अनोळखी क्रमांकावरून येणार्‍या फोनच्या त्रासातून होणार सुटका

0
11

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायकडून आता लवकरच एक महत्वाची सेवा सुरू केली जाणार आहे. त्याद्वारे तुमची अनोळखी मोबाईल क्रमांकापासून सुटका होणार आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला अनेक वेळा अनोळखी क्रमांकावरुन आलेले फोन उचलण्याचा कंटाळा येतो, तर काहींना अनोळखी क्रमांकावरून आलेल्या फोनची भीती देखील वाटते. मात्र, आता सरकारकडून एक अशी सुविधा अमंलात आणली जाणार आहे. त्यामुळे तुमची अनोळखी क्रमांकापासून सुटका होणार आहे.

कारण, आता जो व्यक्ती तुम्हाला फोन करेल, त्याचे नाव मोबाईल फोनमध्ये जतन केलेले नसले, तरीही ते तुम्हाला दिसणार आहे.
या सेवेअंतर्गत आता जर एखाद्या व्यक्तीला नवीन सिमकार्ड घ्यायचे असेल, तर त्यासाठी भरण्यात येणारा केवायसी अर्जावर त्याला स्वत:ची सर्व खरी माहिती भरावी लागेल. शिवाय त्या अर्जावर सिम कार्ड वापरकर्त्याचे जे नाव असेल, तेच नाव त्या व्यक्तीने इतरांना फोन केल्यावर दिसणार आहे. ट्रायच्या या उपक्रमामुळे अनेक जणांची अनोळखी क्रमांकामुळे होणार्‍या त्रासापासून सुटका होणार आहे.

अनोळखी क्रमांकावरुन आलेल्या फोनमुळे अनेक लोकांची आर्थिक फसवणूक झाल्याची उदाहरणे आपण पाहिली आहेत. त्यामुळे आता अनोळखी क्रमांकावरून लोकांची फसवणूक करणार्‍यांवर काही प्रमाणात आळा बसणार आहे.