अंतरिक्ष युद्धाभ्यासाची गरज का?

0
129
  • कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)

मार्च २०१९ मध्ये क्षेपणास्त्रविरोधी प्रक्षेपणास्त्राचे परीक्षण करून मे महिन्यात, एका एयर व्हाईस मार्शलच्या नेतृत्वाखाली ट्राय सर्व्हिसेस डिफेन्स स्पेस एजन्सीची (त्रिदलीय अंतरिक्ष रक्षण संस्थान) स्थापना केल्यानंतर भारत आता जुलैमध्ये इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफच्या अधिपत्याखाली संरक्षणदल, नागरिक संस्थान, इसरो आणि अंतरिक्ष शास्त्रज्ञांसह इंड स्पेस एक्स नावाचा सिम्युलेटेड स्पेस वॉर फेयर युद्धाभ्यास) करणार आहे…

चीन व पाकिस्तानसारख्या शत्रूराष्ट्रांकडून अंतरिक्ष युद्धाच्या संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी हा ‘टेबल टॉप वॉर गेम’ खेळला जाईल. या वॉरगेममध्ये –
अ) अंतरिक्ष रक्षण आणि अंतरिक्ष विरोधी अभियानासाठी आवश्यक संसाधन निर्मितीचा लेखाजोखा व निर्मिती व्यवस्थेचा वेध घेणे,
ब) संसाधन निर्मितीद्वारे देशाच्या अंतरिक्षाचे आणि त्यामधील भारतीय उपग्रह, टेहळणी प्रकल्प, अंतरिक्षीय दळणवळण, क्षेपणास्त्र सूचना प्रकल्प, लक्षवेधक क्षेपणास्त्र प्रणालीचे परिक्षण इत्यादींचे रक्षण करणे
क) अंतरिक्ष युद्धासाठी सामरिक तयारीचा ओनामा करणे,
ड)कायनॅटिक आणि नॉन कायनॅटिक हत्यारांची गरज आणि निर्मिती आणि
इ) समुद्रातील जहाजांमधून फायर करण्यात येणार्‍या क्षेपणास्त्र विरोधी कार्यप्रणालीचा विचार; या सर्व बाबींचा विचार झाल्यामुळे काही ठोस निर्णय घेण्यास मदत मिळेल.
२७ मार्च,१९ ला मिशन शक्ती अंतर्गत २८३ किलोमीटर्स उंचीवरील ७४० किलो वजनाच्या उपग्रहाला उद्ध्वस्त करण्यासाठी, १९०० किलो वजनाचे, हिट टू किल मोडमधील यशस्वी क्षेपणास्त्र उड्डाण परिक्षण केल्यानंत डीआरडीओचे प्रमुख जी सथीश रेड्डींनी आता आम्ही ‘डायरेक्ट एनर्जी वेपन्स, लेझर्स, इलेक्ट्रोमॅग्नाटिक पल्स व को ऑर्बिटल किलर्स निर्मिती आणि भारतीय उपग्रहांना शत्रूच्या ‘ इलेक्ट्रॉनिक/फिजिकल अटॅक्स’पासून संरक्षण देणे यासाठी कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही दिली होती. त्यालाच अनुसरून सरकारने दिल्लीतील डिफेन्स इमेजरी प्रोसेसिंग अँड ऍनालिसिस सेंटर आणि भोपाळस्थित डिफेन्स सॅटेलाईट कंट्रोल सेंटरचा एकत्रीकरण करून डिफेन्स स्पेस एजन्सीची स्थापना केली गेली.

