26 C
Panjim
Monday, January 18, 2021

॥ मनःशांती उपनिषदातून ॥अवघे धरू सुपंथ

 • प्रा. रमेश सप्रे

जीवनाकडे एक खेळ म्हणून पाहण्याचा अभ्यास करावा. हार- जीत हा खेळाचा नियमच असल्याने त्यात समचित्त राहावं. विश्‍वातील सार्‍या घटना या एका महाशक्तिमान नियतीच्या नियमानं घडत असतात. त्यात अपघात, योगायोग नसतात. असते ती अटळता नि आकस्मिकता. तिथं मनाची साम्यावस्था, संतुलन सांभाळलं की शांत राहता येतं कोणत्याही परिस्थितीत.

‘तुम्ही बुद्धिवादी असाल, विचारवंत असाल, तर्कनिष्ठ असाल तरी उपनिषदांचा अभ्यास अवश्य करा. उपनिषदं अपौरुषेय प्रज्ञेची नि प्रतिभेची पौरुषेय वाणी आहे. त्यातील सार्वकालीन उपदेश (नव्हे संदेश) सर्व मानवजातीसाठी आहे’- अशा आशयाचे उद्गार पाश्चात्त्य विचारवंत, विवेकानंदांसारखे प्रतिभावंत आणि नानी पालखीवालांसारखे प्रज्ञावंत यांनी अनेकदा व्यक्त केले आहेत.
आजच्या मानवतेसमोरची महत्त्वाची समस्या आहे ‘मनःशांती’. मनावरच्या ताणाचं व्यवस्थापन, चिंतामुक्त जीवन, सकारात्मक विचारपद्धती हे मनःशांतीसाठी समांतर शब्दप्रयोग आहेत. आपण काही उपनिषदांवर सद्गुरुकृपेनं सहचिंतन करत आलो आहोत. यम- नचिकेता यांच्या तेजस्वी, जीवनस्पर्शी संवादावर आधारित कठोपनिषदावर आपण आजच्या काळात, कोविदग्रस्त काळाच्या संदर्भात विचार करत आहोत. चालू वर्ष २०२० हे या वर्षासंबंधात अब्दुल कलामांसारख्या शास्त्रज्ञ विचारवंतांनी ‘जग कसं असेल, मानवी समाजासमोर कोणती आव्हानं असतील’ अशा विषयांवर केलेलं सखोल चिंतन, त्यावर आधारित मांडलेली गणितं, केलेली भाकितं सारी वावटळीतील पालापाचोळ्यासारखी उडवून लावली आहेत. आर्थिक समस्या, आरोग्यविषयक प्रश्‍न, जनजीवनाला लागलेलं ग्रहण असे मुद्दे लक्षात घेतले तर सारं जग एका लोकसमुदायाचं बनून गोव्याचा अनुभव आला नि येत आहे. ‘एकमेकां साह्य करू’ असं आवडो-नावडो पण सर्व देशांना करावं लागतंय पण या श्‍लोकाचा पुढचा चरण मात्र उपनिषदातूनच शक्य होईल. म्हणजे उपनिषदातील विचारधारा सार्‍या जगाला गर्जून सांगेल- एकमेका साह्य करू | अवघे धरू सुपंथ ॥
कठोपनिषदात हा मानवहितवादी सुपंथ तर स्पष्ट सांगितलाय, त्याबरोबर हेही ठासून सांगितलंय की याशिवाय दुसरा मार्गच नाही. असणं शक्य नाही.

