सोनाली फोगट मृत्यू प्रकरणात दिवसागणिक गोवा पोलिसांच्या प्रतिष्ठेच्या आणि विश्वासार्हतेच्या चिंधड्या उडताना दिसत आहेत. फोगट यांचा मृत्यू अत्यंत संशयास्पद परिस्थितीत झालेला असताना राज्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी शवचिकित्सा अहवालाची देखील वाट न पाहता सदर मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे जगजाहीर करून टाकले आणि गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांनी देखील त्यावर विसंबून तसे निवेदन केले. त्या भाजपच्या नेत्या असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना सारे आलबेल असल्याचे दाखविण्याची ही घाई लागली असावी. सोनालीच्या कुटुंबीयांनी आवाज उठवताच आणि राष्ट्रीय महिला आयोगापासून हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यापर्यंत केंद्रीय पातळीवरून या प्रकरणात लक्ष घातले जाताच गोव्याच्या पोलीस मुख्यालयात खळबळ माजली आणि अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंदवलेल्या प्रकरणाला नाईलाजाने जोडल्यागत ३०२ हे खुनाचे कलम जोडण्यात आले.
काल वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सोनाली फोगट हिला पाण्यातून ‘ऑब्नॉक्शियस सबस्टन्स’ म्हणजे ‘उपद्रवकारक पदार्थ’ देण्यात आल्याची कबुली दिली. हे ‘ऑब्नॉक्शियस सबस्टन्स’ काय प्रकरण आहे? फोगट यांना ‘अमली पदार्थ’ देण्यात आले असे सांगावे तर हे अमली पदार्थ संबंधित संशयितांना मिळाले कसे व कोठून या प्रश्नाचाही जाब वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना द्यावा लागला असता. त्यामुळेच हा शब्दांचा खेळ त्यांनी चालवला आहे हे स्पष्ट आहे. हे अमली पदार्थ ह्या परप्रांतीय संशयितांना एवढ्या सहजपणे कसे उपलब्ध झाले याचे उत्तर आधी पोलीस यंत्रणेने द्यावे. गोव्यात विशेषतः किनारपट्टीच्या भागात अमली पदार्थंाचा कसा सुळसुळाट झाला आहे याचा हा आणखी एक ढळढळीत पुरावा आहे.
हे अमली पदार्थ होते की नाही हे सांगायला आता व्हिसेराची वाट पाहणार्या या अधिकार्यांनी शवचिकित्साही व्हायच्या आधी सोनालीचा मृत्यू ह्रदयविकाराने झाल्याचे कोणत्या आधारावर जाहीर केले होते? त्यातून गोव्याचे देशभरात हसे तर झाले आहेच, परंतु पोलिसांचा ढिसाळपणाही समोर आला आहे. सोनाली यांच्या शरीरावर बोथट हत्याराच्या जखमा असल्याचे शवचिकित्सा अहवालात समोर आले आहे, हे सांगतानाही वरिष्ठ पोलीस अधिकारी सावधगिरी बाळगत आहेत. ह्या शारीरिक जखमा किरकोळ आहेत आणि इस्पितळात ओढत नेत असताना त्या झालेल्या असू शकतात असेही सुचवत आहेत.
या प्रकरणीचा सर्वांत महत्त्वाचा एकमेव पुरावा म्हणजे हणजूणच्या ज्या रेस्टॉरंटमध्ये फोगट जेवायला गेल्या होत्या आणि जिथे त्यांना त्यांच्या स्वीय सहायकाने पाण्यातून ‘उपद्रवकारक पदार्थ’पाजल्याचा आरोप आहे, तेथील सीसीटीव्ही फुटेज. ती तर काल दिवसभर थेट समाजमाध्यमांवर आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर झळकताना दिसत होती. या मृत्यू प्रकरणातील हा सर्वांत निर्णायक महत्त्वाचा पुरावा समाजमाध्यमांपर्यंत आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांपर्यंत कसा काय पोहोचला? हा पुरावा तातडीने ताब्यात घेऊन सीलबंद करण्याची जबाबदारी पोलिसांची नव्हती काय? हा सरळसरळ गलथानपणा आहे आणि यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर कमकुवत होऊ शकते. याला जबाबदार असणार्यांवर कारवाई का होऊ नये?
ज्यांनी आपल्याशी लैंगिक दुर्वर्तन केले असे सोनाली यांनी कुटुंबीयांना सांगितले होते, त्यांच्याच बरोबर पहाटे साडे चार वाजेपर्यंत त्या गोव्यात पार्टी का करीत होत्या, त्यांच्याबरोबर नृत्य का करीत होत्या या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. फोगट मृत्युप्रकरणात संशयिताने सोनाली यांना सदर ‘उपद्रवकारक’ पदार्थ पाजल्याची कबुली दिली आहे, परंतु तो ठार मारण्याच्या उद्देशाने पाजला गेला होता आणि तसे असेल तर त्यामागचा उद्देश नेमका कोणता होता हे सप्रमाण सांगण्याची जबाबदारी आता पोलिसांची आहे. संशयितांनी पाजलेल्या अमली पदार्थांचा ओव्हरडोस झाल्याने सोनाली यांचा मृत्यू ओढवला असेल तर ते व्हिसेरा अहवालात स्पष्ट होईलच, परंतु या हत्येमागचा उद्देश केवळ संपत्ती हडप करण्याचा आहे की काही राजकीय कारणे आहेत याचा उलगडा सोनाली यांचे कुटुंबीय करू शकतील. त्यांचे एकेकाळचे राजकीय प्रतिस्पर्धी व सध्याचे स्वपक्षीय सहकारी याच महिन्यात त्यांच्या हरियाणातील फार्महाऊसवर सदीच्छा भेटीलाही येऊन गेले होते हेही येथे नमूद करायला हवे. सोनाली यांचा काटा कोणी कशासाठी काढला हे गांभीर्याने आणि याहून अधिक ढिसाळपणा न करता पोलिसांनी शोधावे आणि काल म्हटल्याप्रमाणे, गोव्याची या प्रकरणातील अकारण बदनामी थांबवावी.