28 C
Panjim
Sunday, September 27, 2020

॥ समुपदेशन गीतेतून ॥ – मच्चिता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परम् …

– प्रा. रमेश सप्रे

वासुदेव म्हणजे सगळीकडे वसून राहिलेला देव. जसा अणुअणूतला विष्णू नि कणाकणातला भगवान. सदासर्वदासर्वत्र अशा वासुदेवाचं ज्याला दर्शन होतं, देवत्वाचा अनुभव येतो नि त्याप्रमाणे त्याचं जीवन घडतं तो महात्मा. अशी साधुसंतसत्पुरुषमहात्मे यांची सहजसुंदर कल्पना भगवंतानं अर्जुनासमोर मांडली. यातूनच अर्जुनाची जिज्ञासा जागी झाली व त्यानं भगवंताचं दर्शन जास्त स्पष्ट व प्रभावी कुठे कुठे किंवा कशाकशात होईल असा प्रश्‍न विचारला. हा अर्थातच आपणा सर्वांच्या वतीनं अर्जुनानं विचारलेला प्रश्‍न. भागवतातला परीक्षित, गीतेतला अर्जुन, महाभारतातला युधिष्ठिर, रामायणातला स्वतः राम जेव्हा ऋषिमुनींना असे प्रश्‍न विचारतात तेव्हा तो फक्त त्यांचा स्वतःचाच प्रश्‍न वा शंका नसते तर मानवजातीचं कल्याण व मार्गदर्शन व्हावं हा प्रमुख उद्देश त्यांच्या मनात असतो. असो.

