॥ क्षणचित्रं… कणचित्रं…॥

0
10

पुतळे

  • प्रा. रमेश सप्रे

पुतळ्याची बनली होती ‘मूर्ती’, स्पर्शाची ‘पाद्यपूजा’ नि फेर्‍याची बनली ‘प्रदक्षिणा!’ सारा विरोध मावळला. विरोध करायला आलेल्यांच्या मोठ्या सहभागात शोभायात्रा संपन्न झाली. खरंच, आपल्या पुतळ्यांना मूर्तिपदाची दिव्यता प्राप्त झाली तर काय बहार होईल.

डोंगरावरच्या उतारावर जशी टप्प्या-टप्प्यानं शेती करतात तशी टप्प्या-टप्प्यावर फुललेली एक मोठी बाग. सार्वजनिक उद्यान होतं ते. प्रत्येक पायरीवर एक चौथरा किंवा चबुतरा नि त्यावर एक पुतळा. असे अनेक पुतळे त्या उद्यानात होते. सारे परकीय, जुलमी राजवटीतील त्यांच्या दृष्टीनं महनीय व्यक्तींचे नि अधिकार्‍यांचे. जे पुढे हलवलेही गेले. तर त्या पुतळ्यांना पाहून चिन्मयीनं आजोबांना प्रश्‍न विचारला, ‘‘ही माणसं कोण? अजून जिवंत आहेत का?’’ उत्तर सोपं होतं. ‘‘हे पुुतळे आहेत आज जिवंत नसलेल्या माणसांचे…’’ आजोबा पुढे काही बोलणार इतक्यात तन्मय म्हणाला, ‘‘यांच्या डोक्यावरून काहीतरी पांढरे ओघळत आल्याचे डाग कसले आहेत? ते त्यांचं रक्त आहे का?’’ यावर आजोबा हसून म्हणाले, ‘‘वेड्या, ती त्यांच्यावर बसून कावळ्यांनी केलेली शी आहे.’’ हे ऐकल्यावर दोघंही नातवंडं हसून म्हणाली, ‘‘म्हणजे हे कावळ्यांचे संडास आहेत तर…?’’ यावर आजोबा अवाक्! काय बोलणार?
खरंच आहे- पुतळे उभारण्याचा मूळ उद्देश काय?- कृतज्ञता नि प्रेरणा. ज्या व्यक्तींनी देशासाठी, समाजासाठी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता कार्य केले, क्वचित प्रसंगी आत्मबलिदान केले अशा व्यक्तींविषयी कृतज्ञता व्यक्त करणे नि भावी पिढीने त्यांच्या कार्यापासून म्हणजे चरित्र आणि चारित्र्यापासून प्रेरणा घेऊन त्यांचे कार्य पुढे नेणे, त्यांची स्वप्ने पुरी करणे… किती उदात्त उद्देश आहे हा!
या पार्श्‍वभूमीवर पुतळ्यांच्या संबंधात आजची वस्तुस्थिती काय आहे?
अक्षरशः हजारो पुतळे देशातल्या सर्व राज्यांत आहेत. त्यातले काही खरोखर ऐतिहासिक, महान व्यक्तींचे आहेत. पण बहुसंख्य अलीकडच्या काळात उभारलेले पुतळे राजकीय क्षेत्रातील नि तथाकथित सहकार किंवा शिक्षणमहर्षींचे आहेत.
सत्ताधारी बदलले की नवीन पुतळ्यांची उभारणी केली जाते. यावर कोट्यवधी रुपये खर्च होतात. हे सारे पैसे तुमचे-आमचे-आपल्या सर्वांचेच असतात. भ्रष्टाचार करण्यासाठी हे नवं कुरण किंवा संधी तर नाही ना, असा प्रश्‍न मनात डोकावतो.

सर्वांवर कळस म्हणजे, काही मंडळींनी जिवंत असताना स्वतःच स्वतःच्या पुतळ्यांचे अनावरण केले आहे. जिवंतपणी स्वतःसमोर आरती ओवाळून घेण्यासारखाच हा प्रकार! पुतळे अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळा ठरतात; पण हटवायचा म्हटला की अनेकांच्या संकुचित अस्मिता जाग्या होतात. मग काय बेछूट हिंसा नि जाळपोळ.

पूर्वी आपल्याच नेत्याच्या गळ्यात चपलांचा हार घालून जातीय दंगल माजवली जात होती. आज त्याच्या जोडीला विशिष्ट समाजाच्या व्यक्तींचे (मग त्यांनी देशासाठी कितीही महान कार्य केलं असलं तरी!) पुतळे हटवणे, फोडणे, नष्ट करणे ही नवीन तर्‍हा (ट्रेंड) निघालीय.
पुतळ्यांनी शहरातील एकूण व्यापलेली जागा नि त्यांच्याकडे होणारं जनतेचंच नव्हे तर त्या व्यक्तींच्या अनुयायांचंही दुर्लक्ष होणं सर्वसामान्य होऊन राहिलंय.