 • ‘न अन्यः पंथः विद्यते अयनाय |’
  आत्मज्ञान हा तो पंथ आहे. आत्मसाक्षात्कार, आत्मानुभूती, आत्मप्रचीती हे शब्द आपल्याला खूप गूढ नि वजनदार वाटतात. पण प्रत्यक्षात हे ज्ञान समजून घेतलं तर सोपं सरळ आहे. पण उघड्या मनानं समजून घेऊन त्यानुसार जीवनात वर्तन, उपासना करण्याचा निर्धार मात्र केला पाहिजे. काय आहे कठोपनिषदाचा जीवनोपयोगी संदेश…
  रूपकात्मक रीतीनं सांगितलं की लोकांना सोपेपणानं पटतं नि त्यानुसार वर्तन करता येतं. – पहिलं महत्त्वाचं रूपक (मेटॅफर) आहे , ‘रथरूपक’. हे अगदी सोपं पण महत्त्वाचं रूपक आहे.
 • आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु |
  बुद्धिं तु सारथिं विद्धि मनः प्रग्रहमेव च ॥
  इंद्रियाणि हयानाहुः विषयांस्तेषु गोचरान् |
  आत्मेंद्रियमनोयुक्तै भोक्तेत्याहुर्मनीमिषः ॥
  अर्थ फार महत्त्वाचा आहे- आपलं शरीर हा रथ आहे. रथी म्हणजे रथाचा स्वामी आत्मा हा आहे. आपली बुद्धी सारथी (रथचालक) असून मन हा लगाम आहे. त्याचप्रमाणे आपली इंद्रिये हे घोडे असून शब्दस्पर्शरूपादि विषय हे त्या घोड्यांचे मार्ग आहेत. इंद्रिये नि मन यांच्यासह आत्मा हा त्यांचा ‘खरा’ भोक्ता आहे, असे ज्ञानी पुरुष सांगतात.
  उघड आहे हा शरीररथ जीवनाच्या मार्गावर व्यवस्थित चालायचं असेल तर बाकीच्या सर्व गोष्टी योग्य रीतीनं असणं आवश्यक आहे. म्हणजे इंद्रियांना मनाच्या लगामानं बुद्धीनं आवरलं पाहिजे. बुद्धी म्हणजे सारथी हाच या रथाचा महत्त्वाचा भाग आहे. आत्मा रथी म्हणजे रथाचा स्वामी आहे. आपापल्या विषयांच्या मार्गांवरून इंद्रियांचे अश्‍व वेगानं दौडत असतात. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा यांचे विषय क्रमानं जीवनपद्धतीत या अश्‍वानं रोखणं अशक्य नसलं तरी अवघड नि आवश्यक नक्कीच आहे.

मनाचं (लगामाचं) नियंत्रण इंद्रियांवर (विषयभोगांवर) हवंच. शिवाय खुद्द मनावर नियंत्रण हवं बुद्धीचं जिच्या हातात असलेल्या मनाच्या लगामाला घोडे जुंपलेले असतात. महाभारत युद्धप्रसंगी कृष्णानं फक्त अर्जुनाचा रथच चालवला नाही तर प्रत्यक्ष अर्जुनालाच चालवलं. म्हणून कृष्णाला पार्थसारथी असंही म्हणतात.
एकूण काय रथाचा स्वामी (रथी) असलेल्या आत्म्यापर्यंत पोचायचं असेल तर बुद्धीच्या नियंत्रणात मन, मनाच्या नियंत्रणाखाली इंद्रिय अशी जीवनपद्धती असावी. इंद्रियांचे शब्द- स्पर्श- रूप- रस- गंध हे विषय आपापल्या ठिकाणी असतात. इंद्रिय त्यांचा उपभोग घेतात. त्यावर संयम हवा. असो.
आणखी एक रूपक कठोपनिषदात ‘नवद्वारावती किंवा एकादशद्वारावती नगरी’ म्हणजे आपला देह. जसं पंढरपूर, कोल्हापूर तसं देहपूर.

 • पुरम् एकादशद्वारम् अजस्य अवक्रचेतसः |
  अनुष्ठाय न शोचति विमुक्तस्य विमुच्यते | एतद्वैतत् ॥
  म्हणजे – या देहरूपी नगरीला अकरा दारं (प्रवेशद्वारं) आहेत. या नगरीचा राजा आत्मा आहे. तो जन्मरहित (अज) आणि ज्ञानमय (अवक्रचेतसः, म्हणजे वाकडी बुद्धी नसलेला) आहे. या देहनगरीत तो राहिला तरी देहाचे भोग, दुःख त्याला होत नाही आणि हे देहपूर त्यानं सोडलं तरी तो मुक्तच आहे. नचिकेत्यानं विचारलेल्या प्रश्‍नाचं तत्त्व हेच आहे.
  देहपुराची अकरा द्वारं अशी – दोन डोळे, दोन कान, दोन नाकपुड्या, तोंड, मलमूत्रविसर्जन द्वारं, जननेंद्रिय, ब्रह्मरंध्र (टाळू) आणि नाभी.
  देह हे आत्म्याचं साधन किंवा माध्यम आहे. सारे बरेवाईट भोग देहाच्या निरनिराळ्या दारातून (इंद्रियातून) भोगतो. देहात असताना तो जीवात्मा असतो. मृत्यूनंतर देह सोडल्यावर तो मुक्त होतो नि कालांतरानं दुसरा देह धारण करतो. हा जन्म- जीवन-मरणाचा प्रवास तो मुक्त होईपर्यंत म्हणजे त्याचं परमात्म्यात मीलन होईपर्यंत चालूच राहतो.
  मृत्यूचं रहस्य हे देहाच्या अवस्थेवर वा आरोग्यावर अवलंबून नसतं. ते अवलंबून असतं आत्मज्ञानावर. नचिकेतानं याविषयी अनेक प्रश्‍न विचारले जे त्याच्या तीव्र जिज्ञासेतून नि प्रगल्भ बुद्धीतून विचारले गेले होते.

