-ः माणसांचं जग ः- वेडा फुलामॅन

0
290
  • डॉ. जयंती नायक

तो ओसरीवरच्या सोप्यावर बसून असायचा. भंयकर दिसायचा. दाढी वाढलेली. केसांची झिपरं अस्ताव्यस्त पसरलेली. छातीवर दाट काळे केस पसरलेले. एखादा चित्रातला राक्षस कसा दिसत होता तो.

 

त्याचं खरं नाव फ्लावियन असलं पाहिजे. त्या दिवशी बरोबरीच्या मुलांनी त्याचं नाव ‘फुलामॅन’ असं सांगितलं अन् मी ते मानून घेतलं. तसे सगळेच लोक त्याला फुलामॅनच म्हणायचे. मात्र त्या नावापुढे एक विशेषण जोडलं जायचं, ते म्हणजे- वेडा.

तो खरंच वेडा होता. त्याचं मानसिक संतुलन हरवलं होतं. तो मोठमोठ्याने ओरडायचा, दिसेल त्याच्यावर दगड फेकायचा. दगडच कशाला, जे हाताला येईल ते फेकायचा. कधीकधी तो मुकाट बसायचा, तर कधी तो आक्रमक व्हायचा. शिवीगाळ करायचा. तो घाबरायचा म्हणे स्वतःच्या मायला. तो आरडाओरड करू लागला, अथवा लोकांच्या मागे लागला तर म्हणे ती चुलीतील कोलीत घेऊन बाहेर यायची. तिच्या चुलीत म्हणे याच्यासाठी कायम आगटं पेटवून ठेवलेलं असायचं.

‘गप्प बैस नाहीतर कोलती लावते’ म्हणून माय त्याला घाबरावयाची. मग भ्यायचा. दोरीला बांधलेल्या जनावरागत तिच्यामागे मुकाट जायचा अन् ओसरीवर बसायचा. मग तो बराच वेळ आवाज करायचा नाही. आई घरात असेल तर त्याच्या वेडेपणावर थोडा अंकुश असायचा. ती कामानिमित्त कुठे बाहेर पडली म्हणजे मग याचे वागणे बेताल व्हायचे. पण कळलं की आईला घाबरणार्‍या या वेड्यानेच म्हणे एके दिवशी तिचा अंत केला. त्या दिवशी म्हणे तो खूपच हिंसक झालेला म्हणून माय रोजच्या प्रमाणे हातात कोलीत घेऊन आली. पण त्या दिवशी त्यानं तिला जुमानलं नाही. तो समोरच्या वाटेवरून जाणार्‍या एका माणसाच्या मागे दगड घेऊन लागला. माय त्याला अडवायला पुढे सरसावली तसं यानं तिला ढकलून दिलं. ती जमिनीवर पडली. तिचं डोकं एका दगडावर आपटलं. मेंदूला बरीच जखम झाली. रक्तस्राव खूप झाला अन् त्यातच ती गेली. तो कुणाच्याही आटोक्यात येत नाही हे बघून म्हणे गोळा झालेल्या लोकांनी पोलिसांना बोलावलं. ते त्याला पकडून घेऊन गेले. त्यांनी त्याला नेऊन सरकारी मनोरुग्णालयात दाखल केले. इतपर्यंत मला त्याची माहिती बरोबरच्यांनी सांगितलेली.

कित्येक वर्षे मी त्याला विसरूनही गेले होते. मध्यंतरी म्हणजे पंचवीशेक वर्षांनी मला त्याची अकस्मात आठवण झाली. मी त्याला ओळखणार्‍या एका-दोघांकडे त्याची विचारपुसही केली, परंतु कुणाला काही सांगता आले नाही.

माझ्या स्मरणातून मग तो वेडा फुलामॅन काही माझ्या जाईना. तो मला अस्वस्थ करीत होता. नियतीनं त्याची केलेली मस्करी मला विव्हल करीत होती. मग मी त्यावर लेप लावायचं ठरवून जेवढं आठवत होतं त्यावर ‘सोर्त’ नावाची कथा लिहिली. साधारणपणे 1997 ची ही गोष्ट.

