अन्य खात्यांप्रमाणेच राज्यात स्वतंत्र युवा व्यवहार खाते हवे

0
5

क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री रमेश तवडकर यांच्याकडून अपेक्षा व्यक्त; 22 व्या युवा महोत्सवाचे उद्घाटन

राज्यात युवा पिढीच्या विकासात गतीचा अभाव दिसून येत आहे. राज्यातील युवा पिढीतील नैराश्य दूर करून तिला सशक्त बनविण्यासाठी स्वतंत्र युवा व्यवहार खात्याची गरज आहे, अशी अपेक्षा क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री रमेश तवडकर यांनी काल व्यक्त केली. पणजीतील कला अकादमीत आयोजित दोन दिवसीय 22 व्या राज्य युवा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

‘देशाच्या विकासात युवकांची भूमिका’ असा यंदा युवा महोत्सवाचा विषय आहे. देशाच्या विकासात युवा पिढीचे योगदान महत्त्वाचे आहे. सर्वच युवक अभ्यासात हुशार असत नाही. युवा वर्गामध्ये विविध गुण असतात. त्यांच्या कलागुणांना चालना देण्यासाठी खास धोरणाची गरज आहे. देशाच्या उभारणीमध्ये युवकांना सामावून घेण्याची गरज आहे, असेही मंत्री तवडकर यांनी सांगितले.

राज्यात कला-संस्कृती, दिव्यांग, समाज कल्याण, आदिवासी कल्याण यासारख्या खात्याप्रमाणे युवा वर्गाच्या विकासासाठी स्वतंत्र खाते युवा खात्याची नितांत गरज आहे. स्वतंत्र युवा खात्याकडून युवा वर्गाच्या समस्या सोडवून त्यांना विकासाकडे नेण्यासाठी उपक्रम राबविले जाऊ शकतात, असेही तवडकर म्हणाले.
राज्यातील युवा वर्ग निराश, हताश झालेला दिसून येत आहे. युवा वर्गातील नैराश्य दूर करून त्यांना विकासाकडे नेण्याची गरज आहे. युवा वर्गाचे प्रश्न सोडवून भविष्य उज्वल बनविण्याचे काम स्वतंत्र युवा खाते करू शकते, असेही मंत्री तवडकर यांनी सांगितले.
यावेळी क्रीडा सचिव संतोष सुखदेव, क्रीडा व युवा व्यवहार खात्याचे संचालक डॉ. अजय गावडे यांची उपस्थिती होती. राज्य युवा महोत्सवानिमित्त राज्यातील उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या युवा महोत्सवाचा समारोप 2 डिसेंबरला होणार आहे.