अफगाणिस्तानमध्ये अखेर तालिबान सरकारची घोषणा

0
37

>> मोहम्मद हसन अखुंद होणार पंतप्रधान

अफगाणिस्तानमध्ये अखेर नव्या तालिबान सरकारची काल घोषणा करण्यात आली. मोहम्मद हसन अखुंद हे पंतप्रधान असणार आहेत. तालिबानचे प्रवक्ते जैबीहुल्लाह मुजाहिद यांनी माध्यमांना माहिती देताना सरकारमधील अन्य पदाधिकार्‍यांच्या नावांची घोषणादेखील करण्यात आल्याचे सागितले.

आतापर्यंत तालिबान सरकारबाबत अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत होते. वेगवेगळ्या शक्यता चर्चिल्या जात होत्या. तालिबानचे जुने नेते अखुंदजादा हेच सरकारचे प्रमुख असतील, अशी जोरदार चर्चा होती. मात्र मोहम्मद हसन अखुंद हे नव्या सरकारचे नेतृत्व करणार असल्याचे काल जाहीर करण्यात आले. तालिबानचे सर्वोच्च नेते अखुंदजादा यांनीच अखुंद यांच्या नावाचा प्रस्ताव सरकारच्या प्रमुखपदासाठी ठेवला आणि इतरांनी तो एकमताने मान्य केल्याची माहिती यावेळी तालिबानकडून देण्यात आली.

मोहम्मद हसन अखुंद हे रहबारी शूरा या परिषदेचे ते नेते आहेत. तालिबान चळवळीच्या संस्थापकांपेकी अखुंद एक आहेत.
गेल्या १५ ऑगस्ट रोजी तालिबानने काबूलवर ताबा मिळवला होता. त्यानंतर लगेचच तालिबानकडून सरकारची घोषणा करण्यात येईल, असे सांगण्यात येत होते. मात्र त्यानंतर अंतर्गत सत्तासंघर्ष, पंजशीर प्रश्न अशा विविध कारणांमुळे तालिबानच्या सरकार स्थापनेचा मुहूर्त पुढे जात होता. सरकार स्थापनेबाबतच्या अनेक शक्यताही समोर येत होत्या. मात्र आता तीन आठवड्यानंतर तालिबान सरकारची घोषणा झाली आहे.