९५ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे काल बेळगावमध्ये उद्घाटन झाले. मात्र, महाराष्ट्र एकीकरण समर्थकांनी उद्घाटन सोहळ्यात जोरदार घोषणाबाजी केली. शेवटी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष श्री. मोहन जोशी यांनी निदर्शकांना शांततेचे आवाहन केल्याने तणाव निवळला.बेळगावच्या नाट्यसंमेलनात सीमाप्रश्नाचा ठराव मांडायचा नाही, कर्नाटक सरकारच्या विरोधात विधान करायचे नाही, आक्षेपार्ह घोषणा द्यायच्या नाहीत, अशा सुमारे २० अटी बेळगाव पोलिसांनी नाट्यसंमेलनाच्या आयोजकांना घातल्या आहेत. त्यामुळे या अटींना न जुमानता ‘बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,’ अशा घोषणा देत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी उद्घाटन सोहळ्यापूर्वी जोरदार निदर्शने केली. घोषणाबाजी थांबून वातावरण शांत होताच उद्घाटन सोहळ्याला सुरूवात झाली. माजी केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या नाट्यसंमेलनाचे उद्घाटन झाले. बेळगावची मराठीशी असलेली नाळ जुळलेलीच आहे, असे उद्गार यावेळी श्री. पवार यांनी काढले. मराठी रंगभूमीच्या विविध प्रश्नांना त्यांनी आपल्या भाषणात स्पर्श केला. मराठी नाटकाला मिळणारे अनुदान कमी असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. श्री. पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांचा गौरव करण्यात आला.
संमेलनाध्यक्ष व ज्येष्ठ अभिनेत्री फैय्याज यांनी पालकांनी मुलांना स्पर्धेच्या मागे लावू नये, तर त्यांच्या कलागुणांना खुलू द्यावे असे आवाहन केले. नव्या पिढीने व्यावसायिक नाटके तर करावीतच, परंतु संगीत रंगभूमीलाही पुनरूज्जीवन द्यावे असे आवाहन त्यांनी केले. उद्घाटन सोहळ्याआधी नाट्यदिंडी काढण्यात आली.

