अतिधोकादायक कारखान्यांचे होणार अग्निसुरक्षा लेखापरीक्षण

0
27

>> बर्जर कारखाना आग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची माहिती

राज्यातील अतिधोकादायक असलेल्या सर्व कारखान्यांचे अग्निसुरक्षा लेखापरीक्षण (फायर ऑडिट) करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत बर्जर बेकर पेंट या कारखाना आग प्रकरणाबाबतच्या एका लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना केली.
पिळर्ण येथील बर्जर कंपनी आग प्रकरणी सखोल चौकशी केली जाणार असून, चौकशीसाठी एका समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात बर्जर रंगनिर्मिती कंपनीला लागलेल्या आगीप्रमाणे आणखीन दुर्घटना घडू नये, म्हणून आवश्यक उपाययोजना हाती घेतली जाणार आहे. या आग प्रकरणामध्ये कंपनी दोषी आढळून आल्यास त्यांना जबर दंड ठोठावला जाणार आहे. अतिधोकादायक कारखाने सुरू करताना त्या परिसराचा विचार करून निर्णय घेतला जाणार आहे. पिळर्ण येथे आगीची माहिती मिळाल्यानंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने तातडीने हालचाली सुरू करून आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केला. आग विझविण्यासाठी सुमारे 20 हजार लीटर पाण्याचा वापर करावा लागला. पिळर्ण औद्योगिक वसाहतीतील हायड्रन यंत्रणा कार्यरत असल्याने आग वेळीच आटोक्यात आणण्यासाठी मदत झाली, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
बर्जर कंपनीतील आग प्रकरणाची निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी करावी, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली. राज्यातील काही कंपन्या धोकादायक बनलेल्या आहेत. त्या कंपन्याची वेळीच दखल घेऊन दुर्घटना टाळण्यासाठी त्यांची तपासणी करून आवश्यक सावधगिरीची उपाय योजना करावी, अशी मागणी आलेमाव यांनी केली.
बर्जर कंपनीमध्ये घातक रसायने साठवून ठेवली जातात. ही कंपनी 70 निवासी घरांच्या सुमारे 50 मीटर एवढीजवळ आहे. त्यामुळे भविष्यकाळात या घरांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सदर कंपनी पुन्हा सुरू करायला देऊ नये. त्या कंपनीचे अन्य ठिकाणी स्थलांतर करावे, अशी मागणी आमदार मायकल लोबो यांनी केली.

चार विहिरींचे पाणी प्रदूषित
बर्जर कंपनीला लागलेल्या आगीमुळे पर्यावरण, पाणी दूषित तक्रारींची चौकशी केली जात आहे. त्या परिसरातील चार विहिरींच्या पाण्याची तपासणी करण्यात आली असून, सदर विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. या प्रकरणी आवश्यक कारवाई सुरू करण्यात आली आहे, असे पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी सांगितले.