रेंट-अ-कारच्या जोरदार धडकेने दुचाकीस्वार कोसळला मांडवी नदीत; शोध सुरू; दाबोळीतही जीवघेणा अपघात
येथील जुन्या मांडवी पुलावर काल संध्याकाळी 5.30 च्या सुमारास भरधाव रेंट-अ-कारने ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीचालक उसळून थेट मांडवी नदीत पडला. मांडवी नदीत पडलेल्या दुचाकीचालकाचा शोध घेण्याचे काम अग्निशामक दल, नौदल आणि तटरक्षक दलाच्या जवानांनी हाती घेतले होते; मात्र उशिरापर्यंत त्या दुचाकीस्वाराचा शोध लागला नाही. सदर दुचाकीस्वाराची ओळख पटली आहे. या प्रकरणी कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, काल दाबोळी येथे ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने एका 60 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.
सविस्तर माहितीनुसार, येथील जुन्या मांडवी पुलावरून एक पर्यटक भाड्याने घेतलेल्या रेंट-अ-कार (क्र. जीए-03-व्ही-1709) ने भरधाव वेगाने ओव्हरटेक करत निघाला होता. त्याचवेळी जीए-03-ई-4174 क्रमांकाच्या समोरून येणाऱ्या दुचाकीला कारची जोरदार धडक बसली. कारची दुचाकीला बसलेली धडक एवढी जबरदस्त होती की, त्याबरोबर दुचाकीचालक हवेत उसळून थेट मांडवी नदीत कोसळला. हा दुचाकीचालक मांडवी नदीत कोसळताना काही क्रूझ बोटीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्याला पाहिले. या घटनेनंतर मांडवी पुलावरील प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी तात्काळ पोलीस आणि अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली. त्याचवेळी क्रूझ बोटीवरील काही कर्मचाऱ्यांनी नदीत पडलेल्या दुचाकीचालकाला वाचवण्यासाठी स्पीड बोटीद्वारे धाव घेतली. त्याला वाचवण्यासाठी तीन स्पीड बोटींनी धाव घेतली; मात्र त्याच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच तो पाण्यात दिसेनासा झाला.
अपघातानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करून कार आणि दुचाकी हटवली. तसेच कारचालक अंकित त्रिपाठी (30 वर्षे, रा, ओडिसा) या पर्यटकाला ताब्यात घेतले. दरम्यानच्या कालावधीत अग्निशामक दलाने शोधमोहीम हाती घेतली. मांडवी नदीतील स्पीड बोटींच्या मदतीने दुचाकीचालकाचा शोध संपूर्ण नदीपात्रात शोध घेतला; मात्र तो रात्री उशिरापर्यंत सापडू शकला नाही.
उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी अपघात स्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. अपघातानंतर उसळून मांडवी नदीत पडलेल्या दुचाकीस्वाराचा शोध घेण्याचे काम अग्निशमन दल, नौदल आणि तटरक्षक दलाने सुरू केले आहे, अशी माहिती अक्षत कौशल यांनी दिली.
तटरक्षक दल आणि नौदलाच्या खोल समुद्रातील पाणबुड्यांना शोधमोहिमेसाठी पाचारण करण्यात आले आहे. अपघातस्थळी दुचाकीस्वाराचे हेल्मेट सापडले आहे. या प्रकरणी संशयित पर्यटक कारचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे, त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. कारचालकाची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे, असेही कौशल यांनी सांगितले.