१८ जून ः गोवा मुक्तिसंग्रामाचे सुवर्णपर्व

0
42
  • – जनार्दन वेर्लेकर

डॉ. राम मनोहर लोहिया भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक प्रभावी शक्ती होती. गोव्याच्या रोमहर्षक स्वातंत्र्यसंग्रामातील त्यांचं योगदान अतुलनीय आहे. स्वातंत्र्यसंग्रामाच्या धगधगीत यज्ञकुंडात आपले जीवन झोकून देणार्‍या लोहियांचे विस्मरण निदान १८ जूनला तरी आम्हा गोमंतकीयांना होऊ नये म्हणून हा लेख त्यांच्या प्रेरणादायी- पावन स्मृतीला समर्पित…

पु. ल. देशपांडे यांनी ‘एक रसिक तापस’ असं ज्यांचं सार्थ वर्णन केलं आहे ते डॉ. राम मनोहर लोहिया भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक प्रभावी शक्ती होती. गोव्याच्या रोमहर्षक स्वातंत्र्यसंग्रामातील त्यांचं योगदान अतुलनीय आहे. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली १९४२ च्या लढ्यात तावून-सुलाखून निघालेले जयप्रकाश नारायण, अरुणा असफअली, अच्युतराव पटवर्धन यांच्या मालिकेतील एक थोर क्रांतिकारक-विचारवंत म्हणून ते स्वातंत्र्यलढ्याच्या समरांगणात स्वयंतेजाने तळपले. तब्बल ७६ वर्षांपूर्वी आजच्या (१८ जून) तारखेला मडगावच्या लोहिया मैदानावर त्यांच्या नेतृत्वाखाली गोवा मुक्तिलढ्याच्या अंतिम पर्वाचे रणशिंग फुंकताना जुलमी, दमनकारी पोर्तुगीज राजवटीला डिवचण्याचे धैर्य त्यांनी दाखवले. मरगळ आलेल्या, निर्बल-निस्तेज-निद्रिस्त-चेतनाहीन गोमंतकीय जनतेला पोर्तुगीज वसाहतवादाच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी ‘जय हिंद’ या नार्‍याने मंत्रभारित केले. यंदा देशभर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या जल्लोषात ७६ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी लोहिया आणि त्यांच्या निधड्या छातीच्या गोमंतकीय बंधुभगिनींनी पोर्तुगीज सत्तेला ललकारलं त्या ऐतिहासिक घटनेचा विसर न व्हावा…
लोहिया आणि तुरुंग यांचं नातं जणू ‘तुझं-माझं जमेना, परी तुझ्यावाचून करमेना’ असं जिवाभावाचं होतं. १९४२ च्या आंदोलनात त्यांनी मुंबईत एक वर्षभर भूमिगत राहून ‘फ्री इंडिया रेडिओ’ चालवला. अखेर एक दिवस त्यांना अटक झाली. पुन्हा एकदा त्यांच्या खडतर, यातनामय जीवनाला सुरुवात झाली. अंधारकोठडीत हातापायाला बेड्या ठोकून त्यांना बंदिस्त केले. महात्मा गांधी, कॉंग्रेस कार्यकारिणीचे सदस्य सुटले; मात्र लोहियांवर ब्रिटिशांचा रोष त्यांचा बंदिवास लांबवायला कारणीभूत ठरला. अखेर ११ एप्रिल १९४६ रोजी आग्रा तुरुंगातून त्यांची सुटका झाली.

