महाविद्यालयात कॅम्पस ऍम्बासेडर्स नेमणार
मतदार याद्या सुधारणांचे काम सुरू झालेले असून येत्या ६ जानेवारी रोजी सुधारित मतदार याद्या जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य मुख्य निवडणूक अधिकारी केशव चंद्र व संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण नावती यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
सुधारित मतदार याद्यांनुसार राज्यातील मतदारांचा एकूण आकडा १०,३८,२११ एवढा आहे. याद्यांची सुधारणा करण्यापूर्वी एकूण मतदारांचा आकडा १०,६७,६३७ एवढा होता. तपासणीच्या वेळी काही मतदारांच्या नावांची दोनदा नोंदणी झाली असल्याचे आढळून आल्यानंतर अशी सुमारे २९ हजार नावे गाळण्यात आली. त्यामुळे आकडा १०,३८,२११ एवढा झाला. दरम्यान, मतदारांचे दावे व हरकती स्वीकारण्याचे काम गेल्या ३० रोजी सुरू झालेले असून ते २९ ऑक्टोबरपर्यंत चालू राहणार आहे. दावे व हरकती हातावेगळे करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर अशी आहे. नंतर ६ जानेवारी रोजी सुधारित मतदार याद्या प्रकाशित करण्यात येणार आहेत. १८ वर्षे पूर्ण झालेल्या नव्या मतदारांची नावे मतदारयाद्यांत घालण्यात येणार आहेत. हा आकडा सुमारे २० ते २५ हजार एवढा असेल. सर्व मतदारांचा मतदार याद्यात समावेश केला जावा व १८ वर्षे पूर्ण केलेली एकही व्यक्ती मतदार याद्यांबाहेर राहू नये यासाठी सर्व ते प्रयत्न केले जात असून त्यासाठी दर एका महाविद्यालयात कॅम्पस ऍम्बासेडर्सची नेमणूक करण्यात आली आहे. त्याशिवाय मतदान केंद्रवार एजंटही नेमण्यात आलेले आहेत. पक्षांच्या कार्यकर्त्यांची त्यासाठी मदत घेण्यात आलेली आहे. ६, १३ व ३० ऑक्टोबर या दिवशी हे एजंट मतदान केंद्रांवर जाऊन मतदार याद्या सुधारणासाठी प्रचार करतील. एकूण मतदान केंद्रांचा आकडा ६२२ एवढा आहे. नव्या ९ मतदान केंद्रांचा समावेश केल्यानंतर हा आकडा तेवढ्यावर पोचल्याचे ते म्हणाले. मतदानासाठी आपल्या घराकडून २ कि. मी. पेक्षा दूर जावे लागू नये असे निवडणूक अधिकारणीचे म्हणणे आहे. गोव्यात त्याबाबत चित्र चांगले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.