५९ चिनी ऍपवर भारताकडून बंदी

0
171

भारत आणि चीनमध्ये लडाखमधील झटापटीनंतर तणाव निर्माण झाला आहे. यातूनच चिनी मालावर बहिष्कार घालण्यासाठी समाजात आवाहन केले जात आहे. चिनी ऍपद्वारे भारतीयांची माहिती दुसर्‍या देशांना पाठवली जात असून, त्यावर बंदी घालण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी सरकारला दिला होता. त्या पार्श्वभूमीवर भारताने चीनवर थेट डिजिलट स्ट्राईक करत काल सोमवारी टिकटॉकसह ५९ चिनी ऍपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

काही दिवसांपूर्वीच भारतीय गुप्तचर यंत्रणांनी ५२ धोकादायक चिनी ऍप्ससंदर्भात इशारा दिला होता. ही ५२ ऍप्स असुरक्षित असून, या ऍप्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भारतीयांची माहिती दुसर्‍या देशांमध्ये पाठवली जात असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी म्हटले होते.
सुरक्षा यंत्रणांनी सरकारला पाठवलेल्या यादीमध्ये टिक-टॉकबरोबरच युसी ब्राऊझर, एक्झेण्डर, शेअरइट, क्लीन मास्टर यासारख्या ऍप्सचा समावेश होता. सीमेवरील तणाव व केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी चिनी ऍपविषयी माहिती दिल्यानंतर केंद्र सरकारने ५९ चिनी ऍपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६९अ च्या अधिकाराचा वापर करत ५९ चिनी ऍपवर बंदी घातली आहे.