अपात्रता याचिकेवरील सुनावणी अधिवेशनानंतर

0
21

गोवा प्रदेश कॉँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी कॉँग्रेसचे आमदार दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांच्याविरोधात दाखल केलेल्या अपात्रता याचिकेवरील सुनावणी पावसाळी अधिवेशनानंतर होणार आहे.

कॉँग्रेस पक्षामध्ये गेल्या रविवार १० जुलै रोजी झालेल्या बंडखोरीच्या पार्श्‍वभूमीवर ही अपात्रता याचिका दाखल करण्यात आली आहे. कॉँग्रेसने या बंडखोरीच्या प्रयत्नासाठी आमदार दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांना जबाबदार धरले आहे.
अमित पाटकर यांनी दिलेल्या अपात्रता याचिकेवर कायद्यानुसार प्रक्रिया केली जाणार आहे.

सध्या विधानसभा सचिवालयाचे अधिकारी पावसाळी अधिवेशनात व्यस्त आहेत. त्यामुळे अधिवेशनानंतर या याचिकेवर सुनावणी घेतली जाणार आहे, अशी माहिती सभापती रमेश तवडकर यांनी दिली. कामत आणि लोबो यांना नोटीस पाठविण्याची विनंती सभापतींना केली आहे, अशी माहिती याचिकादाराचे वकील ऍड. अभिजीत गोसावी यांनी दिली.