आपल्या जीवनातील दैनंदिन व्यवहारातही भगवंताचं दर्शन कसं व्हावं, त्यातून आपल्याला आनंद समाधान कसं मिळावं हा हेतू अर्जुनाच्या मनात आहे.
अर्जुनाला सुहृद म्हणजे अगदी जिवलग सखा मानणारा श्रीकृष्ण भगवान या प्रश्‍नाचं उदाहरणांसह सविस्तर उत्तर देतो. आपलं दर्शन तसं सर्वत्र नि सदैव होतच असतं सर्वांना पण तशी दृष्टी नसल्यामुळं त्याचा लाभ होत नाही. ती दृष्टी भगवंत देत आहेत. सर्वप्रथम ते अशा सदाकाळ आणि सगळीकडे दर्शन होत असलेल्या धन्य भक्तांचं सुंदर चित्र उभं करतात.
कसे असतात असे भक्त?
‘‘मच्चिता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परम् |
कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च ॥
१०|९
‘भक्त’ म्हणजे भक्ती करणाराच नव्हे तर भगवंतापासून ‘विभक्त’ म्हणजे तुटलेला नाही तो. उलट्या अर्थानं जो परमेश्‍वराशी अखंड ‘भक्त’ म्हणजे जोडलेला आहे तो. एक सोपंसरळ सूत्र आहे-
‘‘भक्त म्हणिजे विभक्त नव्हे|
विभक्त म्हणिजे भक्त नव्हे ॥
परमेश्‍वर म्हणजे शक्ती, चैतन्य, सत्य-शिव-सुंदर आणि हे सारं परम म्हणजे सर्वांच्याही वर किंवा पलिकडे असलेलं. सौंदर्य, ऐश्‍वर्य, औदार्य, सामर्थ्य, ज्ञान, वैभव अशा गोष्टींच्या संपूर्णपणे एकत्र असण्याला ‘भग’ म्हणतात. हे सारं सर्वोच्च प्रमाणात नि सर्वश्रेष्ठ प्रकारे ज्याच्याकडे आहे तो भगवान किंवा भगवती. अन् या परमचैतन्याची किंवा पराशक्तीची भक्ती करणारे आपण भाग्यवान!
देव, भगवंत, ईश्‍वर, परमेश्‍वर (परमात्मा, परब्रह्म) किंवा सद्गुरू यांच्याविषयी ही परमश्रेष्ठत्वाची कल्पना किती सहज-सुंदर आहे. गीतेत हीच कल्पना मध्यवर्ती आहे आणि ‘भगवान् उवाच’ मधील भगवान ही ती अवस्था आहे जी कुणालाही प्राप्त करून घेता येते. नव्हे, तशी अवस्था साध्य करणं हे आपलं आद्य कर्तव्यही आहे नि जन्मसिद्ध अधिकारसुद्धा! यासाठी अनेक मार्ग किंवा उपाय गीतेत सुचवले आहेत. सदासर्वत्र भगवंताचं दर्शन वा दिव्यत्वाचा अनुभव कसा घ्यायचा हे सांगण्यापूर्वी भगवंत असं नित्यदर्शन होणार्‍या अन् म्हणूनच अखंड आनंदात असणार्‍या जीवनमुक्त भक्तांचं वर्णन करतात. अशा अनन्य भक्तांच्या जीवनशैलीचे सहा पैलू सांगितल्यावर भगवंत उत्स्फूर्तपणे म्हणतात अशा अक्षय भक्तिभावानं प्रसन्न होऊन मी त्यांना बुद्धियोग म्हणजे ज्ञान देतो. त्यांच्या मुक्तीची वाट सोपी करतो. केवढं भरभक्कम आश्‍वासन आहे हे. याच्यापेक्षा श्रेष्ठ असं वरदान असूच शकत नाही. भगवंताच्या शब्दातच त्या सहा पैलूंवर सहचिंतन करुया.
१. मच्चित्ता – माझ्यातच चित्त असलेले. मनबुद्धिचित्त सतत परमेश्‍वराच्या चिंतनात, स्मरणात, ध्यानात मग्न असलेले. ही अर्थातच केवळ देवघरातली उपासना नव्हे. तर संपूर्ण व्यवहार हा परमेश्‍वरात मन लीन करून साधणारे भक्त. रामरक्षा स्तोत्रात जी प्रार्थना किंवा मार्गदर्शक सूचना केलीय तिचा अर्थ हाच आहे- ‘रामे चित्तलयः भवतु मे’ म्हणजे माझ्या मनाचा लय रामाच्या चित्तात म्हणजे चिंतनात होऊ दे. ‘लय होऊ दे’ म्हणजे विलीन होऊन जाऊ दे. माझ्या मनबुद्धिला स्वतंत्र आस्तित्वच नको. रामविचाराचं स्मरण-मनन-चिंतन-ध्यान अखंड सुरू ठेवणं आवश्यक आहे.