गोमंतकातील असोळणे गावचे डॉ. ज्युलियांव मिनेझिस हे डॉक्टर लोहियांचे मित्र. दोघेही जर्मनीतील बर्लिन विश्‍वविद्यालयाचे विद्यार्थी. मिनेझिस वैद्यक शास्त्राचे, तर लोहिया अर्थशास्त्राचे. पारतंत्र्यामुळे दोघेही समदुःखी. लोहिया त्यावेळी वीस वर्षांचे होते. दोघांचा स्नेह जुळला. १९३० साली जिनेव्हा येथे राष्ट्रसंघाची बैठक होती. बिकानेरचे महाराज हिंदुस्थानचे प्रतिनिधी होते. हिंदुस्थानात देशभक्तीचा अंगार फुलला होता. भगतसिंग, सुखदेव, राजगुरूसारखे तरुण शहीद झाले होते. मिठाच्या सत्याग्रहात शेकडो निःशस्त्र अहिंसक सत्याग्रही ठार झाले होते. आणि बिकानेरचे महाराज राष्ट्रसंघाच्या बैठकीत ब्रिटिशांचे गोडवे गात होते. लोहिया-मिनेझिस यांनी शक्कल लढवून सभागृहाचे प्रवेशपत्र मिळवले. राजेसाहेबांच्या भाषणात आपला ओरडून निषेध नोंदवला. अध्यक्षांच्या हुकूमाने पोलिसांनी या दुकलीला सभागृहाबाहेर काढले. दुसर्‍या दिवशी लोहियांनी सभेचे अध्यक्ष रुमानियाचे टिटेलेस्न्यू यांना जाहीर पत्र लिहिले. सत्यस्थिती कथन केली. वर्तमानपत्रांनी हे पत्र ठळकपणे प्रसिद्ध केले. राष्ट्रसंघाच्या इमारतीपुढे उभे राहून त्या सदस्यांना व लोकांना त्यांनी वर्तमानपत्रांच्या प्रती वाटल्या. अशी लोहिया-मिनेझिस यांची विद्यार्थिदशेपासून मैत्री.

बंदिवासातून सुटल्यावर थकल्या-भागल्या लोहियांना सर्वप्रथम आठवण झाली ती आपल्या या गोमंतकीय मित्राची. डॉ. मिनेझिसने लोहियांना आपल्या घरी यायचे निमंत्रण दिले- केवळ विश्रांतीसाठी. १० जून १९४६ ला लोहियांचे गोव्यात आगमन झाले. आगमनाचा दिवस शांततेत गेला; मात्र त्यांच्या आगमनाची वार्ता गोवाभर कणोपकर्णी झाली. मग काय विचारता? वणव्यासारख्या पसरलेल्या या वार्तेमुळे त्यांच्या भेटीसाठी येणार्‍यांची गर्दी वाढायला लागली. येणार्‍यांमध्ये तरुणाईचा जोश आणि समाजाच्या सर्व स्तरांतून अर्थात शिक्षक मंडळी, लहान व्यापारी, नोकरदार, पोलीस असा भरणा. गोवा सेवा संघाचे पुरुषोत्तम काकोडकर, मडगावचे वसंत कारे, ‘ए वॉझ’ दैनिकाचे डॉ. आंतोनियू सिक्वेरा, ‘ओ हेराल्डो’ दैनिकाचे एव्हाग्रियो जॉर्ज, दियोनिझ रिबेरो आदींचा समावेश होता. दि. १५ जून रोजी डॉ. लोहियांना घेऊन मिनेझिस मुरगावला गेले. तिथे डॉ. त्रिस्तांव ब्रागांझ द कुन्हा, दत्तात्रय देशपांडे आदी मंडळींची भेट झाली. त्याच संध्याकाळी पणजीत माधव बीर, एव्हाग्रियो जॉर्ज हे त्यांना भेटले व पणजीची बैठक ठरवली. दुसर्‍या दिवशी पणजीस जगनलालशहा यांच्या घरी कार्यकर्त्यांची एकच गर्दी उसळली. अशा विचारमंथनातून लोहियांच्या लक्षात आले की ब्रिटिश अमलाखालील भारत संपूर्ण स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असताना पोर्तुगीज राजवटीत गोमंतकीय जनता विचार-उच्चार स्वातंत्र्य, मुद्रणस्वातंत्र्य आणि संघटन- मेळावे- सभा या नागरी सुविधांपासून वंचित आहे. साध्या निमंत्रणपत्रिकांना सेन्सॉरशीपचा जाच सहन करावा लागत आहे. गोमंतकीयांच्या दुःखाला वाचा फोडण्याचा आणि येथील नागरी स्वातंत्र्याविरुद्ध असलेला बंदी हुकूम मोडून सालाझारशाहीला आव्हान द्यायचं- गोमंतभूमीच्या सत्याग्रहात एकमेवाद्वितीय अहिंसक शस्त्राचा प्रयोग करायचा आणि तोही अविलंब असा निर्णय त्यांनी घेतला. १८ जून १९४६ रोजी संध्या. ४ वा. मडगाव येथे पोर्तुगीज सत्तेला ललकारायचा त्यांचा निर्णय त्यांनी उपस्थितांना जाहीररीत्या कळवून टाकला.
