अकरावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइन

0
38

>> शिक्षण खात्याने दिली मंजुरी

>> कोविड एसओपीचे पालन करण्याची सूचना

शिक्षण खात्याने काल काढलेल्या एका परिपत्रकाद्वारे अकरावी व बारावी इयत्तेच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यास मंजुरी दिली आहे. शिक्षणाचा दर्जा चांगला रहावा यासाठी राज्यातील उच्च माध्यमिक विदद्यालयानी शिक्षणखात्याकडे अकरावी व बारावी इयत्तेच्या परीक्षा आपणाला ऑफलाइन पद्धतीने घेण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी शिक्षण खात्याकडे केली होती.

खात्याने ही मागणी मान्य केली असून कोविड एसओपीचे पालन करून ह्या परीक्षा ऑफलाइन पध्दतीने घ्याव्यात अशी सूचना राज्यातील उच्च माध्यमिक विद्यालयांना केली आहे.

ज्या शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी कोविड लशीचे डोस घेतले आहेत त्यांनाच परीक्षेच्या वेळी विद्यालयात येण्यास मुभा द्यावी. तसेच ज्यांनी डोस घेतलेला नाही. त्यांनी आरटीपीसीआर चाचणी सक्तीची करावी व डोस घेईपर्यंत प्रत्येक आठवड्याला ती सादर करण्यास त्यांना सांगावे, असे शिक्षण खात्याने परिपत्रकात म्हटले आहे.

तसेच एका वर्गात ५० टक्के एवढ्याच क्षमतेने विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा. तसेच त्यांना सामाजिक अंतर पाळण्याची अट घालावी. तसेच मास्कही सक्तीचे करावे, असे म्हटले आहे. त्याचबरोबर दर एका विद्यार्थ्याची त्याला ताप आहे की काय हे पाहण्यासाठी तपासणी करावी, असे म्हटले आहे. रोज विद्यालयात सॅनिटायझेशन केले जावे, अशीही अट घातली आहे.

ज्या विद्यार्थ्यांमध्ये कोविडची लक्षणे दिसून येतील त्या विद्यार्थ्यांची तातडीने चाचणी केली जावी. विद्यार्थी, शिक्षक व अन्य कर्मचारी वर्ग यांना कोविडची लागण होऊ नये, यासाठी विद्यालयांनी काळजी घ्यावी, अशी सूचनाही शिक्षण खात्याने केली आहे.
शिक्षण खात्याचे संचालक भूषण सावईकर यांनी काढलेल्या परिपत्रकाद्वारे उच्च माध्यमिक विद्यालयांना अकरावी व बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
विद्यालयात आलेल्या विद्यार्थी तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना तसेच इतर कोणालाही कोविडची लागण होणार नाही यासाठी आवश्यक ती सगळी काळजी विद्यालयांनी घ्यावी असेही शिक्षण खात्याने म्हटले आहे. कोविडची महामारी सुरू झाल्यापासून गेल्या वर्षी काही दहावी बारावीच्या परीक्षाच झाल्या नव्हत्या.