अंतरिक्ष युद्धात जमिनीवरून शत्रूच्या उपग्रहांना उद्ध्वस्त करणे आणि स्वतःच्या उपग्रहांमार्फत शत्रूच्या उपग्रहांना उद्ध्वस्त करणे या दोन प्रमुख बाबी आहेत. तसे पाहिले तर आजतायगत कुठल्याही प्रकारचे अंतरिक्ष युद्ध झालेलं नाही. मात्र, यासाठी असंख्य हत्यार परीक्षणे केली गेली आहेत आणि त्यांना मनाई करण्यासाठी विविध स्पेस कॉन्फ्लिक्ट ट्रिटींवर स्वाक्षर्‍याही झाल्या आहेत. अंतरिक्ष युद्धात खालील प्रकारची युद्धे खेळली जातात –

अ) बॅलेस्टिक वॉरफेयर ः १९७० व ८०च्या दशकात अमेरिका व सोव्हिएट युनियनने आण्विक युद्धाची पुढील पायरी या नात्याने बॅलेस्टिक वॉरफेयरची सुरवात केली. त्यात शत्रूंच्या क्षेपणास्त्रांना नष्ट करणे हेच प्रमुख लक्ष्य असायचे. ‘आऊटर स्पेस ट्रीटी’मुळे यात स्पेस बेस्ड मिसाईल्स किंवा आण्विक शस्त्रांचा प्रसार नव्हता. मात्र यावर संशोधन सुरु असतानाच, बॅलेस्टिक मिसाईल्स नाजूक, ठिसूळ, अस्थिर असतात आणि केमिकल लेझर्समधून ३००० किलोमीटर्स उंचीवरील उपग्रहांना आणि क्षेपणास्त्रांना उद्ध्वस्त करू शकणारी मिसाईल किलिंग एनर्जी निर्माण होऊ शकते या दोन गोष्टींची जाणीव शास्त्रज्ञांना झाली. यालाच अनुसरून अमेरिकन राष्ट्रपती रोनाल्ड रीगननी १९८३ मध्ये स्ट्रॅटेजिक डिफेन्स इनिशिएटिव्हची स्थापना केली. सोव्हिएट युनियनच्या ‘इव्हील एम्पायर’ला तोंड देण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या ‘स्टार वॉर्स’ची ही सुरवात होती. १९९२ नंतर शीतयुद्धाची समाप्ती झाली नसती तर ह्या प्रकारच्या हत्यारांची खरोखरीच निर्मिती झाली असती यात शंकाच नाही. भारतापाशी यासाठी प्रामुख्यानी ब्रम्होस व अग्नी जातीची क्षेपणास्त्रे आहेत.

ब) इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर ः १९९२ नंतर अंतरिक्ष हे पारंपरिक युद्धाला पूरक आहे असा विचार प्रवाह सुरु झाला. अगदी कालपर्यंत अंतरिक्षातील सामरिक प्रकल्प, उपग्रहाद्वारा टेहाळणी, अंतरक्षिय दळणवळण आणि शत्रूला सामरिक डावपेचात्मक स्थिरता मिळू नये यासाठी, उपग्रहांची जागा निश्चित करण्यापर्यंतच सीमित होते. मात्र आता अंतरिक्षाचा वापर शत्रूच्या उपग्रहांना रोखणे, त्यांची मारक क्षमता ध्वस्त करणे आणि त्यांना पूर्णतः नष्ट करणे यासाठी करणे सुरु झाले आहे. या लघु आणि अतिलघू उपग्रहांद्वारे आपल्या उपग्रहांची दुरुस्ती आणि शत्रूच्या उपग्रहांचे अपहरण किंवा त्यांच्यावर धडक मारून त्यांना नष्ट करण्याची क्षमता निर्माण झाली. भारतात अशी अशा प्रकारचे लघु उपग्रह तयार करण्याची तांत्रिक आणि वैकल्पिक व्यवस्था उपलब्ध आहे.

