गोवा मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राज्याच्या मुक्तीसाठी देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू व अन्य स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या योगदानाची दखल म्हणून दि. १४ नोव्हेंबर पासून ९ डिसेंबरपर्यंत ३० मतदारसंघातून यात्रा काढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
वरील काळातील कार्यक्रमांची आखणी पक्ष संघटना बळकट करणे आदी विषयावर चर्चा करण्यासाठी काल येथील सुरेंद्र बाबू तिंबलो सभागृहात पक्षाची कार्यकारिणी व विधिमंडळ यांची संयुक्त बैठक झाली.
दि. १४ नोव्हेंबर रोजी पोळे काणकोण येथून सुरू होणार्या या यात्रेत सुमारे ४०० कार्यकर्ते सहभागी होतील. या काळात प्रत्येक मतदारसंघात किमान दोन सभा घेतल्या जातील. पोळे, असोळणे, नावेली, वास्को, मडगाव, केपे, कुडचडे, शिरोडा, फोंडा प्रियोळ, डिचोली, पेडणे ते पत्रादेवीपर्यंत यात्रा काढली जाईल. दि. ९ डिसेंबर हा कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या जन्मदिनी आझाद मैदानावर या यात्रेचा समारोप होईल, असे शिरोडकर यांनी सांगितले.
गांधी कुटुंबाने गोव्यासाठी फार मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे सोनिया गांधींच्या जन्मदिनी या यात्रेच्या समारोपाचा कार्यक्रम निश्चित करण्यास कुणाची हरकत असू नये, असे त्यांनी एका प्रश्नावर सांगितले.
वरील बैठकीस मुख्यमंत्री दिगंबर कामत, गृहमंत्री रवी नाईक यांनी मार्गदर्शन केले. सरकारी पातळीवरही अनेक कार्यक्रम राबविणार असल्याची माहिती शिरोडकर यांनी दिली.
नाराजांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
पदयात्रेचे आयोजन योग्य प्रकारे व्हावे व ती यशस्वी होण्यासाठी कॉंग्रेस नेत्यांमधील मतभेद मिटावेत यासाठी काल मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या मडगाव येथील निवासस्थानी दक्षिण गोव्यातील नेत्यांची बैठक होऊन आपसातील मतभेद मिटविण्याचे प्रयत्न झाले. बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव, वनमंत्री फिलीप नेरी रॉड्रीगीस, कॉंग्रेसचे अध्यक्ष सुभाष शिरोडकर, सरचिटणीस विजय सरदेसाई, वालंका आलेमाव, युवा कॉंग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो व समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विकासकामांवर चर्चा झाल्याचे अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी सांगितले. प्रत्येक मतदारसंघात पदयात्रा काढण्याचे निश्चित केले असून त्याची सुरवात मडगावमधून होणार आहे. त्याशिवाय केंद्रीय मानव संसाधनमंत्री कपिल सिब्बल दि. ५ रोजी गोव्यात येत असून पणजी व मडगाव येथे व्याख्याने होणार आहेत. मडगाव येथील रवींद्र भवनात माजी खासदार व कॉंग्रेसचे नेते स्व. पुरुषोत्तम काकोडकर यांच्या स्मृत्यर्थ केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांचे व्याख्यान होईल. त्यांच्या व्याख्यानाला बहुसंख्येने लोक उपस्थित राहण्यासंबंधी चर्चा केल्याचे शिरोडकर यांनी सांगितले. सरचिटणीस विजय सरदेसाई यांनीही विकासकामांसाठी बैठक भरली होती. विधानसभेच्या निवडणुका होणार असून विकासकामांचे नियोजन करण्यावर चर्चा केली, असे सांगितले. युवा कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय सरदेसाई व बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांचे बिनसले होते. युवा कॉंग्रेस अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो मुख्यमंत्र्यांपासून दूर होत्या. त्यांच्यात समझोत्यासंबंधी चर्चा झाल्याचे समजते.