बातमी वार्‍यासारखी पसरली. लोकांची प्रतिक्रिया दोन टोकांची होती. काहींना लोहियांचा हा आततायीपणा मूर्खपणाचा वाटला. उगीच ते आपला जीव धोक्यात घालत आहेत असं त्यांचं मत. फिरंग्यांच्या क्रूर व असंस्कृत वागणुकीसंबंधीही अनेक प्रवाद होते. महात्मा गांधींच्या सत्याग्रही मार्गासंबंधी फिरंगी नेहमी उपहासाने पाहत. एका नंग्या फकिराला पिस्तुलाच्या गोळीने दूर करणे सोपे असताना ब्रिटिश मूर्खासारखे त्यांना फारच चढवून ठेवतात, असे ते उघड म्हणत. पोर्तुगीज लोहियांना अशी वागणूक न देता त्यांना कायमचे संपवतील ही धास्ती त्यांच्या विचारांमागे होती. मात्र काहीजणांच्या मते लोहियांसारख्या श्रेष्ठ स्वातंत्र्यसेनानीने असा पुढाकार घेतल्याशिवाय गोव्याची कोंडी फुटणार कशी? डॉक्टरांच्या निर्णयावर बैठकीत दोन तट पडले. ‘आधी संघटना बांदू, मग कृती करू’ -असे लोहियांना समजुतीने घ्यायचे या मंडळीने सुचवून पाहिले; मात्र लोहिया आपल्या निर्धारापासून ढळायला नाकबूल. त्यांनी सुनावलं- ‘‘पूर्वतयारी वगैरे काही नाही. आधी संघटना की आधी कृती हा वाद या घडीस निरर्थक आहे. आहे या परिस्थितीत प्रत्यक्ष कृतीतून लढ्याला आवश्यक असलेली संघटना अवतरेल असे माझे ठाम मत आहे. माझा निर्धार कायम असून ठरल्याप्रमाणे, ठरलेल्या वेळी, ठरलेल्या जागेवर सत्याग्रह होईल. ज्या कुणाला माझ्याबरोबर येणे शक्य होईल त्याने यावे; नपेक्षा मी एकटा आहेच!’’
लोहियांच्या या वज्रनिर्धाराने बैठकीचा नूर पालटला. लोहिया जर सत्याग्रह करून तुरुंगवास अगर त्याहून अधिक दारूण परिणामांस तोंड देणार असतील तर त्यांना तसे एकटे जाऊ देणे गोमंतकाच्या अस्मितेला नि प्रतिष्ठेला शोभण्यासारखे होणार नाही. गोव्याचा स्वाभिमान व परंपरा उंच राखण्यासाठी काहीजणांनी त्यांच्या पाठोपाठ सत्याग्रही म्हणून पुढे येऊन त्यांना अवश्य साथ दिली पाहिजे. या विचाराने भारलेल्या मंडळीनी अन्य तयारी करण्यासाठी दुसर्‍याच दिवशी मडगाव येथील दामोदर विद्यालयात कार्यकर्त्यांच्या बैठकीचा बेत नक्की केला.

दि. १६ रोजी सायंकाळी बैठक भरली. गोव्याच्या निरनिराळ्या भागांतून २५-३० कार्यकर्ते हजर झाले. त्यांत पुरुषोत्तम काकोडकर, गोपी कृष्ण कुराडे, वसंत कारे, विश्‍वनाथ नारायण लवंदे, डॉ. विनायक ना. मयेकर, केशवबाब नायक, सौ. प्रतिला जांबावलीकर, डॉ. जे. कार्व्हालो आदींचा समावेश होता. बैठकीत सविस्तर चर्चा झाली. जे लोहियांना त्यांच्या या अविचारापासून परावृत्त करण्याच्या बाजूचे होते त्यांना लोहियांची साथ देणार्‍यांनी निक्षून सांगितले- ‘‘आधी संघटना- मग कृती म्हणणार्‍यांनी ती गेल्या साडेचारशे वर्षांत का केली नाही? कुणी त्यांना अडविले होते?’’
