सरकारने राज्य माहिती आयुक्तांची नियुक्ती करावी या मागणीसाठी उपोषण सुरू करून काल दुपारी १०० तास उलटल्यानंतरही माहिती हक्क कार्यकर्ते राजन घाटे यांनी येत्या २९ रोजीपर्यंत आपले उपोषण चालूच ठेवण्याचा निर्णय काल घेतला.
काल उपोषणस्थळी राजन घाटे यांचे बंधू कृष्णा घाटे, भावजय चित्रा घाटे, बहिण अर्चना चोडणकर तसेच त्यांची मुले आली असता राईट टू इन्फॉर्मेशेन फोरमच्या सदस्यांनी त्यांना राजन घाटे यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली व त्यांना उपोषण चालूच ठेवण्यास सांगावे की ते मागे घेण्याचा सल्ला द्यावा हे तुम्ही सांगा असे त्यांना सांगितले. त्यावर त्यांचे भाऊ कृष्णा घाटे म्हणाले की, माझा भाऊ हा गोमंतकीय जनतेसाठी लढत असल्याने त्यांनी उपोषण चालूच ठेवावे असे कुटुंबियांना वाटते. त्यांच्या या निवेदनानंतर राजन घाटे हे २९ जुलैपर्यंत वाट पाहतील.
त्या दिवशी सदर पदांविषयी निर्णय घेण्यासाठी बैठक आयोजित केली असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी वर्तमानपत्रातून केली असल्याचे फोरमने स्पष्ट केले. पत्रकार परिषदेच्या वेळी आरटीआय फोरमच्या विविध सदस्यांनी आपली मते मांडली. याप्रसंगी बोलताना आयरिश रॉड्रिग्ज म्हणाले की, मुख्य माहिती आयुक्त व राज्य माहिती आयुक्त हे दोघेही गोमंतकीय असायला हवेत. गोव्याबाहेरच्या उमेदवारांची या पदी निवड केल्यास त्याला जोरदार विरोध करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. उपोषणाला बसलेल्या राजन घाटे यांना रात्रीच्या वेळी पोलीस संरक्षण देण्यात येत नसल्याचेही यावेळी नजरेत आणून देण्यात आले. आरटीआय फोरमच्या अध्यक्ष नंदिता सहाय तसेच अन्य पदाधिकारी व सदस्य यावेळी हजर होते.