५जी स्पेक्ट्रमच्या लिलावातून दीड लाख कोटींचा महसूल

0
10

>> केंद्र सरकारच्या तिजोरीत मोठी भर; रिलायन्स जिओकडून ५ जी स्पेक्ट्रमसाठी सर्वाधिक बोली

गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला ५जी स्पेक्ट्रमचा लिलाव काल संपला. या लिलावादरम्यान स्पेक्ट्रमसाठी जवळपास १,५०,१७३ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली. ५जी स्पेक्ट्रमच्या लिलावातून केंद्र सरकारला तब्बल दीड लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला. ४० व्या फेरीनंतर ५जी स्पेक्ट्रमचा लिलाव संपला. एअरटेल आणि जिओ या दूरसंचार कंपन्या आता संपूर्ण देशभर ५जीचे जाळे पसरवणार आहेत. सप्टेंबर २०२२ अखेर ५जीची सुविधा मिळण्याची शक्यता आहे.

२६ जुलैला सुरू झालेला ५जी स्पेक्ट्रमचा लिलाव १ ऑगस्टला समाप्त झाला. ५जी स्पेक्ट्रमच्या लिलावात मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ, सुनील मित्तल यांच्या भारती एअरटेल, गौतम अदानी यांच्या अदानी इंटरप्राइजेस लिमिटेड आणि वोडाफोन-आयडिया या कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यापूर्वी ४जी स्पेक्ट्रमच्या लिलावावेळी जवळपास ७७,८१५ कोटी रुपयांची बोली लागली होती, तर यावर्षी ५जी स्पेक्ट्रमसाठी दुप्पट बोली लावण्यात आली. वर्ष २०१० मध्ये पार पडलेल्या ३जी स्पेक्ट्रमसाठी एकूण ५०,९६८.३७ कोटी रुपयांची बोली लागली होती. त्यामुळे ५जी स्पेक्ट्रमसाठी लावण्यात आलेली बोली विक्रमी म्हणता येईल.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने ५ जी स्पेक्ट्रमसाठी सर्वाधिक बोली लावली. त्यानंतर भारती एअरटेल आणि वोडाफोन-आयडियाचा क्रमांक येतो. आता रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल संपूर्ण देशात ५ जीचे जाळे पसरवणार असून, व्होडाफोन-आयडियाकडून काही मोजक्या सर्कलमध्ये लिलावास पसंती देण्यात आली.

काही सेकंदात संपूर्ण चित्रपट डाऊनलोड होणार
५ जी नेटवर्कचा वेग ४जी नेटवर्कपेक्षा १० पट जास्त असेल. ५ जी नेटवर्कद्वारे तुम्ही तुमच्या मोबाईलवर काही सेकंदात संपूर्ण चित्रपट डाऊनलोड करू शकाल. ४जीच्या तुलनेत ५जीचा स्पीड १० पट अधिक असेल. सोबतच, लॅग फ्री कनेक्टिव्हिटी मिळेल. ५जी कनेक्टिव्हिटीद्वारे रियल टाइम लाखो डिव्हाइस कनेक्टेड होतील व फास्ट डेटा ट्रान्सफर केला जाईल.