Home बातम्या ३१ डिसेंबरनंतर लढाई जनतेच्या न्यायालयात नेणार

३१ डिसेंबरनंतर लढाई जनतेच्या न्यायालयात नेणार

0
‘माझ्याबाबतीत जे काही घडले त्याबद्दल जनतेच्या मनात जरूर सहानुभूती आहे. पण ज्या पध्दतीने सरकारी यंत्रणेने हे प्रकरण हाताळले ते पाहिल्यानंतर आमदाराला न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य माणसाचे काय होणार ही भीती आता लोकांना वाटू लागली आहे. तपास करण्यापूर्वीच पोलीस आरोपांची शहानिशा करू लागले तर कुठल्याही संशयिताला ते पकडू शकणार नाहीत. आरोपी निर्दोष आहेत की नाही ते न्यायालय ठरवेल, पोलीस परस्पर त्याना निरपराध असल्याचे प्रमाणपत्र देऊ शकतात का?’ असा सवाल विष्णू सुर्या वाघ यांनी पत्रकात केला आहे.

पोलीस तपासातील ढिलाईचे समर्थन करताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केलेली विधाने ऐकून आपणाला प्रचंड धक्का बसला आहे. रेवोडा येथे त्या दिवशी काय काय झाले हे स्वत: पाहिल्याप्रमाणे त्यांनी सांगितले आहे. बुरखाधारी हल्लेखोरांना वाघ यांनी कसे ओळखले असा प्रश्‍न करणार्‍या मुख्यमंत्र्यांनी आपली तक्रार नीट वाचलेली दिसत नाही. त्यात आपण स्पष्टपणे ‘काही हल्लेखोर’ असे म्हटले आहे. सामाजिक जीवनात गेली तीस वर्षे आपण वावरतो आहे. त्यामुळे शेकडो लोकांना मी नावे व चेहर्‍यांसकट ओळखतो. आज किरण कांदोळकर यांचे समर्थक म्हणून वावरणारे अनेक लोक पूर्वी कॉंग्रेसचे कार्यकर्ते होते. थिवी भाजप मंडळावरील अनेक पदाधिकारीही पूर्वी कॉंग्रेसमध्ये होते. आपली त्यांच्याशी तेव्हापासून ओळख आहे. नीळकंठ हळर्णकर यांच्या सांगण्यावरून आरोपींची नावे द्यायला मी आपण बच्चा नाही, असेहे वाघ यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यांवरून या राजवटीत आपल्याला न्याय मिळणार नसल्याचे स्पष्ट आहे. पोलीस जाणीवपूर्वक कमकुवत केस उभी करतील. तपासात कच्चे दुवे ठेवतील अशी दाट शंका वाटत असल्याचेही श्री. वाघ म्हणाले. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत आपण वाट पाहीन. त्यानंतर आपली लढाई जनतेच्या न्यायालयात नेईन. आमदारकीपेक्षा आपणास स्वाभिमान महत्वाचा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.