पालकांचे विरोधी पक्षनेत्यांस साकडे; मुख्य सचिवांची भेट
लोक सहाय्यता संस्था (प्रोव्हेदोरिया)च्या पुंडलिकनगर–पर्वरी येथील संजय स्कूल व म्हापसा येथील व्यावसायिक प्रशिक्षण आणि पुनर्वसन केंद्रातील वयाची २१ वर्षे पूर्ण केलेल्या विकलांग विद्यार्थी वच प्रशिक्षणार्थींना येत्या सोमवार दि. २९ पासून काढून टाकण्याचा निर्णय संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाने घेतल्याने या मुलांच्या पालकांसमोर गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाने दि. १४ रोजी एक खास नोटीस काढून मंडळाने घेतलेला निर्णय संजय स्कूलच्या पर्वरी, कुडचडे, वास्को शाखा तसेच म्हापसा येथील व्यावसायिक आणि पुनर्वसन केंद्राच्या प्रमुखाना कळविला आहे व निर्णयाच्या कार्यावाहीचा आदेश दिला आहे.
संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाच्या म्हणण्यानुसार वयाची २१ वर्षेपूर्ण केलेले अपंग विद्यार्थी व प्रशिक्षणार्थी बर्याच काळापासून संस्थेत आहेत. त्यांच्यात कसलीच गुणात्मक सुधारणा झालेली नाही. अशा विद्यार्थ्यांना संस्थेत ठेवून घेणे निरर्थक आहे. त्यांच्यामुळे शाळेत नव्याने दाखल होऊ इच्छिणार्या अपंग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधीपासून वंचित व्हावे लागत आहे, असे व्यवस्थापन मंडळाचे म्हणणे आहे. ज्या अपंग विद्यार्थ्यांना नियमित शैक्षणिक अभ्यासक्रम झेपत नाही व जे विद्यार्थी आपल्या क्षमतेनुसार वेगवेगळे प्रशिक्षण घेऊ शकतात, अशा २१ वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना गोवा सरकारच्या राज्य हस्त व्यवसाय संचालनालयाच्या केंद्रात दाखल करून घेण्याची शिफारस व्यवस्थापन मंडळाने केली आहे. अपंग विद्यार्थ्यांच्या पालकांच्या सहमतीने त्यांना या केंद्रात दाखल करून घ्यावे, अशी सूचनाही करण्यात आली आहे. संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाच्या नोटीसीमुळे शारीरिक विकलांग मुलांच्या पालकांसमोर कठीण समस्या निर्माण झाली आहे. आपल्या मुलांना दि. १९ पासून शाळेत प्रतिबंध करण्यात आल्यास पुढे काय करावे ही समस्या पालकांसमोर उभी राहिली आहे. गेल्या जुलै महिन्यात पुंडलिक नगर येथील संजय स्कूलमधील ८० मुलांना म्हापसा येथील केंद्रात स्थलांतरित करण्यात आले होते. पालकांनी विरोध केल्याने संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाने आपला निर्णय बदलला होता.
काही पालकानी आपली समस्या माजी नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर यांच्या कानावर घातल्यावर त्यांनी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्याशी संपर्क साधून समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. श्री. कांदोळकर यांच्या सूचनेनुसार काही पालकांनी श्री. पर्रीकरांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपली समस्या मांडली. श्री. पर्रीकर यानी हा प्रश्न मुख्यसचिव संजय श्रीवास्तव यांच्या समोर मांडला व त्यांच्याशी चर्चा केली. या प्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन मुख्य सचिवांनी दिल्याचे सांगण्यात आले.