कोर्टाचा संकेतस्थळांना निर्वाणीचा इशारा
१५ दिवसांत आक्षेपार्ह मजकूर हटवावा असा निर्वाणीचा इशारा दिल्लीच्या कोर्टाने याहू, गुगल, फेसबूकसह २२ संकेतस्थळांना दिला असून संबंधित मजकूर काढून टाकल्याचे प्रतिज्ञापत्र १ मार्चपर्यंत सादर करावे, असे सांगितले आहे.
‘आणखी वेळास तुम्ही पात्र नाही’ असे या संकेतस्थळांना कोर्टाने खडसावले. धर्मद्वेषी, समाजविघातक मजकूर प्रसारित केल्याचा ठपका या संकेतस्थळांवर ठेवला आहे. याप्रकरणी काल सुनावणी झाली.
दरम्यान, भारतीय कायदे पाळत नसलेल्या संकेतस्थळांवर चीनप्रमाणे निर्बंध लादण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे दिल्ली हायकोर्टाने हल्लीच म्हटले होते. काही संकेतस्थळे धार्मिक तणाव निर्माण करणारा तसेच उच्च घटनात्मक पदांचा अपमान करणारा मजकूर प्रसारित करीत असल्याचे केंद्रीय दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांनी सांगितल्यानंतर या प्रकरणाला सर्वप्रथम वाचा फुटली होती.
गुगलची तयारी
दिल्ली कोर्टाच्या मुदतीनंतर गुगलने तात्काळ आक्षेपार्ह मजकूर हटविण्याची तयारी दर्शवून पुढील कारवाई सुरू केली आहे. कोर्टाच्या आणि संबंधित प्रदेशाच्या कायद्याचा मान राखणे हे गुगलचे नेहमीच धोरण राहिले असल्याचे गुगलच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.