>> ऐतिहासिक नालंदा विद्यापीठाच्या परिसरात नूतन वास्तूचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन; 1749 कोटी रुपयांचा खर्च
नालंदा हे फक्त नाव नाही. नालंदा ही एक ओळख आहे, सन्मान आहे. नालंदा एक मूल्य आहे, एक मंत्र आहे, एक अभिमान आहे, एक कथा आहे. नालंदा ही सत्याची घोषणा आहे की अग्नीच्या ज्वाळांमध्ये पुस्तके जळू शकतात, परंतु अग्नीच्या ज्वाळा ज्ञानाचा नाश करू शकत नाहीत, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल काढले. यावेळी पंतप्रधानांनी 1600 वर्षे जुन्या नालंदा विद्यापीठाच्या अवशेषांना सुमारे 15 मिनिटे भेट दिली.
पंतप्रधान मोदींनी बुधवारी बिहारमधील राजगीर येथील स्थित नालंदा विद्यापीठ या ऐतिहासिक शैक्षणिक नूतनीकृत वास्तूचे उद्घाटन केले. तब्बल 1749 कोटी रुपये खर्चून उभ्या केलेल्या या वास्तुला भारतातील 1600 वर्षांचा इतिहास लाभला आहे. एकेकाळी आशिया खंडातील ज्ञानाचे केंद्र असलेल्या या प्राचीन भारतातील नालंदा विद्यापिठाचे पुनर्निर्माण करण्यात आले आहे.
800 वर्षांपूर्वी परकीय आक्रमणात हे विद्यापीठ जवळपास नष्ट करण्यात आले होते, त्याठिकाणी आता एका नवीन विद्यापीठाचे अनावरण झाले.तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या 10 दिवसांत मला नालंदा येथे येण्याची संधी मिळाली, हे माझे सौभाग्य आहे, भारताच्या विकासाच्या प्रवासाचे हे एक चांगले लक्षण म्हणून मी पाहतो, असेही मोदी म्हणाले.
कसे आहे नवे विद्यापीठ ?
नालंदा विद्यापीठाचे पुनरुज्जीवन करण्यात आले असून पुरातत्वीय स्थळापासून काहीच अंतरावर हे नवे केंद्र उभारले आहे. याठिकाणी दोन विद्यासंकुल उभारली असून जवळपास 1900 विद्यार्थी क्षमतेच्या 40 वर्गखोल्या समाविष्ट आहेत. या नवीन शैक्षणिक परिसरामध्ये प्रत्येकी 300 आसनक्षमतेची दोन सभागृहे तसेच 550 विद्यार्थी क्षमतेचे विद्यार्थी वसतिगृह बनविण्यात आले आहे.