‘होम डिलिव्हरी’मध्ये राजकारण

0
150
राज्यात गेल्या काही दिवसांपासून घरपोच सामान पोचवण्याची घोषणा सुरू होती. मात्र अखेर कालपासून पाचव्या दिवसापासून ही सेवा सुरू करण्यात आली. मात्र सत्ताधारी नेत्यांनी तसेच विरोधकांनीही आपापल्या मतदारसंघात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करताना राजकारण केल्याने सध्या राज्यात संतापाचे वातावरण पसरले आहे.
मंत्री-आमदार यांचे समर्थक सोडल्यास मतदारसंघातील अन्य लोकांना ह्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत नसल्याच्या लोकांच्या वाढत्या तक्रारी आहेत. आपल्या समर्थकांनाच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करता यावा यासाठी सत्ताधार्‍यांनी ‘होम डिलिव्हरी’साठी स्वयंसेवकांची मदत न घेता आपापल्या समर्थक नगरसेवकांना व पंचांना जुंपल्याच्या तक्रारी आता लोक करू लागले आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत विरोधी आमदारांनीही त्यांचा कित्ता गिरवल्याने मतदारसंघातील आमदारांशी ज्या लोकांचा संबंध नव्हता त्या लोकांना गरज असतानाही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे सामान मिळू न शकलेल्यांनी संताप व्यक्त करताना या आपत्तीच्या वेळी तरी राजकीय नेत्यांनी मानवतेचे दर्शन घडवावे अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
काही लोकांनी सांगितले की, जर सरकारने दजुकाने खुली ठेवली तर लोकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येईल. अन्य राज्यात तसेच केले जात असल्याचे त्यांचे म्हणणे होते.
दरम्यान राजकीय नेत्यांनी आपापल्या मतदारसंघातील लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी घाऊक खरेदी केल्याने राज्यातील विक्री दालनातील साठा संपत आलेला आहे. काही नेत्यांनी राज्या बाहेरून माल आणून त्याचे वितरण केल्याचे समजते.
काही वजनदार नेत्यांनी आपल्या मतदारसंघातील आपल्या समर्थकांना जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वितरण केल्याचे वृत्त आहे.
फातोर्डाचे माजी आमदार दामोदर नाईक यांनी काल फातोर्ड्यात मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंची होम डिलिव्हरी केली. विद्यमान आमदार विजय सरदेसाई यांना याबाबत विचारले असता त्यांनी, आपण मतदारसंघातील काही ज्येष्ठ नागरिक, गरीब लोक व काही आजारी लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केल्याचे सांगितले. राज्यात सध्या जीवनावश्यक वस्तूंचा साठा नसल्याने आपण जास्त लोकांना ह्या वस्तू देऊ शकलो नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, बंदर खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनीही आपल्या कळंगुट मतदारसंघात मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंचा लोकांना पुरवठा केला. तसेच उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनीही आपल्या केपे मतदारसंघात मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघात गेल्या दोन दिवसांपासूनच जीवनावश्यक वस्तूंचे वितरण सविस्तरपणे चालू होते.