होळीनंतरच राज्यात नवे सरकार स्थापन

0
9

>> सदानंद शेट तानावडे यांची माहिती; केंद्रीय निरीक्षक गुरुवारी राज्यात दाखल होणार

भाजपचे केंद्रीय निरीक्षक गुरुवार दि. १७ मार्च रोजी गोव्यात येणार असून, पक्षाच्या विधिमंडळ गटनेत्याची निवड झाली की मग होळीनंतरच नवे सरकार स्थापन होईल, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल दिली. दरम्यान, काल भाजपच्या संसदीय समितीने गोव्यासह अन्य तीन राज्यांसाठी निरीक्षक व सहनिरीक्षकांची निवड जाहीर केली.

भाजपला ज्या चार राज्यांत बहुमत प्राप्त झालेले आहे, त्या चारही राज्यांत एकाच वेळी सरकार स्थापन करण्याचा निर्णय पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनी घेतला असल्याचे तानावडे यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले. भाजपचे केंद्रीय निरीक्षक गुरुवार दि. १७ मार्च रोजी राज्यात येणार आहेत. त्यामुळे होळीनंतरच राज्यात नवे सरकार स्थापन केले जाणार असल्याचे तानावडे म्हणाले.

पक्षाची संसदीय समिती केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती करते. हे निरीक्षक मग निवडून आलेले स्थानिक आमदार व स्थानिक नेते यांच्याशी चर्चा करतात. त्यानंतर विधिमंडळ गटाची बैठक घेऊन गटनेत्याची निवड केली जाते. तद्नंतर पक्षातर्फे राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेसाठीचा दावा केला जातो, असे सरकार स्थापनेसंबंधी अधिक माहिती देताना तानावडे म्हणाले.

८० टक्के भाजप आमदारांचा
मगोचा पाठिंबा घेण्यास विरोध

भाजपच्या ८० टक्के आमदारांनी सरकार स्थापनेसाठी मगोचा पाठिंबा घेण्यास विरोध दर्शविला आहे, असेही तानावडे यांनी सांगितले. पक्षाचे आमदार, स्थानिक भाजप मंडळे आणि कार्यकर्त्यांचाही मगोचा पाठिंबा घेण्यास विरोध आहे; मात्र मगोचा पाठिंबा घ्यावा की नाही याचा निर्णय स्थानिक नेते घेऊ शकत नाही. त्याविषयीचा अंतिम निर्णय केंद्रीय नेतेच घेणार असल्याचे तानावडे यांनी स्पष्ट केले.

नरेंद्र सिंह तोमर यांची निरीक्षक म्हणून निवड
भाजपच्या संसदीय समितीने केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर व केंद्रीय मत्स्य व पशुसंवर्धन राज्यमंत्री एल. मुरुगन यांची गोव्यासाठी अनुक्रमे निरीक्षक व सहनिरीक्षक म्हणून काल निवड केली. गोव्यासह भाजपने बहुमत मिळवलेल्या अन्य तीन राज्यांतील निरीक्षक व सहनिरीक्षकांची निवड जाहीर केली आहे.