ही कथा हे वास्तव आहे हे माझ्याशिवाय कुणाला ठाऊकही नसेल. या कथेतील नायक हा गरीब घराण्यातील एकटाच मुलगा. आई काबाड-कष्ट करून त्याला वाढवते. तो रेंदेर बनतो. माडावरची ताडी दुदन्यांत जमवता जमवता आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्नं बघतो. एके दिवशी तो एक लॉटरीचे तिकिट विकत घेतो. त्याच्या सुदैवाने त्याला पन्नास हजारांचं बक्षीस लागतं (चाळीस वर्षांआधी). तो ऐकून हरखून जातो. त्याला आभाळ ढेगणं वाटतं. कळलं तसं तो घरी धाव घेतो. कधी एकदा ती लॉटरी घेऊन एजंटकडे जातो अन् नोटांची बंडलं घरी घेऊन येतो असं त्याला होतं. परंतु हाय त्याचं नशीब! ती लॉटरी त्याच्या शर्टाच्या खिशात असते. त्याची आई तो शर्ट घेऊन नदीवर जाते अन् खिशा न उलटवता तसाच धुते. त्याची लॉटरी पाण्यात भिजून चुरगळून जाते. त्यासोबत त्याच्या स्वप्नाचासुद्धा पालापाचोळा होतो. आपली लॉटरी कुचकामी झाली, हे पाहून त्याचं मानसिक संतुलन बिघडतं. अन् तो वेडा होतो…

लॉटरीची ही कथा खरी फुलामॅनच्या जीवनाची कथा. लहानपणी मला माझ्याबरोबरच्या मुलांकडून समजलेली. मी त्यावेळी पाचवीला होते. शाळा दुपारी सव्वाएकला होती. माझ्या बरोबरची मुलं त्यावेळी दिवाळी झाली, नदीचं पाणी थोडं आटलं की नदीतून चालतं शॉर्टकट वाटेनं जायची. ऐलतीरी आमचा गाव, पैलतीरी शाळा. मला आई काही त्या वाटेनं जायला द्यायची नाही. मला लांब रस्त्यानं जावं लागायचं. एकदा मी हट्ट करून मुलांसोबत गेले. नदी ओलांडून वर चढलं की त्याचं मातीचं घर लागायचं. त्या घरा समोरून पायवाट होती. तो ओसरीवरच्या सोप्यावर बसून असायचा. भंयकर दिसायचा. दाढी वाढलेली. केसांची झिपरं अस्ताव्यस्त पसरलेली. छातीवर दाट काळे केस पसरलेले. एखादा चित्रातला राक्षस कसा दिसत होता तो. त्याला बघून मी जाम घाबरले. माझ्या बरोबरचे पोरगे थोडे टारगट होते. ते त्याला ‘ये फुलामॅन… सोर्त कितीची लागली रे?’ म्हणून चिडवायला लागले. तसा तो उखडला. दोळे लाल करीत हातात दगड घेऊन आमच्या मागे लागला. माझी पळता भुई थोडी झाली. मी घरी जाऊन घडलेली गोष्ट आईच्या कानावर घातली तशी ती वाट मला कायमची बंद झाली!

काही दिवसांआधी आमची रोजची मासेवाली आजारी आहे म्हणून समजलं अन् मी तिच्या समाचाराला गेले. तिनं फुलामॅनच्याच वाड्यावर घर बाधलं होतं. तिथं जाताना मला हटकून त्याची आठवण झाली. परंतु त्या वाड्यावर त्याच्या काहीच खाणा-खुणा नव्हत्या. त्यांच्या त्या मातीच्या घराचा मागमूसही नव्हता. पडके अवशेषसुद्धा नव्हते. सगळा वाडा चकाचक झालेला. तिथं मोठी घरं-बंगले होते. ती पायवाटही आता डांबरी रस्त्यात परावर्तीत झालेली.