गंमतीनं म्हणता येईल – जीवनात प्रत्येकाचा काममार्ग असतोच. काम म्हणजे कामवासनाच नव्हे तर सर्व प्रकारच्या कामना (इच्छा). या कामना पुर्‍या करायला ‘दाममार्ग’ चोखाळायला लागतो. दाम म्हणजे केवळ पैसा नव्हे तर कामनापूर्तीची सारी साधनसामग्री व संपत्ती. अधिकाधिक दाम मिळवण्यासाठी ‘वाममार्ग’ स्विकारण्याचा मोह अनेकांना होतो. वाममार्ग म्हणजे भ्रष्टाचार. या ऐवजी सतत रामात चित्त ठेवणारा ‘राममार्ग’ चांगला नाही का? अन् त्यासाठी संतत चालू राहणारा ‘नाममार्ग’ अर्थात अखंड नामस्मरण. केवळ आध्यात्मिक संदर्भात विचार न करता जीवनाच्या सर्व क्षेत्रातील महान व्यक्तींची उदाहरणं पाहू या.
‘गीतांजली’ला नोबेल पारितोषिक मिळणं हे काही त्या अप्रतिम गीतांच्या ओंजळीचं (गीत अंजली) रसग्रहण नव्हतं. तर ती गीतं लिहिली जात असताना रविंद्रनाथांची जी भावसमाधी लागे ते खरं मोल होतं. पण ते त्या महाकवीलाच माहीत. पौर्णिमेच्या प्रकाशात एकदा गंगेवर नौकाविहार करत असताना मनात काव्यकल्पनांचा विलास सुरूच होता. नौकेच्या एका बाजूला छोटीशी खोली होती. नारळाच्या झावळांनी (चुडतांनी) शाकारलेली. मेणबत्ती लावून तिथं रविंद्रनाथांचं काव्यलेखन सुरू होतं. कल्पनेचा प्रवाह काहीसा खंडित झाल्यामुळे कविराज बाहेर येऊन नावेत फिरत विचार करू लागले. इतक्यात वार्‍याचा झोत आला नि खोलीतली मेणबत्ती शांत झाली(विझली). ती पुन्हा पेटवण्यासाठी रविंद्रनाथ आत आले अन् पाहतात तो काय! झावळ्यांच्या फटीतून पाझरून आत खोलीत पसरलेला चंद्रप्रकाश अमृतासारखा संजीवक वाटत होता. झरझर बरसू लागली रविंद्रनाथांची प्रतिभा वाहू लागली. ‘मच्चिता’ अवस्थेचं हे एक उदाहरण. आपल्या जीवनात क्वचितच येणार्‍या या अनुभवांचं प्रमाण वाढवलं पाहिजे. त्यासाठी सर्वत्र ईश्‍वरदर्शन व सर्व कृती या त्या ईश्‍वराचं पूजन हा भाव मनात ठसला पाहिजे.
२. मद्गत प्राणा – प्राण या शब्दाचे दोन अर्थ म्हणजे श्‍वास नि प्राणशक्ती. असा प्राण पूर्णपणे भगवंतात म्हणजे भगवंताच्या कार्यात (उपासनेत) विलीन करायचा हा आदर्श भक्ताच्या जीवनाचा दुसरा पैलू. आपल्या सार्‍या क्रिया व कृती मातेच्या गर्भाशयापासून ते मृत्यूच्या क्षणापर्यंत किंवा स्मशानापर्यंत (फ्रॉम द वुम्ब टु द टुम्ब) श्‍वासावर आधारित असतात. हा श्‍वासच परमेश्‍वराला (म्हणजे इतरांच्या कल्याणासाठी) अर्पण केला की सारं जीवनच समर्पित होतं. एखादा योगाचार्य अय्यंगार किंवा बाबा रामदेव योगसाधनेच्या प्रसारासाठी असे पतंजलीच्या प्राणाशी (म्हणजे शिकवणुकीशी) एकरूप होतात.
वैज्ञानिक एडिसनची गोष्ट मार्मिक आहे. संशोधन हा त्याचा श्‍वास होता. त्यासाठी प्रयोग करणं हा त्याचा प्राण होता. दिवसेंदिवस तो प्रयोगशाळेतच असे. प्रपंचाचं सारं काम पत्नीलाच करावं लागे. एकदा पाहुणे येणार होते. घराच्या स्वच्छतेपासून सारं करायचं होतं. एडिसनच्या पत्नीनं लागणार्‍या सामानाची यादी तयार करून एडिसनच्या हातात कोंबत म्हटलं, ‘दुकानात जाऊन या वस्तू घेऊन या. एवढी कृपा माझ्यावर करा.’ नाइलाजानं व नाखुशीनं एडिसन घराबाहेर पडला. पाऊस कोसळण्याची शक्यता असल्यानं बायकोनं त्याच्या हातात छत्री दिली. यादी व छत्री घेऊन स्वारी दुकानावर आली. पण फक्त देहानं! मनात चिंतन चालू होतं विविध प्रयोगांबद्दलचं. यादीप्रमाणे सामान भरून दुकानदारानं पिशवी एडिसनच्या हातात दिली. प्रयोगशाळेच्या ओढीनं एडिसन धावतच निघाला. अचानक जोराचा पाऊस सुरू झाला. हा छत्री दुकानातच विसरला. पूर्ण भिजून काही वेळानं दुकानात छत्रीसाठी आला. दुकानदारानं विचारलं छत्री नाही हे तुमच्या लक्षात आलं? एडिसन निष्पाप चेहर्‍यानं म्हणाला, ‘घरी पोचल्यावर छत्री बंद करायला जेव्हा मी हात वर केला तेव्हा समजलं की छत्री डोक्यावर नाहीच आहे.’ डोक्यात दुसरे विचार असल्यावर डोक्यावर कोसळणार्‍या पावसाची जाणीवच होत नाही. कितीही भिजलं तरी! कारण प्राण जीवनध्येयाला जोडलेले असतात.
३. बोधयन्तः परस्परम् – असे उच्च कोटीचे भक्त ज्यावेळी एकत्र येतात तेव्हा त्यांचा संग हा नित्य सत्संग असतो. शंकराचार्य-मंडनमिश्र वादात शिष्य व इतर मंडळींना तत्त्वबोध झालाच. पण त्या वादाची न्यायाधीश असलेली साक्षात् सरस्वती (उभयभारती) सुद्धा विचारांनी श्रीमंत झाली.
ज्ञानेश्‍वरादी संतमंडळी ज्यावेळी एकत्र जमायची ती इतरांसाठी पर्वणीच असायची. ‘सहज बोलणे हित उपदेश|’ अशी सार्‍यांची कल्याणवाणी! तसंच श्रीरामकृष्ण परमहंस व नरेंद्र (विवेकानंद) यांचे परस्परसंवाद म्हणजे सर्वांना ज्ञानामृताची पर्वणीच! पूर्वी जनकासारख्या राजांकडे विद्वत्‌सभा (हल्लीच्या परिषदा व चर्चासत्रं) भरत. शेकडो ऋषी-मुनी-विद्वान असायचे. नुसतं उपस्थित राहणार्‍यांचं सुद्धा शिक्षण होत असे. जनक-याज्ञवल्क्य संवाद म्हणजे परस्पर बोधाची परमसीमाच असे.
४. कथयंतः च मां नित्यम् – भक्तांच्या, विद्वानांच्या, प्रतिभावंतांच्या साध्या बोलण्यातही महान् विचार दडलेले असतात.
‘तयांचे विसाट शब्द| सुखे म्हणू येती वेद ॥
म्हणजे त्यांच्या तोंडातून सहज निसटलेले शब्दसुद्धा वेदमंत्रांसारखे प्रभावी असतात. नामदेवाच्या कीर्तनात चोखामेळ्यासारखे अनेक सत्पुरुष डोलायचे. त्या सर्व संतमंडळींच्या ओठी फक्त भगवंताचेच गुणगान, माहात्म्यवर्णन असे. सर्वच अनुभवी व्यक्ती होत्या. कथाकीर्तन, व्याख्यानप्रवचन यातून भगवंताच्या गुणांचं गायन होत असे. शिवाय सारे दंग होऊन रंगून जात. सार्‍यांची भावसमाधी लागे.
एक ऋषी आपला शिष्य कौशिक याला अंतिम पाठासाठी एका व्याधाकडे (शिकार्‍याकडे) पाठवतात. त्या हिंसा करून (जनावरांना मारून त्यांचं मांस विकून) आपलं पोट भरणार्‍या त्या व्याधाकडे आपल्याला का पाठवलं? – याचा विचार करत कौशिक व्यथित झाला. मांस विकत घेणार्‍यांना अतिशय तन्मयतेनं मांस विकणार्‍या कौशिकला त्यानं विचारल्यावर त्या असंस्कृत, अशिक्षित व्याधानं जे कथन केलं त्यावरून त्याचा नित्यध्यास दिसतो. व्याध म्हणाला, ‘मी शिकारीला निघताना धनुष्यबाणांना ‘नारायण’ म्हणून नमस्कार करतो. तोच ‘नारायण’ मला हरणात दिसतो. त्याला मारून मांसखंड करणारा सुरा, ते मांसखंड, तो तराजू सार्‍यांत अखंड नारायण दर्शन होतं. हे सारं करताना माझं लक्ष तराजूच्या काट्याकडे असतं. तो धर्मकाटा सरळ स्थिर होईल इथंच माझं ध्यान असतं. हे ऐकून कौशिक धन्य झाला.
५. तुष्यंति – असे भक्त नित्यानंदात असतात. कोणत्याही परिस्थितीत संतुष्ट असतात. त्यांना आपदा-विपदा-संपदा सारं सारखंच असतं. कारण भगवंताचा सतत संपर्क व संग असतो. वृंदावनातल्या गोपी, कृष्णवेडी मीरा, विठ्ठलाचा छंद लागलेले तुकोबा किंवा रामपिसे (रामाचं वेड) लागलेले समर्थ रामदास हे तर सदासंतुष्ट असायचेच. पण अनेक कलावंत, अभिनय सम्राट आर्थिक परिस्थिती बिकट झाली, अपमानाचं जीवन जगावं लागलं तरी आपल्याच विश्‍वात रंगून जातात. त्यांना लौकिकाची, परिस्थितीची जाणीवच नसते.