पुतळ्याशी संबंधित व्यक्तीच्या जयंती नि स्मृतिदिनाच्या आदल्या दिवशी रंगरंगोटी करून दुसर्‍या दिवशी हारतुरे, भाषणं, घोषणा यांचं कर्मकांड व नंतर ते पुतळे जणू कावळ्यांच्या स्वाधीन केले जातात. एका खरोखर जगन्मान्य महान व्यक्तीच्या पुतळ्याचा चष्मा चोरीला जायचा. हा प्रकार थांबवण्यासाठी वृत्तपत्रात पत्रं लिहिली गेली की आजूबाजूला जो हिंसाचार, भ्रष्टाचार चालू आहे तो पाहणं अशक्य झाल्यामुळं त्या पुतळ्याचा चष्मा चोरणारेच खरे त्यांचे भक्त आहेत. हे वाचल्यावर तो चष्मा पळवण्याचा प्रकार थांबला. कारण विरोधकांना ‘भक्त’ म्हटलं गेलं होतं ना?
एकूणच हे पुतळापुराण लक्षात घेता काही सूचनाही केल्या जातात. यातल्या तीन विचार करण्यासारख्या अशा-
() पुतळा भव्य उभारण्याऐवजी त्या जागी छोटा पुतळा (बस्ट), त्या व्यक्तीच्या कार्याची माहिती, वर्तमानपत्रं, मासिकं यांचं शेल्फ नि एक-दोन बाकं वाचताना बसण्यासाठी अशी रचना असावी.
() अनेक मजली पार्किंग करतात तसं एकावर एक पुतळे उभारणे. समविचारी माणसांचे, एकाच क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींचे, शिवाय त्यांच्या कार्याची झलक. पुतळे पाहण्यासाठी जिना किंवा रँप.
() शहरातील एका भागात मोठी जागा घेऊन सर्व पुतळे तिथं स्थापन करायचे- उभारायचे.
आर्ट बुकवाल्ड नावाचा अमेरिकन व्यंगचित्रकार (आपल्या आर. के. लक्ष्मणसारखा) भारतभर फिरून परतताना त्याला पत्रकारांनी विचारले, ‘भारताबद्दल आपलं खास निरीक्षण कोणतं?’ यावर बुकवाल्ड उद्गारला, ‘पुतळ्यांचा देश! जाल तिकडे पुतळेच पुतळे!’ नंतर काही पावलं चालल्यावर मागे वळून डोळे मिचकावत म्हणाला, ‘बहुसंख्य पुतळ्यांना चष्मे आहेत.’ -फार मार्मिक विधान आहे हे! त्याला सुचवायचंय, मुलांचे नि युवकांचे पुतळे अभावानंच आढळतात.

भगतसिंग, राजगुरू, विवेकानंद, झाशीची राणी, छत्रपती शिवराय यांना चष्मेही नाहीत नि ते म्हातारेही नाहीत. यातून तरी नवी दृष्टी जागोजागी पुतळे उभारताना आपल्याला मिळेल काय?
शेवटी एक प्रसंग. एका शहरात संपन्न झालेल्या यज्ञानंतर नि ज्ञानसत्रानंतर सर्वानुमते तेथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला फेर्‍या मारून पाच-सहा किलोमीटर अंतर चालणारी भव्य शोभायात्रा काढायची असं ठरलं. आदल्या दिवशी याला विरोध करणार्‍या संघटनांच्या नेत्यांनी येऊन दमदाटी केली- ‘खबरदार, शिवरायांच्या पुतळ्याला स्पर्श कराल तर!’ वातावरण तापत चाललं. वादावादीतून शहरात कायदा नि सुव्यवस्था बिघडवणारी परिस्थिती निर्माण होऊ लागली. इतक्यात त्या यज्ञ-ज्ञानसत्राशी संबंधित संतवृत्तीची वृद्ध व्यक्ती बाहेर आली नि म्हणाली, ‘कुठल्या नि कुणाच्या पुतळ्याबद्दल बोलताय तुम्ही सारेजण? आपली शोभायात्रा शिवरायांच्या मूर्तीची पाद्यपूजा करून, आरती ओवाळून, प्रदक्षिणा घालून परतणार आहे.’ त्यांच्या या तेजस्वी उद्गारांनी चित्रच पालटले. कारण पुतळ्याची बनली होती ‘मूर्ती’, स्पर्शाची ‘पाद्यपूजा’ नि फेर्‍याची बनली ‘प्रदक्षिणा!’ सारा विरोध मावळला. विरोध करायला आलेल्यांच्या मोठ्या सहभागात शोभायात्रा संपन्न झाली. मंत्र होता (घोषणा नव्हे!)- ‘जय भवानी! जय शिवाजी!’ खरंच आपल्या पुतळ्यांना मूर्तिपदाची दिव्यता प्राप्त झाली तर काय बहार होईल. पण ती दिव्यता देणार कोण?