हॉकी इंडियाकडून ‘खेलरत्न’साठी राणी

0
136

 

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी हॉकी इंडियाने भारतीय महिला संघाची कर्णधार राणी रामपाल हिच्या नावाची शिफारस केली आहे. तर वंदना कटारिया, मोनिका आणि हरमनप्रीत सिंह यांची नावे अर्जुन पुरस्कारासाठी पाठवण्यात आली आहेत. मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कारासाठी माजी खेळाडू आरपी सिंह आणि तुषार खांडेकर यांची नावे महासंघाने मंत्रालयाला सुचविली आहेत. तसेच प्रशिक्षक बी.जे. करिअप्पा आणि रोमेश पठानिया या द्वयीची नावे हॉकी इंडियाने द्रोणाचार्य पुरस्कारासाठी पाठवली आहेत. १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारावर खेलरत्न पुरस्कार विजेत्यांचा निर्णय घेतला जाणार आहे.

मागील काही वर्षांत राणीच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये दिलासादायक कामगिरी केली आहे. भारतीय महिलांनी काही महिन्यांपूर्वी अमेरिकेवर निर्णायक सामन्यात मात करून ऑलिंपिक स्पर्धेचे तिकीट मिळवले होते. राणीच्या नेतृत्वाखाली महिला हॉकी संघाचा चढता आलेख पाहूनच हॉकी इंडियाने राणी रामपालचे नाव सुचवले आहे. राणीच्या कप्तानपदाखाली भारताने २०१७ मध्ये महिला आशिया चषक जिंकला होता आणि २०१८ मध्ये आशियाई स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते.

दुसरीकडे, ‘वर्ल्ड गेम्स ऍथलिट ऑफ दी ईयर २०१९’ जिंकणारी पहिली महिला हॉकी खेळाडू ठरलेल्या राणीला २०१६ साली अर्जुन आणि २०२० मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. भारताचे २०० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रतिनिधित्व केलेल्या वंदना आणि १५० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव गाठीशी असलेल्या मोनिकाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. दोघी हीरोशिमा येथील एफआयएच मालिका फायनल, टोकियो ऑलिंपिक सराव स्पर्धा आणि भुवनेश्‍वरमधील ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत भारताच्या विजयाचे मुख्य सूत्रधार होत्या.

अर्जुन पुरस्कारासाठी भारतीय पुरुष संघाचे ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीत सिंह यांचे नावही पाठविण्यात आले आहे. त्याने भुवनेश्वरमधील एफआयएच मालिका फायनलमध्ये चमकदार कामगिरी केली होती. माजी खेळाडू आरपी सिंह आणि खांडकर यांच्या हॉकीच्या योगदानाबद्दल त्यांचे नाव मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कारासाठी पाठविण्यात आले आहे.