संसदेच्या अधिवेशनाच्या सातव्या दिवशी काल भाजपचे खासदार अनुराग ठाकूर आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यात अग्निवीर व जातनिहाय जनगणनेवरून जोरदार खडाजंगी झाली. त्यावेळी ठाकूर यांनी राहुल गांधींच्या जातीबाबत आक्षेपार्ह विधान केले. काही लोक ओबीसींबद्दल केवळ बोलत असतात. मात्र त्यांच्यासाठी (काँग्रेस) ओबीसी म्हणजे ओन्ली फॉर ब्रदर इन लॉ कमिशन, असे ठाकूर म्हणाले. त्याचबरोबर ज्यांची जात कोणाला माहिती नाही, तो जातीनिहाय जनगणेच्या गोष्टी करतोय. मी कोणाचेही नाव घेतले नाही; मात्र उत्तर द्यायला कोण उभे राहिले ते सर्वांनी पाहिले आहे, असे ठाकूर म्हणाले. दरम्यान, ठाकूर यांनी मला शिवीगाळ केली. माझा अपमान केला; परंतु मला त्यांच्याकडून माफी नको, असे राहुल गांधी संसदेत म्हणाले.