अनैतिक संबंधाच्या संशयावरून पालवाडा, उसगाव येथे निर्घृण खून

0
218

पत्नीबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून रवींद्र शांताराम गावडे (३३) याचा कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्याचा प्रकार पालवाडा-उसगाव येथे घडला असून संशयित आरोपी अंकुश सूर्यकांत गावडे (४३) याला फोंडा पोलिसांनी अटक केली आहे. हा खुनाचा प्रकार रविवारी २८ रोजी संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पालवाडा-उसगाव येथील अंकुश सूर्यकांत गावडे याने रवींद्र शांताराम गावडे याच्यावर कोयत्याने वार करून त्याचा खून झाला. अंकुश गावडे व त्याची पत्नी मांटुंगाळ-उसगाव येथील काजूच्या बागायतीत गेली होती. त्या ठिकाणी रवींद्र गावडेही आला होता. यावेळी अंकुशने त्याला परत जाण्यासाठी सुनावले. परंतु रवींद्रने त्याला जुमानले नाही. त्यातूनच वादाला सुरुवात झाली. या वादातून अंकुशच्या पत्नीने आपण आत्महत्या करते, अशी धमकी दिल्यावर अंकुश आपल्या मेहुण्याला आणण्यासाठी घरी परतला. अंकुश व त्याचा मेहुणा पुन्हा काजू बागायतीत परतले असता रवींद्र व त्याची पत्नी दोघेही बोलत असल्याचे दिसल्याने अंकुशने रागाच्या भरात हातात असलेल्या कोयत्याने रवींद्रच्या डोक्यावर वार केला.

कोयत्याने वार केल्याने रवींद्रने त्याचा दुसरा वार अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या हातावर वार बसला. यावेळी बोटावरही कोयत्याचा वार झाला. झटापटीवेळी तिसरा वार रवींद्रच्या खांद्यावर करण्यात आल्याने रवींद्र रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. त्याला जखमी अवस्थेत अंकुशचा मेहुणा व त्याच्या पत्नीने तिस्क-पिळये येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. तेथून अत्यवस्थ स्थितीत बांबोळी येथे इस्पितळात रात्री उपचारासाठी हलविण्यात आले होते. परंतु काल पहाटे चारच्या दरम्यान त्याचे निधन झाले. या प्रकरणी फोंडा पोलिसांनी संशयित अंकुश गावडे याला ताब्यात घेतले आहे. अंकुश गावडे याला नऊ व सहा वर्षांचे दोन मुलगे आहेत. पोलीस पथकाच्या ठसेतज्ज्ञ तसेच इतर पोलीस पथकांनी पुराव्यासाठी घटनास्थळाची कसून तपासणी केली आहे. खुनासाठी वापरण्यात आलेला कोयता पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

रवींद्रशी मैत्रीला होता विरोध
अंकुश व मयत रवींद्र यांचे नातेसंबंध असून, त्यातूनच त्याचे अंकुशच्या घरी येणे जाणे होते. त्यातूनच अंकुशच्या पत्नीशी त्याची मैत्री जुळली होती. त्याला अंकुशचा विरोध होता. तरी रवींद्र दारूच्या नशेत घरी येऊन वाद घालायचा. त्यामुळे अधूनमधून अंकुश व रवींद्र यांचे खटके उडायचे. गेल्या शनिवारीही त्यांच्यात वाद झाला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे