नदी परिवहन खात्याला जानेवारी महिन्याच्या अखेरीस मिळणार असलेल्या चार फेरीबोटींचे बांधकाम सध्या मंद गतीने चालू असल्याने आता सदर फेरीबोटी फेब्रुवारी महिन्यातच उपलब्ध होऊ शकणार असल्याचे खात्यातील सूत्रांनी सांगितले.
मात्र, या बिलंबासाठी फेरीबोटी बांधणार्या कंपनीला प्रत्येक फेरीबोटीमागे दिवसाला २ हजार रु. एवढा दंड खात्याला द्यावा लागणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटापर्यंत आता या फेरीबोटी खात्याला मिळणार आहेत.
२ कोटी ६० लाख रु. खर्चून या फेरीबोटी बांधण्यात येत असून या नव्या फेरीबोटी जुने गोवे ते दिवाडी, सांपेंद्र ते दिवाडी, राय ते शिरोडा व मडकई ते कुठ्ठाळी या जलमार्गांवर घालण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नदी परिवहन खात्याकडे सध्या ३९ फेरीबोटी असल्या तरी त्यापैकी २९ फेरीबोटीच सध्या २० मार्गांवर चालू आहेत. तर १० फेरीबोटी नादुरुस्त झालेल्या असून त्यापैकी काही दुरुस्त करण्यात येणार आहेत. तर अत्यंत जुन्या झालेल्या फेरीबोटी भंगारात काढण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.