आत्मज्ञान हे इतकं उत्कृष्ट नि आनंददायी आहे तरी त्याच्याकडे बोट दाखवता येत नाही. ते निरूपाधिक म्हणजे गुणरहित असल्याने त्याचा निर्देशही करता येत नाही. हे ध्यानात घेऊन नचिकेता यमराजाला विचारतो- ‘असं जर आहे तर आत्मा स्वतः प्रकाशतो की आपल्या बुद्धीमध्ये तो प्रकाश पाडतो?
यावरचं यमराजाचं उत्तर अंतिम ज्ञान सांगणारं आहे ज्यात आपल्या मनःशांतीचं रहस्य दडलेलं आहे.

 • न तत्र सूर्यो भाति न चंद्रतारकं
  नेमा विद्युतो भान्ति कुतोऽयमग्निः |
  तमेव भान्तं अनुभाति सर्वम्
  तस्य भासा सर्वमिदं विभाति ॥
  अर्थ – सूर्य, चंद्र, तारे, (पावसाळ्यात आकाशातून कोसळणार्‍या) विजा हे सारे स्वतः प्रकाशित होत नाहीत. त्यांना प्रकाशित करणारी शक्ती (अग्नी) प्रत्यक्ष परब्रह्म आहे. त्याच्या प्रकाशामुळे या सर्व गोष्टी प्रकाशित होतात.
  त्या अंतिम किंवा आद्य शक्तीच्या उगमाचं ज्ञान मानवाला शांत, समाधानी, आनंदी बनवतं. त्या पराशक्तीशी जोडलं जाऊन सतत जोडलेलं मात्र राहिलं पाहिजे. ज्याला सच्चिदानंद (सत् चित् आनंद) म्हणतात, ज्याला परब्रह्म, परमात्मा, परमेश्‍वर म्हणतात, त्यालाच सद्गुरू असंही म्हणतात. जो साक्षात् परब्रह्माच्या रूपात येऊन आपल्याला प्रत्यक्ष मार्गदर्शन करतो. कठोपनिषदामध्ये गुरूचं कार्य यमराज करतात तर आदर्श शिष्याची भूमिका नचिकेता निभावतो.
  ‘मनःशांती उपनिषदातून’ या सहचिंतन मालिकेचा समारोप करताना काही मार्गदर्शक सूत्रं स्वतःच्या जीवनात उतरवण्यासाठी आपण ध्यानात ठेवू या.
 • आनंद, समाधान, शांती ही बाहेरच्या जगात कधीही मिळत नाही. विज्ञान-तंत्रज्ञानात यासाठी सहाय्यक साधनं निर्माण करू शकेल. पण साधना ही ज्याची त्यालाच करायची असते. अशी स्वतः केलेली साधनाही दीर्घकाळ करावी लागते. या मार्गात तपाचं माप असतं. तप म्हणजे बारा वर्षांचा कालावधी.
 • चित्ताची समता (मनःशांती) टिकवण्यासाठी आधी आत्मज्ञानाची गरज आहे. सामान्य व्यक्तीला हे कसं शक्य आहे? ज्ञानाचाच विचार केला तर हे सोपं नाही. पण यासाठी कर्मफळाची आसक्ती न धरता केलेली कर्मं, सतत नाम आणि अनुसंधान कायम ठेवून परमेश्‍वराशी जोडून ठेवणारी भक्ती, विशिष्ट मानसिक शिस्त लावून निर्धारपूर्वक साधलेला ध्यानयोग या गोष्टी सहज जमण्यासारख्या आहेत. हवं ते सातत्य नि नित्यनेमानं केलेली उपासना.
 • जीवनाकडे एक खेळ म्हणून पाहण्याचा अभ्यास करावा. हार- जीत हा खेळाचा नियमच असल्याने त्यात समचित्त राहावं. विश्‍वातील सार्‍या घटना या एका महाशक्तिमान नियतीच्या नियमानं घडत असतात. त्यात अपघात, योगायोग नसतात. असते ती अटळता नि आकस्मिकता. तिथं मनाची साम्यावस्था, संतुलन सांभाळलं की शांत राहता येतं कोणत्याही परिस्थितीत. शिवाय अशी व्यक्ती अखेरच्या श्‍वासापर्यंत दुसर्‍यांसाठी कार्यरत राहते नि मृत्यूला मारून मृत्युंजय म्हणते.
  मना चंदनाचे परी त्वां झिजावे |
  मरावे परी कीर्तिरूपी उरावे ॥
  हा समर्थांचा श्‍लोक हाच उपदेश करतो.
 • मनःशांती, स्थिरबुद्धी, चित्तशुद्धीसाठी जो आत्मानंद हवा असतो तो या यम-नचिकेता संवादातून तर मिळतोच पण सार्‍या उपनिषदांच्या ऋषींची हीच आश्‍वासक वाणी असते. आत्मानंद हा आपल्याला आपल्यासाठी आपल्या आतच मिळणार असतो. त्यासाठी आपण दृश्य नि क्षणाक्षणानं नष्ट होणार्‍या वस्तू- व्यक्तींच्या पसार्‍यात म्हणजेच संसारात गुंतून पडतो, रंगून जातो. इथं सांभाळलं पाहिजे.
 • पू. गोंदवलेकर महाराजांना या संदर्भात दोन दृष्टांत आवडायचे ज्ञानेश्‍वरीतले.
  एक- कठपुतळ्यांनी सूत्रधाराला मला असं नाचव, तसं नाचव म्हणून सुचवायचं नसतं. तो सूत्रधार जसं नाचवील तसं विनातक्रार, शांतपणे, आनंदात नाचायचं असतं. दुसर्‍यांच्या मनोरंजनासाठी. राजा तर राजा, गुलाम तर गुलाम, राणी तर राणी, दासी तर दासी. आपल्या भूमिका तो सर्वांचा सूत्रधार ठरवणार.
  दुसरा दृष्टांत – रांधणार्‍याला (आचार्‍याला) तांदुळांनी विनवायचं नसतं की आमचा ‘असा पदार्थ बनव… तो आचारी ठरवणार कोणत्या तांदळांचा मसालेभात करायचा, कोणत्या तांदळांचा साखरभात करायचा नि कोणता भात पांढराच ठेवायचा. तांदुळांनी फक्त उकडायचं. हे सारं सांगताना कठोपनिषदाची मानवजातीच्या कल्याणासाठी गर्जना आहे-
  उठा, जागे रहा आणि आत्मज्ञानी, अखंड अमृतावस्थेत, आनंदात असणार्‍या व्यक्तींना शरण जा – उत्तिष्ठत! जाग्रत! प्राप्यवरान्निबोधत! ॐ शांतिः शांतिः शांतिः|