विश्‍वनाथ लवंदे यांनी बैठकीत स्पष्टपणे आपली भूमिका मांडली- ‘‘अशा ऐतिहासिक प्रसंगी मी तरी डॉ. लोहियांना एकटे जाऊ देणार नाही. त्यांच्याबरोबर सत्याग्रह करून तुरुंगात जाण्याचे मी ठरविले आहे. तसे मी या ठिकाणी जाहीर करीत आहे. इतरांनीही डॉक्टरांची साथ करावी, अशी विनंती आहे.’’ लवंदे यांच्या म्हणण्याला दुजोरा देणारी भाषणे झाल्यावर आणखी आठ जणांनी आपली नावे सत्याग्रहासाठी नोंदवली. त्या साहसी वीरांची नावे होती- विश्‍वनाथ ना. लवंदे (थोरले गोवे), डॉ. विनायक मयेकर (कुठ्ठाळी), पुरुषोत्तम काकोडकर (मडगाव), सौ. प्रमिलाबाई जांबावलीकर (मडगाव), व्यंकटेश वेरेकर (करमणे), नीळकंठ कारापूरकर (डिचोली), डॉ. जे. कार्व्हालो (कुंकळ्ळी), वसंत कारे (मडगाव) आणि जयवंत मांद्रेकर (डिचोली).

सभेचा वृत्तांत शिष्टमंडळामार्फत डॉक्टर लोहियांच्या कानी घालण्यात आला. तसेच सत्याग्रहींची यादी त्यांना सादर करण्यात आली. डॉ. लोहिया या प्रतिसादाने गहिवरले- भारावले. त्यांनी शिष्टमंडळाकरवी सत्याग्रहींना संदेश पाठवला- ‘पोर्तुगीज साम्राज्यशाहीची गोमंतकातून हकालपट्टी केल्याशिवाय भारताला तरणोपाय नाही. स्वतंत्र भारतात पोर्तुगीज साम्राज्यशाहीचे अस्तित्व म्हणजे भारताच्या अस्मितेला व सार्वभौमत्वाला ते आव्हानच ठरेल. कोणताही स्वाभिमानी, राष्ट्रनिष्ठ भारतीय पोर्तुगीज साम्राज्यशाहीचे हे अस्तित्व मुकाट्याने खपवून घेणार नाही. यादृष्टीने प्रथम पाऊल म्हणून आपण पोर्तुगीज सरकारचे नागरी स्वातंत्र्य नाकारणारे फॅसिस्ट कायदे सत्याग्रह मार्गाने मोडणार आहोत. महात्मा गांधींनी सत्याग्रहासारखे प्रभावी, अमोघ व अहिंसक शस्त्र आम्हाला दिलेले आहे. ते आत्मविश्‍वासाने वापरून आपण आपल्या ध्येयमंदिराकडे वाटचाल करूया. परकीय साम्राज्यशाही सर्वप्रथम गोमंतकाच्या दरवाजातून भारतात घुसली. आता परकीय साम्राज्यशाहीचा शेवटचा अवशेषही गोमंतकाच्या दरवाजातून बाहेर फेकला जाईल, अशी नियतीची रचना असावी.’
अखेर डॉ. लोहिया आणि त्यांचे साथीदारच नव्हे तर समस्त गोमंतकाची सत्त्वपरीक्षा पाहणारा १८ जूनचा ‘त्रिवार मंगळवार| आजचा त्रिवार मंगळवार’ उगवला. बाकीबाब बोरकर यांच्या शब्दांत ‘स्वातंत्र्याची सिंहगर्जना’ आसमंतात दुमदुमणार याची ग्वाही देणारी सकाळ उमलायला लागली. गोव्याच्या विविध भागांतून लोक जमायला लागले. आधीच अटक चुकवून डॉ. ज्युलियांव मिनेझिस डॉ. लोहियांसह सभेच्या नियोजित वेळेपूर्वी पुष्कळ वेळ स्टेशनरोडवरील ‘रिपब्लिक हॉटेल’मध्ये गुपचूपपणे उतरले होते. त्यांना तेथे कोणी ओळखणार नाही, याची दक्षता घेण्यात आली होती. ऍड. जुझे इनासियू दे लॉयोल यांनी तेथे त्यांची भेट घेतली आणि सविनय कायदेभंग करण्याचा बेत सहा महिने पुढे ढकलावा अशी सूचना केली. पण त्या दिवशी जो चार वाजता कार्यक्रम आखला आहे, तो एका मिनिटानेही पुढे ढकलण्यात येणार नाही, असे डॉ. लोहियांनी त्यांना सांगितले.
