डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून खळबळजनक नकाशा जारी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनी हा अमेरिकेचा नवा भू-भाग अथवा प्रदेश असल्याची घोषणा करणारा एक नकाशा ‘ट्रुथ सोशल’वर काल पोस्ट केला. ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनी आता अमेरिकन भूभाग म्हणून दाखवला आहे. तत्पूर्वी, इराणच्या पराभवानंतर, हा प्रदेश अधिकृतपणे अमेरिकेला जोडला जाईल, असे विधान ट्रम्प यांनी नुकतेच केले होते. यानंतर आता त्यांनी हा नकाशा पोस्ट केला आहे. त्यांच्या या नव्या पोस्टमुळे मध्य पूर्वेतील लष्करी आणि राजनैतिक संघर्ष आणखी भडकण्याची शक्यता आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टनंतर इराणचे उपपरराष्ट्रमंत्री काझेम गरीबाबादी यांनी उपहासात्मक टीका केली. होर्मुझ सामुद्रधुनी अमेरिकेचा भाग असल्याचे सांगणे हा केवळ एक गैरसमज आहे. ट्रम्प यांना लवकरच समजेल की या सागरी मार्गावर अमेरिकेचा कोणताही अधिकार नाही, असे ट्रम्प म्हणाले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर होर्मुझ सामुद्रधुनीचा नवा नकाशा शेअर केला असला तरी इराणने मात्र अमेरिकेने नाकाबंदी मागे घेतल्याशिवाय आणि इतर मागण्या मान्य केल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
इराणकडून वाटाघाटी करण्यात आघाडीवर असणारे मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी सरकारी वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित केलेल्या भाषणात ही घोषणा केली. अमेरिका जून महिन्यातील करारात ठरलेल्या सामंजस्य करारातील अटींची पूर्तता करत नाही, तोपर्यंत जलमार्ग बंदच राहील, असे गालिबाफ यांनी स्पष्ट केले.
इराणच्या मागण्या कोणत्या?
अमेरिकेकडून लादलेली नौदल नाकाबंदी पूर्णपणे उठवावी. इराणवरील तेल निर्बंध मागे घ्यावेत. गोठवण्यात आलेली इराणची संपत्ती व मालमत्ता पूर्ववत करावी, अशा मागण्या इराणने ठेवल्या आहेत.

