होंडा येथे १५ लाखांची दारू जप्त

0
102

होंडा, सत्तरी येथील मेसर्स ओवरसीज बेव्हरिज् प्रा. लिमिटेड या मद्य कारखान्यात काल सकाळी वजन आणि माप खाते व लीगल मॅट्रोलोजी खाते यांनी संयुक्तरित्या धाड घालून सुमारे १५ लाख किंमतीच्या व्हाईट रम बनावटीच्या ४८९६ दारुच्या बाटल्या जप्त केल्या.व्हाईट रमच्या बाटलीमध्ये ७५० मी.लि. दारू भरली जाते. मात्र, धाड घातली तेव्हा सीलबंद बाटल्यांत ७४० मी.लि. भरल्याचा अधिकार्‍यांना संशय आल्याने त्यांनी सर्व बाटल्यांतील दारू वजन करून पाहिली असता सुमारे ४८९६ बाटल्यांमध्ये प्रत्येक १० मि.लि. दारू कमी भरल्याचे आढळून आले. या एका बाटलीची किंमत २९० रुपये असून सुमारे ७५ लिटर दारू कमी मिळाली. या कमी मिळालेल्या दारूची किंमत १५ लाख रुपये असल्याचे उत्तर गोवा सहाय्य नियंत्रक प्रसाद शिरोडकर यांनी पत्रकारांना सांगितले.
धाड घातली तेव्हा ओवरसीज कंपनीचे व्यवस्थापक एम. शिवकुमार उपस्थित होते. कारखान्यातील सीलबंद केलेली सर्व दारू जप्त करून सील करण्यात आली आहे. या घटनेची रितसर तक्रार नोंद केली असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे दक्षिण गोवा नियंत्रक अरुण पंचवाडकर यांनी सांगितले. या धाडसत्रात सहाय्य नियंत्रक किरण कोसंबे, सहाय्य नियंत्रक उत्तर गोवा प्रसाद शिरोडकर, डिचोली तालुका निरीक्षक गुलाम गुलबर्ग, मडगावचे निरीक्षक डी. एन. मापारी आदींचा समावेश होता.