अटकपूर्व जामिनासाठी पूजा शर्माची धावाधाव

0
8

>> उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल; उद्या सुनावणी

आसगाव बार्देश येथील प्रदीप आगरवाडेकर यांचे घर पाडण्याच्या प्रकरणातील मुख्य संशयित पूजा शर्मा हिने अटकपूर्व जामिनासाठी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात काल अर्ज दाखल केला. तिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर बुधवार दि. 3 जुलै रोजी दुपारी 2.30 वाजता न्यायालयात सुनावणी होणार आहे.
आसगाव येथील आगरवाडेकर यांच्या घर पाडण्याच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी गुन्हा अन्वेषण विभागाच्या खास पथकाने पूजा शर्मा हिला चौकशीसाठी सोमवारी हजर राहण्याबाबत समन्स बजावला होता; मात्र ती चौकशीसाठी गैरहजर राहिली. आता पूजा शर्मा हिने अटकपूर्व जामिनासाठी उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने आसगाव येथील प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीला या प्रकरणी नोटीस जारी केली असून, 3 जुलै रोजी अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी ठेवली आहे. तपास अधिकाऱ्यांना सुनावणीवेळी आपली बाजू मांडण्याची आणि केस डायरी सादर करण्याचा निर्देश देण्यात आला आहे.

पोलीस महासंचालकांच्या बदलीबाबत निर्णय नाही
दुसऱ्या बाजूला या प्रकरणात हणजूणचे निलंबित पोलीस निरीक्षक प्रशल देसाई यांच्या अहवालानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेले पोलीस महासंचालक डॉ. जसपाल सिंग यांच्या बदलीबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून कोणता निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्य सरकारने केंद्रीय गृह मंत्रालयाला पोलीस डॉ. सिंग यांची बदलीची शिफारस केली आहे. तथापि, अजूनपर्यंत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. आसगाव येथील आगरवाडेकर यांचे घर पाडण्यासाठी डॉ. जसपाल सिंग यांनी दबाव आणल्याचा आरोप हणजूणच्या पोलीस निरीक्षकांनी केल्यामुळे राज्य सरकार अडचणीत सापडले आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडे पोलीस त्यांच्या बदलीची शिफारस केली असून, महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्नोई यांना तातडीने कामावर रुजू होण्याचा निर्देश दिला आहे.

अटकेतील चौघांच्या जामिनावरील निवाडा राखीव
आसगाव येथील आगरवाडेकर यांचे घर पाडण्याच्या प्रकरणातील संशयित आरोपी अर्शद ख्वाज्वा आणि तीन महिला बाऊन्सरच्या जामीन अर्जावर म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने काल सुनावणी घेतली. न्यायालयाने या जामीन अर्जावरील निवाडा राखून ठेवला आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत एकूण आठ जणांना अटक करण्यात आली आहे.