क) कायनॅटिक बम्बार्डमेंट ः याचा अर्थ ३०० किलोमिटर्स उंची वरील लो अर्थ ऑर्बिटमध्ये घुमणार्‍या मॅगझिन्समधून शत्रूच्या उपग्रहांवर स्फोटकांचा मारा करणे होय. गुरुत्वाकर्षणाच्या ओढीमुळे अशा स्फोटकांचा वेग एवढा प्रचंड असतो की उपग्रहावर आदळल्यावर ते त्याला नष्ट करू शकत. ही कारवाई करण्यासाठी अशा उपग्रहाच्या जोडीला आपल्या हाय पॉवर्ड सेंसॉर्सद्वारे शत्रू उपग्रहाची ओळख पटवणारा ‘स्पॉटर’ उपग्रह आणि त्याच्या जवळच टंगस्टन डार्ट असलेल्या ‘मॅगझीन’ उपग्रहाची आवश्यकता असते. मिशन शक्तीमध्ये याच हत्यार प्रणालीचा वापर करण्यात आला होता.

ड ) डायरेक्टेड एनर्जी वेपन्स ः आपल्या उपग्रहावरून ‘हाय एनर्जी लेझर, लिनियर पार्टीकल ऍक्सिलरेटर, पार्टीकल बीम बेस्ड वेपन, प्लाझ्मा बेस्ड वेपनरीच्या सहाय्याने शत्रूचा उपग्रह नष्ट करणारी हत्यारे २०२२-२३ मध्ये बनवण्याचा विडा, अमेरिकन स्पेस कमांडनी उचलला आहे. अंतरिक्षाच्या निवांत पोकळीत चार्ज्ड/न्युट्रल पार्टिकल्सना अतिप्रचंड वेगानी शत्रूच्या उपग्रहावर मारून तो नष्ट करणे सहजसुलभ असेल. भारत या हत्यार प्रणालीमध्ये पिछाडीवर आहे.

इ) स्पेस बेस्ड लेझर्स ः पदार्थांच्या अणूमध्ये भरलेल्या अतिरिक्त शक्तीमुळे निर्माण झालेल्या विद्युत स्थितीत ती शक्ती प्रोटॉन स्वरूपात बाहेर पडते. बाहेर येणारे प्रोटॉन्स आपल्या शक्तीमुळे अतिरिक्त प्रोटॉन निर्माण करतात. हे प्रोटॉन्स दोन विरुद्ध दिशेला ठेवलेल्या शनद्वारे वेगानी परिवर्तित होतात आणि अखेरीस जास्त पारदर्शी आरशाच्या माध्यमातून प्रचंड वेगानी बाहेर पडतात. हेच ‘लाईट अँप्लिफिकेशन बाय सिम्युलेटेड एमिशन ऑफ रेडिएशन: लेझर’ होय. आपल्या प्रचंड शक्तीमुळे लेझर्स त्यांच्या लक्ष्यामध्ये विदारक भोक पडून त्याला उद्ध्वस्त करतात. प्रति सेंटीमीटर १०० लाख वॉटच्या लेझर शक्तीनी लक्ष्याभोवतालच्या हवेच विद्युतीकरण झाल्यामुळे निर्माण झालेला प्लाझ्मा लक्ष्यावर जाऊन आदळतो आणि तेथील तापमान किमान ६००० डिग्री सेल्सियसपर्यंत जाते. त्यामुळे एकीकडे अल्ट्रा व्हायोलेट उत्सर्ग निर्माण होतो आणि दुसरीकडे तो उत्सर्ग प्रचंड स्फोटके वेगाने ङ्गेकून लक्ष्याला बरबाद करतो.
भारतीय संरक्षणदलांकडे शत्रूशी दोन हात करण्याची क्षमता आहे. भारतीय शास्त्रज्ञांकडे तांत्रिक ज्ञानही आहे. सरकारची हे करण्याची इच्छा आहे. पण याला पूर्णपणे कार्यांन्वित व्हायला सर्व संसाधने उपलब्ध करून दिली जातील, यासाठी लागणारा आर्थिक बंदोबस्त केला जाईल, तसेच लागणारी हत्यारे व मनुष्यबळ दिले जाईल किंवा नाही हे येणारा काळच सांगेल. हे जर योग्य वेळी,योग्य प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आले तर भारताचे सामरिक भविष्य उज्वलआहे यात शंका नसावी.