अफगाणिस्तानचा २२४ धावांनी विजय

0
119

राशिद खान याच्या सामन्यातील ११ बळींच्या जोरावर अफगाणिस्तानने काल सोमवारी यजमान बांगलादेशचा २२४ धावांनी पराभव करत आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसर्‍या विजयाची चव चाखली.

शेवटच्या दिवशी विजयासाठी अफगाणिस्तानला केवळ ४ गड्यांच्या आवश्यकता होती. परंतु, पहिली दोन्ही सत्रे पावसामुळे वाहून गेली. शेवटच्या सत्रातील केवळ २१ षटकांचा खेळ होता. त्यामुळे सामना अनिर्णित राखण्याची सुवर्णसंधी बांगलादेशकडे होती. परंतु, केवळ ३.२ षटकांचा खेळ बाकी असताना बांगलादेशचा शेवटचा गडी सौम्य सरकार (१५) बाद झाला व पाहुण्यांनी ऐतिहासिक विजय साकारला. पावसामुळे दुुपारी १ वाजता सामन्याला सुरुवात झाली. दिवसातील १३ चेंडूंचा खेळ झाल्यानंतर पुन्हा पावसाचे आगमन झाले. ४ वाजून २० मिनिटांनी सामना पुन्हा सुरू झाला.

व्यत्ययामुळे एकाग्रता भंग पावलेल्या शाकिबला झहीर खानने पहिल्याच चेंडूवर माघारी धाडत बांगलादेशच्या अडचणीत भर टाकली. डावातील ४७व्या षटकात शाकिब परतल्यानंतर मिराझ व सरकार यांनी ५५व्या षटकापर्यंत अफगाणिस्तानला यशापासून वंचित ठेवले. राशिदने मिराझला बाद करत ही जोडी फोडताना संघाला विजयापासून केवळ दोन पावलांवर आणून ठेवले. अंधुक होत असलेल्या प्रकाशामुळे अफगाणिस्तानची धाकधुक वाढली होती. विजयाच्या दारातून अनिर्णिततेवर समाधान मानण्याची शक्यता वाढत असतानाच राशिदने आपल्या पुढच्याच षटकात ताईजुल (०) याला खाते खोलण्याची संधी न देता पायचीतच्या सापळ्यात अडकवले. राशिदने यानंतर सौम्य सरकारला शॉर्टलेगवर इब्राहिमकरवी झेलबाद करत संघाचा विजय साकारला. पहिल्या डावात ५५ धावांत ५ गडी बाद केलेल्या राशिदने दुसर्‍या डावांत ४९ धावांत ६ गडी बाद केले. अफगाणिस्तानकडून कसोटी क्रिकेटमध्ये एका सामन्यात १० किंवा त्याहून अधिक बळी घेणारा राशिद खान हा पहिला खेळाडू ठरला.

धावफलक
अफगाणिस्तान पहिला डाव ः सर्वबाद ३४२
बांगलादेश पहिला डाव ः सर्वबाद २०५
अफगाणिस्तान दुसरा डाव ः सर्वबाद २६०
बांगलादेश दुसरा डाव ः (६ बाद १३६ वरून) ः शाकिब अल हसन झे. झाझाय गो. गो. झहीर ४४, सौम्य सरकार झे. इब्राहिम गो. गो. राशिद १५, मेहदी हसन मिराझ पायचीत गो. राशिद १२, ताईजुल इस्लाम पायचीत गो. राशिद ०, नईम हसन नाबाद १, अवांतर ६, एकूण ६१.४ षटकांत सर्वबाद १७३
गोलंदाजी ः यामिन अहमदझाय ४-१-१४-०, मोहम्मद नबी २०-५-३९-१, राशिद खान २१.४-६-४९-६, झहीर खान १५-०-५९-३, कैस अहमद १-०-६-०

सामन्यात दहा बळी घेणारे पहिले गोलंदाज
ऑस्ट्रेलिया ः फ्रेड्रिक स्पूफर्थ (१८७९, ३), इंग्लंड ः बिली बेट्‌स (१८८३, ११), दक्षिण आफ्रिका ः चार्ली लेवलिन (१९०२, १०), न्यूझीलंड ः जॅक कोवी (१९३७, १३), वेस्ट इंडीज ः विल्फ फर्ग्युसन (१९४८, २४), भारत ः विनू मंकड (१९५२, २५), पाकिस्तान ः फझल महमूद (१९५२, २), श्रीलंका ः चामिंडा वास (१९९५, ६२), झिंबाब्वे ः ऍडम हकल (१९९७, २४), बांगलादेश ः इनामूल हक ज्युनियर (२००५, ३६), अफगाणिस्तान ः राशिद खान (२०१९, ३)