पाऊस जोरात पडत होता. वरुणराजालाही लोहपुरुष लोहियांच्या दर्शनाची उत्कंठा असावी. अशा भर पावसात मडगावच्या चौकीपासून नगरपालिकेपर्यंत सर्व मैदान हजारो माणसांनी भरून गेले. स्वातंत्र्यलढ्याला गोमंतकीय जनता सिद्ध झाल्याचेच ते विलोभनीय दृश्य होते. जनतेला अशाच निर्भय-निर्भिड नेतृत्वाची प्रतीक्षा होती आणि नियतीने लोहियांच्या रूपाने तिचे हे स्वप्न सगुणसाकार केले होते.

‘रिपब्लिक हॉटेल’मधून लोहियांना सभास्थानी आणण्याचे काम श्री. लक्ष्मीदास बोरकर या तरुणाकडे सोपविले होते. बोरकरांनी एक टॅक्सी थांबवली, पण ड्रायव्हरने माहिती दिली, शहरात फिरणार्‍या प्रत्येक टॅक्सीने पॅसेंजरला इच्छित स्थळी नेण्यापूर्वी पोलीस चौकीवर प्रथम नेले पाहिजे. तसे सरकारी फर्मानच सर्व टॅक्सीवाल्यांना बंधनकारक होते. म्हणजे आपल्याच पावलांनी पाहुणे पोलीस ठाण्यात येतील असा पोलिसांचा होरा होता. म्हणून बोरकरांनी मग एक घोड्याची बग्गी मिळविली. डॉ. लोहिया, डॉ. मिनेझिस व बोरकर बग्गीत बसले. पाऊस पडत असल्यामुळे बग्गी बंद करून घेणे शक्य झाले. तिघेही जण खाली उतरले. सभास्थानी लगबगीने निघाले. एवढ्यात जनसमुदायातून जयजयकाराच्या गर्जना निनादल्या. ‘डॉ. राम मनोहर लोहिया की जय’, ‘भारतमाता की जय’, ‘महात्मा गांधी की जय.’ त्यावेळचे आदमिनिस्त्रादोर (मामलेदार) फोर्तुनात मिरांद यांची धावपळ चालू झाली. एवढ्यात डॉ. लोहियांनी आपल्या भाषणास सुरुवात केली. मिरांद गरजले- ‘गोव्यात असे भाषण करता येत नाही. पूर्वपरवानगी लागते.’ लोहिया उत्तरले- ‘हा फॅसिस्ट पद्धतीचा कायदाच आज मोडायचा आहे, म्हणून भाषण करीत आहे.’ मिरांदानी त्यांच्यावर पिस्तुल रोखले व भाषण बंद करायचा हुकूम केला. सगळ्यांचे श्‍वास रोखले गेले. त्या प्रसंगाला साक्षी असलेल्या तेवीस वर्षांच्या श्री. विश्‍वनाथ लवंदे या तडफदार तरुणाने जे आपल्या डोळ्यांनी टिपले ते त्यांच्या शब्दांत- ‘‘लोकांना वाटले आता पिस्तुलातून गोळी सुटेल. लोकांच्या डोळ्यांसमोर फिरंगी सरकारची जी प्रतिमा होती, तीवरून मिरांद हा आपल्या रोखलेल्या पिस्तुलातून गोळी झाडण्याचा मूर्खपणा निश्‍चित करील अशी कल्पना नव्हे, खात्री होती. लोक ते पाहून बेचैन, अस्वस्थ झाले. डॉ. लोहिया हे काही कच्चा गुरूचे चेले नव्हते. ते कसलेले पुढारी होते. ते अशा प्रसंगाची थोडीच पर्वा करतात. भीती हा शब्द त्यांच्या कोशातच नव्हता. त्यांनी जणू काही अंगावरून माशी झटकावी इतक्या सहजतेने आपले भाषण सुरू असताना मिरांदाचा उगारलेला हात डाव्या हाताने झटकून बाजूला सारला नि जणू काही घडलेच नाही या वृत्तीने आपले भाषण पुढे सुरू ठेवले.’’