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

मागणी मान्य

अखेर मेळावलीवासीयांची मागणी मान्य झाली. त्यांनी स्थानिक आमदार विश्वजित राणे यांना नमवले. विश्वजितनी सरकारला नमवले आणि मेळावलीतून आयआयटी प्रकल्प अन्यत्र हलविण्यास सरकार...

मेळावलीतील आयआयटी प्रकल्पाचे

>> मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार शेळ-मेळावली येथील आयआयटी प्रकल्पाला स्थानिक लोकांचा असलेला तीव्र विरोध लक्षात...

आजपासून देशात कोरोना लसीकरण

>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...

आजपासून देशात कोरोना लसीकरण

>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...

पंतप्रधानांनी फोनद्वारे केली श्रीपादभाऊंची विचारपूस

अंकोल्याजवळ अपघातात जखमी झालेले व सध्या गोमेकॉमध्ये उपचार घेणारे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून...

ALSO IN THIS SECTION

मेळावली आंदोलनप्रकरणी तिघांची जामीनावर सुटका

शेळ मेळावली येथील आयआयटी संकुलाच्या जमीन सीमांकनाच्या वेळी झालेल्या हिंसाचारात सहभागी झाल्या प्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाने अटक केलेल्या तिघांजणांची काल जामीनावर काल...

आध्यात्मिक पैलूंकडे दुर्लक्ष नको

योगसाधना - ४८९अंतरंग योग - ७४ डॉ. सीताकांत घाणेकर सर्वत्र घडत असलेल्या घटना ऐकल्या- वाचल्या-...

सुवर्णक्षण ः कोव्हॅक्सिन … कोविशिल्ड

मंजुषा पराग केळकर होय, संपूर्ण सुरक्षित, स्वदेशी कंपन्यांनी तयार केलेली लस तयार होऊन आज ती जागतिक मानकांना खरी...

तापमानात घट ः हदयविकाराचा धोका जास्त

डॉ. बिपीनचंद्र भामरे जे धूम्रपान करतात त्यांना हृदयविकाराचा झटकादेखील येऊ शकतो. धूम्रपान केल्याने हृदयाच्या दिशेने ऑक्सिजनचा प्रवाह कमी...

वातरक्त ः एक दारुण आजार

डॉ. मनाली म. पवार(सांतइनेज-पणजी) सर्व प्रकारचे सांधे दुखणे म्हणजे संधिवात नसतो. म्हणून योग्य वैद्याच्या सल्ल्यानेच चिकित्सा- औषधोपचार करावे....