ज्ञान-ध्यान-कर्म-भक्ती या सार्‍या मार्गांवरचे भक्त असे नित्यतृप्त असतात. समाजसेवाव्रती तसेच संशोधनाचं व्रत घेतलेले विचारवंत, वैज्ञानिक यांच्याकडे, त्यांच्या चित्रांकडे जरी पाहिलं की त्यांच्या समाधानाची झलक दिसते. धूमकेतूसारखे केस असलेला आइन्स्टाइन असो किंवा केसांची महिरप केलेले अब्दुल कलाम असोत किंवा रामकृष्ण-रमण महर्षींसारखे सत्पुरुष असोत, किंवा बाबा आमटे, मेधा पाटकर, सुंदरसिंग बहुगुणा यांच्यासारखे समाजसुधारक असोत त्यांना ना देहाची ना आरामाची पर्वा असते तरीही अखंड त्यांच्या चेहर्‍यावर सात्विक समाधानाचं तेज दिसतं.
६. रमन्ति – खरं तर संतुष्ट असणे आणि रमणे या परस्परपूरक गोष्टी आहेत. संतुष्ट व्यक्ती कुठंही रमते नि कशातही रमणारी व्यक्ती कधीही संतुष्टच असते. पंढरीच्या वारीत ‘ग्यानबा तुकाराम’ म्हणत लक्षलक्ष पावलं टाकणारे वारकरी आपल्याच मस्तीत मग्न असतात. आपापल्या साधनेत वाल्मीकी – च्यवन ऋषी – ऋषभदेव – बाहुबली यांच्यासारखे महामानव इतके रंगून जातात की त्यांच्याभोवती वारूळ तयार होतं नि अंगावर कीटकांचा संचार चालू असतो.
आपल्या विचारविश्‍वात रमणार्‍या विश्‍वेश्‍वरय्या या इंजिनियरचं उदाहरण मार्मिक आहे.
बांधकाम चालू असलेल्या इमारतीशी विचारांनी एकरूप झाल्यावर ती कोसळणार असा इशारा दिल्यावर काही क्षणातच इमारत जमिनीवर कोसळली पण छोट्या विश्‍वेश्‍वरामुळं अनेकांचे प्राण वाचले.
आपण करतो त्या कामात, अभ्यासात, घेतो त्या अनुभवात रमण्याची लहानपणापासून लागलेली सवय विश्‍वेश्‍वरय्या नावाच्या इंजिनियरला स्वप्नं पहायला व ती सत्यात आणायला खूप उपयोगी पडली. कर्नाटकात कृष्णराजसागर धरणाचं पाणी वळवून तिथं नाचणार्‍या कारंजांचं रंगीबेरंगी उद्यान बनवलं तर? बस या विचारात रमून त्याच्याशी एकजीव, एकरूप झाल्यामुळे आज वृंदावन गार्डनमध्ये सळसळतं जीवनचैतन्य म्हणजे वाहणार्‍या पाण्याची लोभस, मोहक, रूपं पाहणं हा स्वर्गीय आनंद आहे.
अशा प्रकारे सांगताहेत ते फक्त देवभक्तीबद्दल, केवळ आध्यात्मिक उपासनेबद्दल नसून सार्‍या जीवनाला सर्व बाजूंनी व्यापणारं आहे. कोणत्याही सेवाकेंद्राचं किंवा आध्यात्मिक आश्रमाचं बोधवाक्य किंवा घोषवाक्य ठरावं एवढं सामर्थ्य या विचारात आहे.
‘श्‍वासे श्‍वासे दत्तनाम स्मरात्मन|’ प्रत्येक श्‍वासावर दत्ताचं नाम घ्या, स्मरण करा. त्याप्रमाणे प्रत्येक श्‍वास भगवंताच्या स्मरणाचा व भगवंताला शरण जाण्याचा ध्यास घ्यायला हवा. त्यासाठीच सारे सायास व प्रयास करत राहिलं तर सदैव रमणं व संतुष्ट राहणं शक्य आहे. अखंड नामसंकीर्तन करत विश्‍वसंचार करणार्‍या नारदांच्या भक्तिसूत्रात एक सूत्र या संदर्भात महत्त्वाचं आहे-
‘‘कंठावरोधरोमांचाश्रुमिः परस्परं लपमानाः
पलयंति कुलानि पृथिवीं च॥
म्हणजे असे अनन्यभक्त गळा किंवा कंठ भरून आलेल्या, रोमांच उभे राहिलेल्या व डोळे आसवांनी भरलेल्या अवस्थेत परस्परांशी संवाद करतात तो त्यांचा संवाद कुटुंबांना नि पृथ्वीला पावन करतो.