लोहियांच्या या बेडर कृतीने सभास्थानी उपस्थित गोमंतकीयांच्या डोळ्याचे पारणे फिटले. डॉ. लोहिया आणि डॉ. मिनेझिस यांना अटक करण्यात आली. जीपगाडीत बसून पोलीस ठाण्यावर निघण्यापूर्वी डॉक्टरांनी आपल्या इंग्रजी भाषणाचे हस्तलिखित लवंदे यांच्या हाती देऊन ते वाचण्याचा आदेश दिला. डॉ. विनायक मयेकर हे या प्रसंगी लवंदे यांच्या समवेत होते. पोलीस अधिकार्‍यांनी लवंदे यांच्या पाठीवर काव्हालमारीचे चार-पाच रट्टे ओढून त्यांच्या हातातील हस्तलिखित खेचून घेतले. त्यांना पोलीस व्हॅनमधून पोलीस ठाण्याकडे नेण्यात आले, जिथे लोहिया-मिनेझिस यांची आधीच रवानगी करण्यात आली होती. तिघांनाही नंतर पणजी येथे नेण्यात आले. त्या दिवशी मडगावात सुमारे दीडशे देशभक्तांची धरपकड झाली.

चिडलेल्या लोकांनी मडगाव पोलीस ठाण्यासमोर दडपशाहीची पर्वा न करता एकच गर्दी केली. पिसाळलेल्या पोलिसांनी लोकांवर लाठ्या-काठ्यांचे प्रहार केले. अखेरीस पोलीस कमिशनर फिग्रेदो यांनी डॉ. लोहिया यांनाच लोकांना दूर निघून जाण्याची विनंती केली. लोहियांनी हिंदी भाषेत लोकांना उद्देशून ‘घरी निघून जा व ठरविलेला कार्यक्रम यथास्थित पार पाडा’ असे सांगितले.
महात्मा गांधी यांनी आपल्या ‘हरिजन’च्या २६ जूनच्या अंकातून लोहियांच्या गोव्यातील नागरी स्वातंत्र्याच्या अहिंसक लढ्याची भलावण केली. लढ्याला आशीर्वाद दिले. ‘भारतीय जनतेने जसे इंग्रजांचे भय सोडले तसे गोमंतकीयांनी पोर्तुगिजांचे भय सोडावे. धर्मभेद लढ्याच्या आड येऊ देऊ नये’ असे आवाहन केले. पोर्तुगिजांच्या वाढत्या दडपशाहीमुळे स्वातंत्र्यलढ्याला उतरती कळा लागली याचे कारण, अनेक देशभक्त बंदिवासात प्रदीर्घ काळ खितपत पडले. जुलमी, अनन्वित अत्याचार, छळ त्यांच्या वाट्याला आला. अनेक गोमंतकीय देशभक्तांनी गोव्याची वेस ओलांडून गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्रयत्न जारी ठेवले. १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा पोर्तुगिजांच्या साडेचार शतकांच्या वसाहतिक मगरमिठीतून मुक्त झाला. नियतीने क्रांतीची ठिणगी नव्हे, वन्ही चेतवण्यासाठी गोमंतभूमीत डॉ. राम मनोहर लोहिया यांना पाचारण केले होते. स्वास्थ्य आणि विश्रांती ही चैन उपभोगण्याचं सुख त्यांच्या संघर्षमय जीवनात क्वचितच त्यांच्या वाट्याला आलं. तसे लोहिया पु.लं.च्या शब्दांत ‘रसिक तापस.’ त्यांच्याच उत्कट शब्दकळेने या लेखाचा शेवट करण्याचा मोह मला आवरला नाही-
‘राम, कृष्ण आणि शिव ही भारतीयांना पडलेली परिपूर्णतेची स्वप्ने आहेत… भारतमाते- आम्हाला शिवाची मती दे, कृणाचे अंतःकरण दे, रामाची कृती दे. अपरिमित मन देऊन आमची घडण कर. उन्मेषशाही हृदय दे. पण जीवन मात्र संयमी कर.’
स्वातंत्र्यसंग्रामाच्या धगधगीत यज्ञकुंडात आपले जीवन झोकून देणार्‍या लोहियांचे विस्मरण निदान १८ जूनला तरी आम्हा गोमंतकीयांना होऊ नये म्हणून हा लेख त्यांच्या प्रेरणादायी- पावन स्मृतीला समर्पित करीत आहे.