक (रा. मुळगाव-डिचोली), दिगंबर परब (रा. डिचोली), मोहनदास देसाई (रा. कुडचडे), श्रद्धा नाईक, प्रकाश एल. नाईक, प्रकाश व्ही. नाईक आणि प्रकाश ए. नाईक (सर्व रा. पीर्ण-बार्देश), कृष्णा हळर्णकर (रा. शिरसई), चंद्रशेखर बर्वे (रा. अस्नोडा-बार्देश), प्रकाश कांदोळकर (रा. पार्से-पेडणे) आणि भारत परब (रा. अस्नोडा) यांचा समावेश आहे.