 

 

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

पर्यटनावर कोरोनाचे सावट

सौ. प्रतिभा वासुदेव कारंजकरफोंडा खरं तर बरेच महिने घरात राहून लोक उबगले आहेत. पण बाहेर कुठे पडायला घाबरत...

गारवा तुझ्या आठवणींचा

सुरज गायकवाड ‘‘आई, दूध उतू चाललंय! आणि ती खिडकी बंद कर ना, पावसाचं पाणी सर्वत्र ओट्यावर पसरलंय.’’ निशाचा...

कावळ्याची शिकवण

पल्लवी भांडणकरफोंडा कावळासुद्धा किती निसर्गप्रेमी आहे ना! माणसाप्रमाणे स्वार्थी नाही काही. झाडाला कुठेही न दुखावता आपल्याला हवी असलेली...

‘मानसिकता’ बदलायला हवी ः ल्यूक कुतिन्हो

समग्र आरोग्यसेवेच्या क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळवलेले आणि जीवनशैली प्रशिक्षक असलेले ल्यूक कुतिन्हो मारिया फर्नांडिस यांनी बालपणीचे जीवन परदेशात निरनिराळ्या ठिकाणी व्यतीत...

विदारक साटेलोटे

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बाहेर निघालेली अमली पदार्थ व्यवहाराची भुते आता बॉलिवूडमधील बड्या बड्यांचे बुरखे फाडत निघालेली आहेत. आतापर्यंत दीपिका पडुकोण,...

ALSO IN THIS SECTION

अल्झायमरला दूर ठेवण्यासाठी….

डॉ. गजानन पाणंदीकर(न्युरॉलॉजिस्ट- हेल्थवे हॉस्पिटल) २१ सप्टेंबर हा जागतिक अल्झायमर दिन म्हणून साजरा केला जातो. अल्झायमर या रोगाचा...

कोरोना विरोधात रसायन द्रव्ये

डॉ. मनाली म. पवार(सांतइनेज, पणजी) २०२० वर्ष फक्त जगायचे, आरोग्य सांभाळायचे. बस्स..! कोणतीच चिंता नको, कसे होईल ही...

भाजणे : लक्षणे, कारणे, उपचार भाग – २

डॉ. सुरज सदाशिव पाटलेकर(श्रीव्यंकटेश आयुर्वेद, मडगांव) कित्येक लोकांचा असा गैरसमज असतो की भाजलेल्या जखमेवर टूथपेस्ट, क्रीम, बटर इत्यादी...

गायीचे दूध आणि त्याचे स्वरूप भाग – ३

वैद्य स्वाती हे. अणवेकरम्हापसा आपल्या देशी गाईंचे संगोपन अगदी कमी खर्चात होते. म्हणून त्यांना बेवारशासारख्या रस्त्यावर न सोडता...

चला, कोरोनाबरोबर जगूया

डॉ. मनाली म. पवारसांतइनेज, पणजी संपूर्ण दिवस आबालवृद्धांपर्यंत सर्वांनीच चांगले गरम उकळलेलेच पाणी प्यावे.चांगल्या आहाराबरोबर थोडासा व्यायाम, प्राणायाम,...